April 27, 2010
How to recover data from scratched and damaged Cd or DVD ?
April 19, 2010
नेटभेट ई-मासिक एप्रील २०१०
मराठी ब्लॉगींगला जगाच्या कानाकोपर्यात राहणार्या सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा वसा घेतलेल्या नेटभेट ई-मासिकाचा एप्रील २०१० चा अंक वाचकांसमोर आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नेटभेट ई-मासिकाचा हा सातवा अंक. एक प्रयोग म्हणुन ऑक्टोबरमध्ये चालु केलेला हा उपक्रम आता चांगला नावारुपाला आला आहे. यंदाचा अंक प्रकाशित होण्यास थोडा उशीर झाला (त्याबद्दल क्षमस्व.) परंतु लगेचच वाचकांकडून मासिकाबद्दल विचारणा करण्यासाठी आलेल्या ईमेल्स मुळे आम्ही खरोखरच मनस्वी सुखावलो आहोत.
नेटभेट ई-मासिकाला रसिक वाचकांनी जो प्रतीसाद दिला आहे त्याबद्दल आम्ही वाचकांचे सदैव ऋणी आहोत. हे यश केवळ नेटभेटचे नसून जीवनातील विविधांगी विषयांना हात घालणार्या मराठी ब्लॉगर्सचे आहे. ब्लॉगच्या माध्यमातून साहित्यसेवा करणार्या सर्व मराठी ब्लॉगर्सना अभिवादन.
नेटभेट ई-मासिकामध्ये यावेळीही आम्ही विविध विषयांवरील खुमासदार लेखांचा नजराणा सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाग्यश्री सरदेसाईंनी (भानंस) कथा यात आहे, तसेच अनुजा ताईंनी आपल्या शब्दांनी जिवंत केलेले मस्कत ते सिंगापोरचे बोटप्रवास वर्णन देखिल यात आहे. रोहन चौधरी या ईतिहास जगणार्या अस्सल भटक्याची शिवदुर्गांची सफर या अंकात वाचकांना अनुभवायला मिळेल. सप्त शिवपदस्पर्श ही लेखमालिका आम्ही नेटभेटच्या पुढील काही अंकांत क्रमशः सादर करत आहोत.
याशिवाय अ,ब आणि क हा वेगळ्याधर्तीचा अप्रतीम लेख, चित्रपट, नाटक आणि टी.व्ही मालिका हिट करण्यासाठीच्या जाहिराती, काळा बाजार, एनजीओ- एक पैशांचा खेळ असे अनेकविध विषयांवरील लेखही वाचकांना आवडतील ही अपेक्षा आहे. नोकरी सोडून स्वतःचा उद्योग स्थापन करणार्या चंद्रशेखर आठवले यांचा 'आव्हान' हा प्रेरणादायी लेख आणि अरविंद अडिगा यांच्या The white tiger या पुस्तकाबद्दल हेरंब ओक यांनी मांडलेली मते वाचकांच्या खास पसंतीस उतरतील असा विश्वास आम्हाला आहे.
नेटभेट ईमासिक हा एक प्रयोग असला तरी यामागे एक दृढ, प्रगल्भ विचार आहे. ई-मासिकामध्ये अनेक तृटी राहल्या असतीलही मात्र यामागील आमची तळमळ लक्षात घेऊन वाचक आम्हाला माफ करतील याची खात्री आहे. या अंकाबद्दल प्रतीक्रीया, सुचना, अभिप्राय तसेच अंक वाचल्यानंतर जे काही विचार तुमच्या मनात येतील ते आम्हाला अवश्य कळवा. नेटभेट ई-मासिक डाउनलोड करुन ईमेल द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या या प्रयत्नाला पोहोचविण्यास आम्हाला मदत करा ही नम्र विनंती.
पुन्हा एकदा सर्व वाचकांचे आणि मराठी ब्लॉगर्सचे मनापासून आभार !!!
http://magazine.netbhet.com
धन्यवाद.
सलिल चौधरी
April 18, 2010
"गुगल अॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग पाचवा )
अॅडसेन्स बद्दल बर्यापैकी माहिती आतापर्यंत आपण घेतली आहे. मला खात्री आहे की
आतापर्यंत बर्याच मराठी ब्लॉगर्सनी अॅडसेन्स अकाउंट मिळवण्यासाठी तयारी सुरु
देखिल केली असेल. ब्लॉगर्सना अॅडसेन्स अकाउंटसाठी पुर्वतयारी करण्यासाठी काही वेळ
मिळायला हवा म्हणून या लेखमालिकेतील पाचवा लेख लिहिण्यासाठी मी मुद्दाम थोडा उशिर
केला.
आता आपण अॅडसेन्समध्ये उपलब्ध असणार्या जाहिरातींचे प्रकार आणि त्यांच्या
वापरासंबंधी माहिती मिळवुया.
अॅडसेन्स जाहिरातींचे मुख्य वर्गीकरंण आपण या पुर्वीच्या लेखामध्ये पाहिले
आहेच. त्यापैकी Adsense for content हा प्रकार जास्त महत्वाचा आहे कारण सर्वाधिक
अॅडसेन्स उत्पन्न याच प्रकारातून मिळत असते. Adsense for content मध्ये
जाहिरातींचे दोन मुख्य प्रकार असतात.
- Ad unit
- Link Unit
Ad Unit म्हणजे शाब्दिक जाहिराती (Text ads), चित्रे असलेल्या जाहिराती (Image Ads) किंवा शब्द आणि चित्रे या दोनही गोष्टींचे मिश्रण असलेल्या जाहिराती. सोप्या शब्दात सांगायचे तर ज्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात केली जात आहे त्याबद्दलची थोडीबहुत माहिती जेव्हा जाहिरातीत समाविष्ट असते तेव्हा त्यास Ad Unit असे म्हणतात.
माझ्या अनुभवानुसार या प्रकारच्या जाहिरातींमध्ये (यापैकी Image Ads मध्ये सर्वाधिक) सर्वाधिक पैसे मिळु शकतात. मात्र काही Adsense गुरुंच्या मते Link units मध्ये जास्त पैसे मिळतात.
या प्रकारच्या जाहिरातींनाच Banner ads असे देखिल म्हणतात. बॅनर अॅड्सचे आकार ठरलेले असतात. Square/rectangle, Vertical, Horizontical असे तीन उपप्र्कार याप्रकारच्या जाहिरातींमध्ये असतात.
Square/rectangle
336 X 280 Large Rectangle
300 X 250 Medium rectangle
250 X 250 square
200 X 200 small square
180 X 150 small rectangle
125 X 125 button
Vertical
160 X 600 Wide skyscrapper
120 X 600 Skyscrapper
120 X 240 Vertical Banner
Horizontical
720 X 90 Leaderoard
460 X 60 Banner
234 X 60 Half Banner
Ad Units बद्दल काही टीप्स -
१. एका पानावर अॅडसेन्सच्या जास्तीत जास्त केवळ तीन Ad Units दाखविता येतात.
२. माझ्या अनुभवानुसार 336 X 280 Large Rectangle आणि 300 X 250 Medium rectangle या दोन आकारातील अॅड्स सर्वाधिक फायद्याच्या ठरतात.
३. वेबसाईट किंवा ब्लॉगच्या वरच्या भागात (प्रथमदर्शी भागात - Above the fold) या जाहिराती असाव्यात.
४. जर तुमच्या ब्लॉगचे पान अगदी सुटसुटीत असेल तर Image ads वापराव्यात परंतु वेबपानावर जास्तीत जास्त मजकुर असेल तर Text ads वापराव्यात. Text ads मजकुरामध्ये मिसळल्या जाउन त्यावर क्लिक्स मिळण्याची शक्यता जास्त असते.
२. Link Unit -
Link unit म्हणजे पुर्ण जाहिरात न देता जाहिरातीशी संबंधीत एका शब्दाची लिंक दाखविली जाते. या लिंकवर वाचकांनी क्लिक केल्यास ते मुळ जाहिरातीकडे किंवा जाहिरात केल्या जाणार्या उत्पादनाच्या वेबसाईटकडे वळवले जातात.
लिंक युनिट्समध्ये Horizontal आणि square असे दोन उपप्रकार असतात.
Horizontal
728 X 15
468 X 15
Square
200 X 90
180 X 90
160 X 90
120 X 90
Link Units बद्दल काही टीप्स -
१. एका पानावर अॅडसेन्सच्या जास्तीत जास्त केवळ तीन Link Units दाखविता येतात.
२. माझ्या अनुभवानुसार 728 X 15 आणि 468 X 15 या दोन आकारातील अॅड्स सर्वाधिक फायद्याच्या ठरतात.
३. वेबसाईट किंवा ब्लॉगमध्ये जेथे वाचकांनी क्लिक करण्याची शक्यता असते अशा भागात या जाहिराती असाव्यात. उदाहरणार्थ - मुख्य मेनु , साईडबार, कमेंटबॉक्स इत्यादी.
४. लिंक युनिट्स वरकरणी अगदीच निरुपयोगी वाटत असल्या तरी हुशारीने वापरल्या तर अतीशय फायद्याच्या ठरतात. नेटभेटला मिळणारे ४०% अॅडसेन्स उत्पन्न हे लिंक युनिट्समुळे मिळते. उदाहरणार्थ ebooks.netbhet.com मध्ये फिरत्या मासिकांच्या रांगेखाली गुगलच्या लिंक अॅड्स चिकटवल्या आहेत त्या पहा. वाचकांना त्या लिंक अॅड्स म्हणजे वेबसाईटचा मेनुबार आहे असा भास होतो आणि ते लिंक अॅड्सवर क्लिक करतात :-)
अॅडसेन्सच्या वरील प्रकारांची उदाहरणे पाहण्यासाठी https://www.google.com/adsense/static/en_US/AdFormats.html?hl=en_US&gsessionid=fL0lhFfniGeoHka-fR_oJA#linkunits या लिंकवर क्लिक करा.
नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी मध्ये दोन नविन ई-पुस्तकांचे आगमन !
वाचकहो, नेटभेट ई-पुस्तक लायब्ररीला प्रचंड प्रतीसाद दिल्याबद्दल आम्ही आपले
अतिशय आभारी आहोत. वाचकांना मराठी ऑनलाईन साहित्याशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही
नेहमीच करत असतो.
नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी मध्ये जास्तीत जास्तीत मराठी ई-पुस्तके
आणण्याच्या आमच्या प्रयत्नांतर्गत आज आम्ही दोन नविन पुस्तके आपल्या भेटीला आणत
आहोत.
यापैकी पहिले पुस्तक मला नुकताच scribd.com या वेबसाईटवर मिळाले. या पुस्तकाचे नाव आहे "समग्र केशवसुत" .. कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुतांच्या कवितांचा हा संग्रह आहे. मुलुंड येथील संगणक प्रकाशनाने हे ई-पुस्तक प्रकाशित केले आहे.
कवी केशवसुतांच्या मराठी व इंग्रजी कवितांचा समावेश असलेले हे २६३ पानांचे ई-पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.
नेटभेटच्या ई-पुस्तक लायब्ररी मध्ये आलेल्या दुसर्या पुस्तकाचे नाव आहे 'शब्दांकीत प्रतीभा". हा एक दिवाळी अंक आहे.
प्रतीभा सकपाळ (मुंबई) यांनी प्रकाशित केलेल्या या दिवाळी अंकाचा पहिलाच भाग ई-पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध झाला आहे. (Scribd.com). कथा, कविता, माहितीपर आणि उपयुक्त लेखांनी सजलेला हा दिवाळी अंक अतिशय वाचनीय झाला आहे. तेव्हा या ई-पुस्तकाचा लाभ घेणे देखिल वाचकांना नक्कीच आवडेला.
यापुढेही अनेक नवनविन ई-पुस्तके वाचकांच्या भेटीस आणण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहिल, याकामी आपणही शक्य तेवेढे सहाय्य करावे ही नम्र विनंती.
April 12, 2010
"गुगल अॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग चौथा.)
अॅडसेन्समधील अॅड्सचे प्रकार
(search, content, feeds, parked domains, Mobile content etc) ,
मित्रहो, आतापर्यंत आपण अॅडसेन्स काय आहे? कसे काम
करते? अॅडसेन्स अकाउंट मिळविण्यासाठी काय उपाय करावे लागतात याबद्द्ल माहिती
मिळविली. ही सर्व माहिती अॅडसेन्सच्या बाह्यरंगांबद्दल (External)
होती.
आज या लेखापासून
आपण गुगल अॅडसेन्सचे अंतरंग पाहणार आहोत. आपल्या ब्लॉगवर किती प्रकारे, किती
जाहिराती , कशा व कुठे दाखवाव्यात? अॅडसेन्स मध्ये जाहिरातींचे किती प्रकार आहेत?
ते कसे व कुठे वापरायचे ? जाहिरातींचा कोड कसा तयार करायचा व ब्लॉगवर कोड कसा
चिकटवायचा ? अॅड कोडचे कस्टमायझेशन का व कसे करावे?
ब्लॉगची मिळकत
कुठे पहायची ? रीपोर्टस कसे वाचायचे व वापरायचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण
पुढील लेखांमध्ये पाहणार आहोत.
आजच्या लेखामध्ये
आपण अॅडसेन्स मधील जाहिरातींचे प्रकार पाहणार आहोत.
गुगल अॅडसेन्स
आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईटवर विविध प्रकारे वापरता येते. या प्रकारांचे
प्रामुख्याने
खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येते.
1. Adsense for
search -
गुगल कस्टम सर्चचा वापर करुन आपल्या ब्लॉगवर, आपल्या ब्लॉगवरील माहितीचा शोध वाचकांना घेता यावा यासाठी एक सर्च बॉक्स देता येतो. या सर्च बॉक्सचा वापर करुन वाचकाने शोध घेतला तर आलेल्या रीझल्ट पेजवर गुगलने दाखविलेल्या जाहिराती दिसतात. या जाहिरातींवर वाचकांनी क्लिक केल्यास याचे चांगले पैसे मिळतात असा माझा अनुभव आहे.
उदाहरणार्थ - नेटभेट.कॉमच्या उजव्या बाजुला जो सर्च बॉक्स दिसतो तो गुगल कस्टम सर्चचे एक उदाहरण आहे. तेथे शोध घेउन पाहिल्यास जाहिराती कशा व कोठे दिसतात याची तुम्हाला कल्पना येईल. (आणि मला काही पैसे मिळतील :-)
2. Adsense for Content -
अॅडसेन्स जाहिरातींचा हा प्रकार आपणा सर्वांना ठाउक आहेच. तुमच्या ब्लॉग / साईटवरील मजकुराच्या (Content) अनुशंगाने ब्लॉगवर जाहिराती दाखविल्या जातात. ब्लॉगच्या पानावरील मजकुरामधुन काही निवडक Keywords च्या सहाय्याने गुगलतर्फे जाहिराती दाखविल्या जातात. हा गुगल अॅडसेन्सचा सर्वाधिक लोकप्रीय प्रकार आहे.
3. Adsense for feeds -
RSS Feeds च्या सहाय्याने ब्लॉगवरील नविन पोस्ट त्वरीत वाचकांपर्यंत पोहोचवता येते. ब्लॉगवर नविन काही लिखाण झाले आहे का हे पाहण्यासाठी वाचकांना ब्लॉगला नियमितपणे भेट द्यावी लागते. मात्र प्रत्येक वेळेस वाचकांना आपल्या ब्लॉगला भेट देणे शक्य होईलच असे नाही. अशा वेळेस वाचकांना नविन पोस्टसची माहिती ईमेल द्वारे किंवा RSS reader ( उदाहरणार्थ - गुगल रीडर ) द्वारे कळवण्यासाठी Feeds चा वापर केला जातो.
ब्लॉग्जच्या नियमीत वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी RSS चा वापर अतिशय उपयुक्त ठरतो आहे आणि म्हणुनच बहुतांशी ब्लॉग्ज आपल्या पोस्ट्सच्या फीड्स वाचकांपर्यंत पोहोचविण्यास उत्सुक असतात.
गुगलने फीड्स मध्ये देखिल जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गुगल तर्फे दाखविल्या जाणार्या जाहिराती फीड्स बरोबर चक्क वाचकांच्या ईनबॉक्स मध्ये जाउन थडकल्या आहेत.
उदाहरण - नेटभेटला सबस्क्राईब करणार्या वाचकांना नविन लेखांची माहिती खालील स्वरुपात ईमेल द्वारे पाठविली जाते. खालील चित्रात गुगलच्या जाहिराती देखिल पाहता येतील.
4. Adsense for Parked domains -
ईंटरनेट विश्वात डोमेन नाव विक्री (Domain name selling and reselling) हा एक मोठा व्यवसाय आहे. चांगली विकली जाऊ शकणारी डोमेन नावे आधिच बुक करुन ठेवली जातात आणि त्यानंतर जास्त किमतीला विकली जातात. एकदा विकत घेतलेले डोमेन नाव पुन्हा विकले जात नाही तोपर्यंत त्यास Parked domain असे म्हणतात. अशा parked domains वर जर कोणी चुकुन किंवा डोमेन खरेदीच्या उद्देशाने भेट दीली तर त्यांना जाहिराती दाखवूनही पैसे कमावता येतात.
हा पर्याय ब्लॉगर्ससाठी नसल्याने आपण याकडे दुर्लक्ष करुया.
5. Adsense for mobile content -
स्मार्टफोन्स मुळे इंटरनेटचा मोबाईलवरुन होणारा वापर वाढला आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन गुगल काकांनी मोबाईल साईट्स मध्ये जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. मोबाईलच्या छोट्याश्या स्क्रीनसाठी सोयीस्कर तसेच कमीत कमी नेव्हीगेशन असलेल्या साईट्स बनवण्याकडे वेबमास्टर्सचा कल वाढत चालला आहे. अशा खास मोबाईल साईट्ससाठी गुगलने Adsense for mobile content ही सेवा चालू केली आहे.
अॅडसेन्सवरील लेखमालिकेच्या तिसर्या भागामध्ये आपण गुगल अॅडसेन्स खात्यासाठी नोंदणी करण्यासाठीची आवश्यक ती माहिती घेतली. मला खात्री आहे की माझ्या ब्लॉगरमित्रांनी यासाठी तयारी चालू केली असेलच. मित्रांनो तुमच्या या ब्लॉगची लिंक खाली कमेंट्स मध्ये लिहा. म्हणजे मी अधुन मधुन या ब्लॉग्जना भेट देऊन काही अॅडसेन्सबद्दल काही सुचना तुम्हाला देऊ शकेन.
April 11, 2010
Devise doctor - ड्राईवर upgradation च्या डोकेदुखीला आत करा बाय बाय !!
-
Device Doctor हे सोफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
April 10, 2010
"गुगल अॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग तिसरा.)
मित्रहो, आज आपण गुगल अॅडसेन्स खाते उघडण्यासाठी आणि मंजुर होण्यासाठी आवश्यक
असणारी पुर्वतयारी करणार आहोत.
गुगल अॅडसेन्स खाते उघडण्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे एक वेबसाईट किंवा ब्लॉग असणे आवश्यक
आहे.
जर तुम्हाला प्रोग्रामिंगचे ज्ञान नसेल तर वेबसाईट बनविणे अतिशय किचकट काम आहे.
वर्डप्रेस.कॉम मधील ब्लॉग्जमध्ये जाहिराती दाखविण्यास मनाई आहे. (मात्र वर्डप्रेस
ब्लॉग जर तुम्ही स्वतः होस्ट (Self Hosted) केलेला असेल तर त्यावर जाहिराती दाखविता
येतात.) त्यामुळे अॅडसेन्स अकाउंट मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे
ब्लॉगर्.कॉम वरील ब्लॉग. माझा असा अनुभव आहे की ब्लॉगर्.कॉम वरील
ब्लॉग्जना अॅडसेन्सची मंजुरी (Adsense Approval) लवकर मिळते.
मराठी ब्लॉगर्ससाठी टीप - जर तुम्ही यापुर्वीच गुगल अॅडसेन्स
खाते उघडले असेल आणि ते मंजुर झाले असेल तर ठीक आहे. मात्र अद्याप तुमचे अॅडसेन्स
खाते बनले नसेल किंवा मंजुर झाले नसेल तर एक नविन ब्लॉग बनवा. या नविन ब्लॉगचा वापर
आपण अॅडसेन्स खात्याची मंजुरी मिळविण्यासाठी करणार आहोत.
शिवाजी महाराजांनी शिकविलेल्या गनिमी काव्याचा वापर आपण येथे करणार आहोत :-).
थोडक्यात, या नविन ब्लॉगचा वापर आपण गुगलला फसविण्यासाठी करणार आहोत.
गुगल अॅडसेन्स अकाउंट साठी नोंदणी करण्यापुर्वी आपण बनविलेला नविन ब्लॉग
अॅडसेन्ससाठी तयार करुयात. पहिल्यांदा या ब्लॉगच्या सेटींग्ज मध्ये जाऊन ब्लॉगची
भाषा English आहे याची खात्री करुन घ्या. आता या ब्लॉगवर रोज एक याप्रमाणे लेख
प्रकाशित करायचे आहेत. मात्र हे लेख इंग्रजी भाषेमध्ये असले पाहिजेत.
जर तुम्हाला इंग्रजी मध्ये लेख लिहिता येत असतील तर ठीकच आहे. जर येत नसेल
(माझ्यासारखं) तर एक युक्ती सांगतो. एखादा जुना इंग्रजी पेपर किंवा जुने इंग्रजी
मासिक घ्या (फारसे प्रसिद्ध नसलेले), किंवा शाळेमध्ये मुलांना इंग्रजी निबंधांची
पुस्तके असतात तशी पुस्तके, किंवा इतर कोणतेही २-३ पानांच्या छोट्या छोट्या गोष्टी
असलेले पुस्तक घ्या (फारसे प्रसिद्ध नसलेले). आता तुम्हाला ब्लॉग पोस्टसाठी मजकुर
मिळालेला आहे. गरज आहे ते फक्त टाईप करण्याची. रोज एक लेख/ गोष्ट/ निबंध आता
पोस्टच्या स्वरुपात तुम्हाला ब्लॉगवर लिहायची आहे. (तुम्ही ब्लॉगसाठी जो इंग्रजी
मजकुर वापरणार आहात तो यापुर्वीच इंटरनेटवर उपलब्ध नसल्याची खात्री करून घ्या.) असे
साधारण ३०-४० लेख ब्लॉगवर लिहा (दररोज एक !).
आता गुगल अॅडसेन्सची मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक असणार्या "इंग्रजी भाषा" या एका गोष्टीची
पुर्तता आपण केलेली आहे.
गुगलची दुसरी आणि
महत्त्वाची अट आहे ती म्हणजे Trafic. तुमच्या ब्लॉगला भेट देणारे नियमीत
वाचक असले पाहिजेत. कारण वाचक नसतील तर गुगलच्या जाहिराती पाहणार कोण? आपण या नविन
ब्लॉगची ट्रॅफिक वाढविण्याचे उपाय पाहुया.
तुम्ही लिहिलेले इंग्रजी लेख वाचनीय असतील तर थोडीबहुत ट्रॅफिक मिळेलच. परंतु
लाखो इंग्रजी ब्लॉग्जवर दररोज चांगले लेख लिहिले जात असताना आपले कॉपी केलेले लेख
वाचणार कोण? मित्रहो, इथे आपल्या मदतीला धावणार आहे मायमराठी.
ट्रॅफिकसाठीचा गनिमी कावा नंबर २ :-)
वर दिल्याप्रमाणे दररोज एक इंग्रजी लेख तुम्ही लिहिणार आहातच. मात्र त्याबरोबर
दर २-३ दिवसांतुन एक लेख मराठी भाषेत देखिल लिहा. आणि मराठीतील लेख तरी किमान कॉपी
न करता स्वतः चांगले लेखन करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लिहिलेले मराठी लेख वाचनीय
असणे महत्त्वाचे असते. कारण ट्रॅफीक याच लेखांना मिळणार आहे मात्र गुगलला वाटेल की
ट्रॅफिक तुमच्या संपुर्ण ब्लॉगला मिळत आहे. तसेच काही इंग्रजी लेखांचे मराठीत
भाषांतर करुन इंग्रजी व मराठी मिश्रीत पोस्ट तयार करा.
असे केल्यावर तुमच्या ब्लॉगवर तीन प्रकारचे लेख दिसतील.
१. पुर्ण इंग्रजी पोस्ट्स - उदाहरण
पहा - दररोज १ लेख ( तुमच्या ब्लॉगवरील ७०% पाने इंग्रजीतील असली
पाहिजेत.)
२. पुर्ण मराठी पोस्ट्स - दर २-३ दिवसांनी एक लेख
३. मराठी इंग्रजी मिश्रीत पोस्ट्स - उदाहरण
पहा - दर ५-६ दिवसांनी एक लेख
(मी डॉक्टरने औषधांची मात्रा सांगितल्याचा आव आणतोय. १-२ दिवस मागेपुढे झाले तरी
चालेल बरं का !!)
नविन ब्लॉग चालु करुन साधारण एका महिन्यानंतर सर्व ब्लॉग डीरेक्टरीज
(Blog Directories) मध्ये ब्लॉग नोंदणी करा. त्याचसोबत आपल्या मराठमोळ्या
साईट्सवर म्हणजे ब्लॉगकट्टा, मराठी ब्लॉगविश्व, ब्लॉगवाणी, मराठीकट्टा, मराठीसुची या सर्व साईट्सवर नोंदणी
करा. कारण तुम्हाला हवी असलेली ट्रॅफिक ही याच साईट्सवरुन येणार आहे.
त्याचप्रमाणे तुमच्या ईतर ब्लॉगर मित्रांना त्यांच्या ब्लॉगरोल मध्ये या नविन
ब्लॉगचे नाव टाकण्याची विनंती करा. व तुम्ही स्वतःदेखिल त्यांच्या ब्लॉगचे नाव
ब्लॉगलिंक्स मध्ये अपडेट करा. (एकमेका सहाय्य करु , अवघे धरु Adsense पंथ)
किमान दोन महिने ही प्रक्रीया करत रहा. दररोज नविन व सकस लेखन , भरपुर लिंकींग
आणि ट्रॅफिक वाढविण्यासाठी अथक प्रयत्न करत रहा. ही दोन महिन्याची तयारी पुढे खुप
महत्त्वाची ठरणार आहे.
गुगल अॅडसेन्सची तिसरी अट म्हणजे तुमची साईट पुर्ण
असली पाहिजे.
यासाठी ब्लॉगवरील Pages चा पर्याय वापरावा लागेल. ब्लॉगर मधील Pages या
सुविधेबद्द्ल मी यापुर्वी एका
लेखात माहिती दिली होती. याच सुविधेचा वापर करुन ब्लॉगबद्दल माहिती देणारी
मुख्य पाने जोडा. यामध्ये प्रामुख्याने "आमच्याबद्दल" (About Us), "संपर्क"
(Contact Us),Subscribe आणि Privacy policy अशी मुख्य पाने येणे आवश्यक आहे.
गुगलच्या लेखी Privacy policy अत्यंत महत्त्वाची आहे. Privacy policy sample असे
गुगल सर्च केल्यावर तुम्हाला Privacy policy चे अनेक नमुने मिळतील. त्यापैकी एक
आपल्या ब्लॉगवरील privacy policy या पानावर चिकटवा.
सर्व पाने
ब्लॉगवर आल्यानंतर आणि सुमारे ५० ते ७० लेख झाल्यानंतर तुमचा ब्लॉग अॅडसेन्स साठी
तयार झालेला असेल.
अॅडसेन्स साठी नोंदणी करण्याआधी आणखी काही गोष्टी करता येतील.मित्रहो, आता तुमचा ब्लॉग (आणि तुम्ही !) अॅडसेन्स साठी नोंदणी करण्यास तयार आहे. अॅडसेन्स मध्ये नाव नोंदणी करताना पुर्ण नाव, पुर्ण पत्ता, आणि बँक अकाउंटची माहिती नीट द्या.
१. Feedburner मध्ये ब्लॉगची फीड सर्वीस चालु करुन घ्यावी आणि सर्व मित्रमंडळींना, ब्लॉगरमित्रांना आणि वाचकांना subscribe करण्यास सांगावे.
२. गुगल, बिंग, याहु, AOl आणि इतर सर्व सर्च इंजिन्समध्ये आपला ब्लॉग समाविष्ट करुन घ्यावा. (Blog listing)
३. विविध ब्लॉग्ज आणि संकेतस्थळावर कमेंट्स लिहाव्यात (इथे लिहिल्यात तर आनंदच आहे !) आणि सोबत आपल्या ब्लॉगची लिंक द्यावी.
४. गुगल अॅनॅलिटीक्सचा कोड ब्लॉग टेम्प्लेटमध्ये चिकटवून आपल्या ब्लॉगच्या वाचकांची पुरेपुर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा.
५. ब्लॉग पोस्ट्स मध्ये Slideshare.com आणि youtube.com वरील प्रेझेंटेशन्स आणि व्हीडीओज दाखवा. यामुळे ब्लॉगला अतीरीक्त लिंक्स मिळतात आणि जाहिरातींसाठी चांगले असे कंटेंट आपोआप ब्लॉग्जवर येते.
६. ब्लॉग पोस्ट मध्ये चित्रांचा वापर करणे केव्हाही चांगले. मात्र वापरलेली चित्रे कॉपीराईट कायद्याचा भंग करणारी नसावीत. चित्रांना Alt tag असणे अतिशय महत्त्वाचे आहे. Alt tag वापरण्याबद्दल माहिती मी नंतर देईनच मात्र तुम्ही स्वतः गुगल वर शोधुनही ती माहिती मिळवु शकता.
मी एक वर्षापुर्वी अॅडसेन्स अकाउंट उघडले होते तेव्हा त्यास लगेच मंजुरी मिळाल्याचे मला आठवत आहे. मात्र आता गुगलने अॅडसेन्स अकाउंट सहजासहजी देणे बंद केले आहे (कारण मंदीच्या लाटेमुळे एक उत्पन्नाचा पर्याय म्हणून बरेचजण ब्लॉगींगकडे वळले). आपल्या तयारीनुसार एका महिन्यात मंजुरी मिळणे अपेक्षीत आहे मात्र काही ठीकाणी हा कालावधी ६ महिन्यांपर्यंतचा असू शकतो. मात्र निराश न होता अॅडसेन्सची मंजुरी मिळेपर्यंत ब्लॉग वर दिलेल्या पद्धतीनुसार अपडेट करत रहा.
आपल्या या कामात कमालीचा संयम हवा आहे हे मी आधीच सांगीतले आहे. लक्षात ठेवा Patience pays ! Always !
April 08, 2010
"गुगल अॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग दुसरा.)
अॅडसेन्स म्हणजे नक्की काय ?
अॅडसेन्स हा गुगल काकांनी सुरु केलेला प्रकल्प आहे. Google Adsense या
प्रोग्राममध्ये विविध वेबसाईट्सवर आणि ब्लॉग्जवर गुगलतर्फे जाहिराती दाखविल्या
जातात. या जाहिराती आपल्या संकेतस्थळावर किंवा ब्लॉगवर दाखविण्यासाठी प्रकाशकाला
(Publisher) गुगलतर्फे पैसे मिळतात. थोडक्यात जाहिरातदार आणि प्रकाशक यांच्यामधील
दुव्याचे काम गुगल अॅडसेन्स मार्फत केले जाते. संकेतस्थळ चालवणार्यांना आपल्या
साईटवरील जागेवर जाहिराती विकून पैसे कमवायचे असतात तर जाहिरातदारांना विविध
विषयांवरील संकेतस्थळावर येणार्या लाखो वाचकांपर्यंत आपल्या उत्पादनाची जाहिरात
पोहोचवायची असते. या दोनही दुव्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम गुगल अॅडसेन्स
करते.
आपण सर्वच गुगल सर्च वापरतो मात्र आपणापैकी बर्याच जणांना गुगल सर्च इंजिन पैसे कसे कमावते ते ठाऊक नसते. गुगल.कॉमचा मुख्य व्यवसाय आहे Advertising म्हणजेच जाहिरातींचा. गुगल सर्च केल्यानंतर आलेल्या परीणामांमध्ये (Search results) वर आणि उजव्याबाजुला ज्या Sponsored links येतात त्या म्हणजे गुगलने दाखविलेल्या जाहिराती असतात. तसेच बहुतांशी वेबसाईट्सवर Ads by Google या नावाने ज्या जाहिराती दिसतात त्या जाहिराती गुगलने दाखविलेल्या असतात.
ईंटरनेटचे साम्राज्य पसरण्याआधी आपण माहिती शोधायसाठी यलो पेजेस (Yellow pages) वापरायचो (आठवतं का?). यलो पेजेस मोफत वाटण्यात येत असे मात्र त्यामध्ये प्रकाशित केलेली माहिती ज्या व्यवसायांची असे त्यांच्याकडून यलो पेजेसचे प्रकाशक पैसे घेत असत.
उदाहरणार्थ - जर "संगणक जोडणी" हा विषय यलो पेजेस मध्ये शोधला तर संगणक जोडणी करणार्या २०-३० उद्योगांची यादी दिसते. या यादीमध्ये सर्वात प्रथम नाव येण्यासाठी व्यावसायिकाला इतरांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागत. या यादीमध्ये पहिल्या, दुसर्या, तिसर्या,चौथ्या ई. क्रमांकावर नाव येण्यासाठी लिलाव (Bidding) पद्धतीने जागा विकल्या जात असत.
गुगलचा व्यवसाय देखिल याच तत्त्वावर आधारीत आहे. वरील उदाहरणाच्या अनुशंगाने पहायचे तर "संगणक जोडणी" हा Keyword आहे. या Keyword शी संबंधीत उद्योग गुगलवर जाहिराती देताना (गुगलवर जाहिराती देण्यासाठी असलेल्या प्रोग्रामचे नाव Adwords असे आहे) "संगणक जोडणी" या Keyword साठी बोली लावतात. त्यानंतर कोणी "संगणक जोडणी" असा सर्च गुगलवर केल्यानंतर सर्च रीझल्ट्सच्या बाजुला जाहिरातदारांच्या जाहिराती (Sponsored links) दिसतात.
मात्र फक्त एवढ्यावर न थांबता गुगल आणखी एक पाउल पुढे गेले आहे. सर्च रीझल्ट्समध्ये आलेल्या लिंक्सपैकी एका लिंकवर क्लिक करुन वाचक त्या विषयाशी निगडीत वेबसाईटवर वळवले जातात. गुगलने या वेबसाईट्सवर देखिल (यालाच Content pages असे म्हणतात) जाहिराती दाखविण्याची हुशारी दाखविली. Ads by Google या नावाखाली बहुतांशी संकेतस्थळांवर जाहिराती दाखविण्यास गुगलने सुरुवात केली. अशा तर्हेने ऑनलाईन जाहिरातींच्या जगतात गुगलचे साम्राज्य पसरविणारा Adsense हा प्रोग्राम अस्तीत्वात आला.
अॅडसेन्स कसे काम करते?
गुगल अॅडसेन्स कसे काम करते हे पाहणे अतिशय रंजक आहे. गुगलच्या या जाहिरातींच्या व्यवसायात प्रामुख्याने तीन व्यक्तींचा (किंवा व्यक्तीसमुहाचा) समावेश असतो.
१. जाहिरातदार (Advertiser) - गुगल अॅडवर्डस प्रोग्राम वापरुन जाहिरातदार गुगलच्या सर्च पानांवर आणि अॅडसेन्समध्ये सहभागी असणार्या वेबसाईट्सवर (Content pages) जाहिराती दाखवितात. जाहिरातदार प्रकाशकांना PPC (Pay per Click) व CPM (Pay per thousand impressions) यापैकी एका प्रकाराने पैसे देतात. (या दोन प्रकारांबाबत अधिक माहिती पुढील लेखात येणार आहे.) जाहिरातदारांना कोणत्या वेबसाईट्स वर जाहिराती दाखवायच्या हे निवडण्याची मुभा असते.
२. वेब प्रकाशक (web Publishers) - वेब साईट चालविणार्या व्यक्ती आणि ब्लॉगर्स म्हणजे वेब प्रकाशक. वेब प्रकाशक गुगलच्या अॅडसेन्स सेवेमध्ये आपल्या ब्लॉगची किंवा संकेतस्थळाची नोंदणी करतात. एकदा अॅडसेन्स जाहिराती दाखविण्याची मंजुरी मिळाल्यानंतर वेब प्रकाशक आपल्या साईटवर जेथे जाहिराती दाखवायच्या आहेत तेथे Google adsense चा javascript code चिकटवतात. जाहिरातींचा आकार, रंग, स्वरुप इत्यादी गोष्टी प्रकाशकांना ठरवता येतात.
३. वेब वाचक - वेब वाचक म्हणजे ब्लॉग आणि संकेतस्थळे वाचणार्या व्यक्ती. (म्हणजे इंटरनेट वापरणारा प्रत्येक जण !). वाचक गुगलवर एखादा Keyword सर्च करतात आणि आलेल्या शोध परीणामांपैकी कोणत्याही एका साईटवर जातात. वाचकांनी या पानांवर दिसणार्या जाहिरातींवर क्लिक केल्यावर (PPC) किंवा फक्त जाहिरात वाचल्यावर (CPM) वेब प्रकाशकाला जाहिरातदारांकडून पैसे मिळतात. या रकमेपैकी काही भाग गुगल आपल्याकडे ठेवते आणि उर्वरीत भाग प्रकाशकांना मिळतो. मात्र जाहिरातदाराला मिळणारी रक्कम ठरविण्याचा फॉर्म्युला गुगलतर्फे गुप्त ठेवण्यात आलेला आहे.
अॅडसेन्स सर्वात यशस्वी का आहे?
गुगल अॅडसेन्स आजपर्यंतेची सर्वाधिक यशस्वी जाहिरात सर्वीस आहे. अॅडसेन्सच्या यशामागील सर्वात महत्वाचे कारण आहे Contextual Ads व Targeted Ads.
थोडं सोप्या भाषेत सांगतो.
वाचक गुगलवर एखादा Keyword सर्च करतात आणि आलेल्या शोध परीणामांपैकी कोणत्याही एका साईटवर जातात. यादरम्यान गुगलने वाचकाबद्दल काही गोष्टी जाणलेल्या असतात. वाचकाने जो Keyword शोधला त्यावरुन सध्या वाचक कोणत्या माहितीच्या अथवा उत्पादनाच्या शोधात आहे, जगामध्ये कुठुन वाचक सर्च करत आहे ती जागा (Geographical location) , वाचकाच्या वेब हिस्ट्री वरुन त्याने यापुर्वी ज्या प्रकारची वेबपाने पाहिली आहेत त्याम्च्याबद्दलची माहिती, ज्या वेबपानावर वाचक आलेला आहे त्या वेबपानावर असलेला मजकुर या गोष्टींचा अॅनॅलिसिस गुगलकडे तयार होतो. आणि या माहितीच्या अनुशंगाने वाचक सध्या वाचत असलेल्या पानावर संबंधीत जाहिराती दाखविल्या जातात.
उदाहरणार्थ - How to calculate EMI in excel? असा गुगल सर्च केल्यानंतर पहिला रीझल्ट नेटभेटचा येतो.
या वर क्लिक करुन नेटभेटवर संबंधीत लेखावर वाचक गेल्यानंतर त्याला ज्या जाहिराती दिसतात त्या EMI, HOME LOAN , EXCEL, Property dealers, builders, property websites अशा विषयांवरच्या जाहिराती दिसतात. जर वाचक भारतातील असेल तर त्यास भारतीय कंपन्यांच्या जाहिराती दिसतील आणि वाचक USA मधुन असेल तर त्यास तेथील संबंधीत कंपन्यांच्या जाहिराती दिसतील (Targeted Ads).
यालाच Contextual ads असे म्हणतात. Contextual ads मुळे जाहिरातदारांना खुप फायदा होतो. कारण जेव्हा वाचक एखाद्या उत्पादनाबद्दल सर्च करतो तेव्हा तो वाचक ते उत्पादन घेण्याच्या विचारामध्ये असतो म्हणजेच तो एक तयार ग्राहक असतो. अशा ग्राहकाला त्याचवेळेस आपल्या उत्पादनाची जाहिरात दाखविल्यामुळे तो लगेचच खरेदी करण्याची शक्यता अधिक असते.
हे झाले जाहिरातदारांबद्दल.
वेब प्रकाशकांना अॅडसेन्स आवडते कारण जाहिरातींसाठी त्यांना कोठेही जावे लागत नाही. नविन जाहिराती शोधणे, बनविणे, ब्लॉगवर चिकटविणे या गोष्टींपासून वेब प्रकाशक मोकळा होतो. एकदा जाव्हास्क्रीप्ट कोड चिकटवला की काम सुरु.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे Contextual Ads मुळे ब्लॉगच्या वाचकांना मदतच होते. उगाच कोणत्यातरी अनावश्यक उत्पादनाची जाहिरात करण्यापेक्षा वाचकांना काही उपयुक्त व संबंधीत माहिती मिळते.
म्हणूनच अॅडसेन्स सर्वात यशस्वी जाहिरात प्रोग्राम आहे.
हा लेख खुपच लांबला त्याबद्द्ल क्षमस्व. (मला अजुनही याबद्दल बरेच काही लिहावसं वाटतंय !) अॅडसेन्सच्या कामाची पद्धत नीट समजावुन घेतल्यामुळे पुढे आपली साईट/ ब्लॉग SEO साठी तयार करण्यात भरपूर मदत होणार आहे.
(या पुढील लेखामध्ये आपण अॅडसेन्स खाते चालू करण्यासंबंधी माहिती व नियम पाहणार आहोत. तेव्हा नेटभेटला भेट देत रहा :-) )
April 07, 2010
"गुगल अॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग एक.)
वाचक आणि ब्लॉगर मित्रांनी मला बर्याच वेळा Google adsense बद्दल माहिती
विचारली होती. Adsense बद्दल मी लवकरच विस्तृत लेख लिहेन असे मी वाचकांना सांगत
होतो, मात्र इतरांना सांगावे इतके गुगल अॅडसेन्सचे ज्ञान मला नाही हे मला माहित
असल्याने या विषयावर लिहिण्याचे मी टाळतच होतो. पण गेल्याच आठवड्यात नेटभेट.कॉमने १०० डॉलर्सचा टप्पा दुसर्यांदा पार केला आणि आता मराठी वाचकांना Google Adsense
बद्दल माहिती आणि युक्त्या मी देऊ शकतो असा विश्वास वाटु लागल्याने मी या विषयावर
लेख लिहिण्याचे ठरविले.
या लेखमालिकेची सुरुवात करण्याआधी मी अॅडसेन्सबद्दल काही गोष्टी येथे नमूद करु इच्छीतो
१. Google Adsense हा सध्या इंटरनेटवर (Online) पैसे कमावण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र अॅडसेन्सद्वारे लक्षाधीश होण्याची स्वप्ने पाहु नका. Google Adsense द्वारे मिळणारे उत्पन्न हे पुरक उत्पन्न या प्रकारात मोडणारे आहे हे लक्षात ठेवा (आणि नोकरी सोडून पुर्णवेळ ब्लॉगींग करण्याचा विचार सध्यातरी सोडून द्या !)
२. अॅडसेन्सद्वारे पैसे मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे (Traffic) ब्लॉगची वाचकसंख्या. जेवढी जास्त वाचकसंख्या तेवढे जाहिरातींद्वारा मिळणारे पैसे अधिक. पण वेब ट्रॅफिक येण्यासाठी आणि ब्लॉग/वेबसाईटला जास्तीत जास्त Visits मिळण्यासाठी चांगले व सातत्यपुर्ण लेखन करणे आवश्यक आहे. आणि चांगले, अभ्यासपुर्ण आणि उपयोगी लेखन करून पैसे कमावण्यासाठी कमालीचा संयम असणे आवश्यक आहे.
३. Google Adsense सध्या जगभरातील ३२ भाषांमधील संकेतस्थळांना अॅडसेन्ससाठी मंजुरी देतात. दुर्दैवाने या यादीत "मराठी" भाषेचा समावेश नाही आहे. (कोणत्याच भारतीय भाषेचा यात समावेश नाही आहे.) त्यामुळे मराठी भाषेतील वेबसाईट्स आणि ब्लॉग्जना Google Adsense च्या जाहिराती मिळत नाहीत.
(वाचकहो हे वाचुन निराश होऊ नका. ब्लॉग मराठी भाषेत असला तरी Google Adsense जाहिराती दाखवता येतात आणि त्यापासून पैसे देखिल कमावता येतात हे नेटभेट.कॉमने दाखवून दिले आहेच ! या लेखमालिकेच्या शेवटापर्यंत, हे वाचणार्या सर्व मराठी ब्लॉगर्सचे अॅडसेन्सद्वारे उत्पन्न सुरु झालेले असेल याची मी खात्री देतो. अर्थात उत्पन्न किती असेल ते तुमच्या ब्लॉग ट्रॅफीकवर अवलंबुन आहे.)
४. अॅडसेन्स आणि SEO हे दोनही वेगवेगळे आणि अथांग विषय आहेत. मात्र हे दोनही विषय एकमेकाला पूरक असल्याने त्यांची सखोल माहिती करुन घेणे खुपच चांगले. या लेखमालिकेमध्ये SEO बद्दल दोन स्वतंत्र प्रकरणे असणार आहेत.
५. अॅडसेन्स कसे काम करते किंवा Google Adsense पासून मिळणारे उत्पन्न कसे ठरवले जाते याबद्दल खुप कमी माहिती गुगलने उपलब्ध करून दिली आहे. जगभरच्या वेब-गुरूंनी याच गोष्टीचा फायदा उचलुन Adsense व SEO बद्दल बरेच काही लिहिलं आहे. मात्र याची सत्यासत्यता स्वतः पडताळून पाहणे गरजेचे आहे.
६. मी स्वतःदेखिल या लेखमालिकेत फक्त स्वतःच्या अनुभवावरून मिळविलेली माहिती येथे देणार आहे. या लेखांमध्ये मी मांडलेले तर्क अगदी १००% खरी आहेत असा दावा मी करणार नाही. परंतु ती सर्व मराठी ब्लॉगर मित्रांना उपयुक्त ठरतील हे मी निश्चीतपणे सांगु शकतो.
७. Google Adsense ची शास्त्रशुद्ध माहिती देण्यापेक्षा गुगल अॅडसेन्स मराठी ब्लॉग्जकरीता कसे वापरावे? या गोष्टीवर मी या लेखमालिकेत भर देणार आहे. या संबंधी मी केलेले प्रयोग आणि वापरलेल्या युक्त्या आपण येथे पाहणार आहोत.
मित्रहो, हा फक्त प्रास्ताविकाचा लेखच इतका लांबला यावरुन Google Adsense चा आवाका आपल्या लक्षात येईल. मी माझ्या ब्लॉगर मित्रांना आणि वाचकांना आवाहन करु इच्छीतो की या लेखमालिकेपासून आपल्या काही अपेक्षा असतील, काही अडचणी असतील किंवा मी मांडलेली माहिती कळायला खुप अवघड असली तर लेखाच्या कमेंट्समध्ये किंवा यापुढील लेखांच्या कमेंट्समध्ये मला जरुर लिहा.
हा महत्त्वाचा भाग मराठी ब्लॉगींग व्यापक स्वरुपात वाढण्यास मदत करु शकतो आणि म्हणूनच हा प्रास्ताविकाचा लेखप्रपंच !
(या लेखमालिकेतील पुढील लेख लवकरच येत आहे................So....Stay Tuned !)
Image Credit
April 04, 2010
Create forms for blog, online survey forms with Google docs
असो. आजचा आपला विषय गुगल डॉक्सविषयी असला तरी ही प्रस्तावना विषयाला धरुन नाही. मात्र गुगल डॉक्सची ताकद वाचकांना लक्षात यावी म्हणून हे सांगावंसं वाटलं.
आज आपण माहिती घेणार आहोत गुगल डॉक्स मधील Forms या सुविधेची.
ऑनलाईन सर्वे घेण्यासाठी, ब्लॉगच्या वाचकांकडून काही माहिती घेण्यासाठी, मित्रमंडळींमध्ये एखादा कार्यक्रम ठरवुन प्रत्येकाची उपस्थीती आणि कार्यक्रमासंबंधी काही प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी , ब्लॉग किंवा वेबसाईटवर संपर्काचे पान बनविण्यासाठी (Contact us) अशा अनेक गोष्टींसाठी गुगल डॉक्स वापरता येते.
उदाहरणार्थ ब्लॉगकट्टा (http://blogkatta.netbhet.com) या संकेतस्थळावर नोंदणी करणार्या ब्लॉगर्सची माहिती गोळा करण्यासाठी मी बनविलेला हा गुगल फॉर्म पहा.
गुगल डॉक्स मध्ये फॉर्म बनविण्याची पद्धत पाहण्याआधी आपण गुगल फॉर्मचे फायदे काय आहेत ते पाहुया -
१. गुगल डॉक्स मधील फॉर्म्स मध्ये भरलेली सर्व माहिती आपोआप स्प्रेडशीट (एक्सेलसारखे) मध्ये साठविली जाते. त्यामुळे ही माहिती एकत्रीतपणे हाताळणे सोपे जाते.
२. फॉर्म बनविल्यानंतर ब्लॉगपोस्ट मध्ये चिकटवता येतो (Embed) किंवा ईमेल द्वारे सर्वांना पाठविता येतो.
३. गुगल काकांनी उपलब्ध करुन दिलेल्या असंख्य टेम्प्लेट्स मधुन निरनिराळ्या टेम्प्लेट्स निवडून फॉर्म्स सजवता येतात.
४. CSS कोडचे ज्ञान असल्यास आपल्याला हवा तसा फॉर्म बनवता येतो.
५. कोणीही फॉर्म भरल्यानंतर त्याची माहिती (Alert) लगेचच ईमेलद्वारे मिळवता येण्याची सोय आहे.
६. दिलेल्या पर्यायातुन एक पर्याय निवडणे (Multiple choice), दिलेल्या पर्यायातुन एक किंवा अधिक पर्याय निवडणे (Checkbox) , प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणे (Text) असे उत्तरांचे प्रकार गुगल फॉर्ममध्ये ठरवता येतात.
७. प्रश्नावलीमधून काही प्रश्न अनिवार्य करण्याची सोय देखिल यात आहे.
मी फक्त काही मोजके व उपयुक्त फायदेच येथे दिले आहेत. एकदा तुम्ही गुगल डॉक्सच्या दुनियेत शिरलात तर तुम्हाला खुप नविन गोष्टी कळून येतील.
गुगल डॉक्स मध्ये फॉर्म्स बनवायची पद्धत -
१. http://docs.google.com वर जाउन आपल्या जीमेल आयडीच्या सहाय्याने लॉग-इन करा.
२. आधी Create new आणि नंतर Form वर क्लिक करा. खालीलप्रमाणे फॉर्मचा साचा दिसेल.
३. या फॉर्ममध्ये वरच्या बाजुला असलेल्या बटणांच्या सहाय्याने फॉर्मची डिझाईन (Template) , मजकुर, प्रश्नांचे प्रकार इत्यादी ठरवता येतात. तसेच फॉर्म ईमेल किंवा embed करण्यासंबंधीचे पर्याय निवडता येतात.
गुगल डॉक्स मधील फॉर्म्सचा उपयोग करुन पहा. आणि आपले अभिप्राय येथे देण्यास विसरु नका.









































