October 29, 2010

Netbhet eMagazine October 2010

नेटभेट ई-मासिक ऑक्टोबर २०१० प्रसिद्ध झाले. वाचकहो, तिन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नेटभेट ईमासिक पुन्हा आपल्या भेटीसाठी आले आहे. आणि ऑक्टोबरच्या या अंकांचे संपादन केले आहे साता समुद्रापार राहणार्‍या आपल्या सर्वांच्या आवडत्या ब्लॉगर मित्राने, हेरंब ओक याने. (Harkatnay.com)



नेटभेटच्या या अंकासाठी हेरंबने लिहिलेले "संपादकीय" येथे देत आहे. मला खुप आवडलेले हेरंबचे आगळे वेगळे संपादकीय आणि हेरंबने मराठी ब्लॉगविश्वातून हिर्‍यामोत्यांसारखे शोधुन काढलेले लेख तुम्हा सर्वांना देखिल नक्कीच आवडतील.


जेव्हा आपल्याला एखादा लेख, कविता, स्फुट, ब्लॉगपोस्ट, उतारा प्रचंड प्रचंड आवडतो, आपण त्याच्या प्रचंड प्रेमात पडतो तेव्हा आपण काय करतो? तेव्हा तो लेख आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी लोकांना मेल करतो, बझ करतो, फोनवरून कळवतो, फेसबुकवर टाकतो, ऑर्कट स्टेटस अपडेट करतो, ट्वीटचा चिवचिवाट करतो. अधिकाधिक लोकांनी ते वाचलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं कारण लेख वाचून आपण जसे भारावून गेलेलो असतो, आनंदी झालेलो असतो, हसलेलो असतो, टाळी दिलेली असते, डोळ्याची कड हळूच पुसलेली असते, "आपल्याला असं लिहिता आलं असतं तर काय मजा ('जहाजा'तला ज) आला असता यार !!" असा विचार केलेला असतो किंवा क्वचित प्रसंगी आपल्या काळजात जशी एक किंचितशी कळ आलेली असते तो अनुभव , अगदी तसाच्या तसा अनुभव आपल्या सुहृदांना, समविचारी मित्रमैत्रिणींना यावा असं आपल्याला मनापासून वाटत असतं. पण तरीही आपण किती लोकांपर्यंत पोचणार? शंभर? दोनशे? पाचशे ? बास एवढेच... यापेक्षा अधिक खचितच नाही. पाचशे पेक्षा जास्त *चांगले* मित्रमैत्रिणी असलेल्या व्यक्तीचा मी आजन्म गुलाम म्हणून राहायला तयार आहे. असो. तर या अशा 'सोसल 'नॉट'वर्किंग' च्या माध्यमातून जरी आपण पाचशे किंवा समजा अगदी हजार लोकांपर्यंत आपली आवड पोचवली पण तरीही आपल्या यादीत नसलेल्या अन्य हजारो लाखो लोकांचं काय?.. तर या अशा 'काय?' वाल्या प्रश्नाचा आपण फक्त विचारच करत असताना किंवा कदाचित तोही करत नसताना सलील आणि प्रणवने तो विचार प्रत्यक्षात आणून दाखवला. काय केलं त्यांनी? त्यांनी एक सही काम केलं.. नियमित नव्या लेखनाची प्रचंड वेगाने भर पडत असलेल्या मराठी ब्लॉगजगतातल्या निवडक उत्कृष्ट लेखांचं एकत्रीकरण करून दर महिन्याला ते नेटभेटच्या इ-मासिक रुपात प्रकाशित करायला सुरुवात केली. यामुळे झालं काय की नियमितपणे जालावर नसणार्‍या तस्मात असे उत्तमोत्तम ब्लॉग्ज/लेख नियमित वाचू न शकणार्‍या अनेक लोकांना 'अ‍ॅट यॉर फिंगरटिप्स' म्हणतात तसं एका टिचकीसरशी हे लेख इ-पुस्तकाच्या स्वरुपात आपल्या मेलबॉक्स मध्ये मिळवून वाचण्याची सोय झाली. बघता बघता नेटभेट इ-मासिक ही कल्पना सुपरहिट झाली. लोकांना दर महिन्याला नवनवीन लेखन वाचायला मिळायला लागलं, नेटभेटचे वाचक वाढत गेले, वाचकसंख्येने एक लाखाचा आकडा पार केला, इ-मासिकांत लिहिणार्‍या ब्लॉगर्सना नित्य नवीन वाचक लाभत गेले.

एक दिवस सकाळी माझ्या मेलबॉक्समध्ये सलीलचं मेल चमकलं. उघडून बघतो तर चक्क नेटभेटच्या ऑक्टोबर अंकासाठी अतिथी संपादकपद स्वीकारण्याची विनंती. मध्यंतरी २-३ महिने कार्यबाहुल्यामुळे सलील/प्रणवला नेटभेटसाठी वेळ काढणं शक्य होत नव्हतं याची कल्पना होती. तसंच सलीलच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या ब्लॉगरने संपादकपद स्वीकारून स्वतः लेख निवडून अंक काढला तर तो नक्कीच वाचनीय होईलच. आपण सुरुवातीला जे वाचत होतो, कालांतराने ज्यात आपले लेख यायला लागले त्या मासिकाचा अतिथी संपादक म्हणून काम पाहणं ही कल्पना एकदम मस्त होती. मी ताबडतोब होकार कळवला. सलीलशी फोनवर बोलून अंक कसा अपेक्षित आहे, काय करायचं/काय करायचं नाही पक्षि 'डूज अँड डोंटस' (डोंटस असे काही नव्हतेच खरं तर) वगैरे वगैरेवर चर्चा झाली.. आणि बरोब्बर त्याच वेळी माझा *लाडका* बॉसबाबा माझ्या मदतीला धावला. म्हणजे थोडं (अधिकच) जास्तीचं आणि नवीन काम मागे लावून. पुढच्या ४-५ दिवसांत तर काम इतकं वाढलं की "मी का या अंकासाठी 'हो' म्हणालो, अंक (माझ्याच्याने) निघणार तरी आहे का" असं वाटायला लागलं. पण आठेक दिवसांत बाबा जरा थंड झाला आणि मी ऑक्टोबरात अपडेट झालेले आणि माहित असलेनसलेले जवळपास सगळे ब्लॉग्ज पालथे घालायला सुरुवात केली. पालथे घातले, भ्रमंती केली, डेरे टाकले, पडीक राहिलो काय हवं ते म्हणा. एकेक ब्लॉग, एकेक लेख पूर्वी नुसतं वाचक म्हणून वाचताना आणि आता तात्पुरत्या का होईना पण अतिथी संपादकपदाच्या चष्म्यातून म्हणून वाचताना माझ्या दृष्टीकोनात फरक पडला एवढं नक्की जाणवलं. म्हणजे नक्की काय ते मला माझ्या तोकड्या शब्दसामर्थ्यामुळे कदाचित व्यवस्थित समजावून सांगता येणार नाही. पण दृष्टीचे कोन निराळे होते हे नक्की जाणवलं.

अमाप शब्दसागरातून निवडक लखलखते मोती वेचून आणले किंवा साहित्याच्या विशाल आसमंतातून अविरत तळपणारे तेजोगोल निवडून काढले असली जडजंबाळ वाक्यरचना टाळून एवढंच सांगतो की एकापेक्षा एक भार्री सरस लेख गवसले. जगावेगळ्या माणसांवरचे महेंद्र कुलकर्णी आणि चंद्रशेखर आठवले यांचे झपाटून टाकणारे लेख असोत किंवा अम्माच्या खडतर जीवनप्रवासाच्या पुस्तकावरचा तन्वीचा लेख असो किंवा मग खैरेखेडीतल्या नागरी जीवन आणि सुधारणांपासून शेकडो योजने दूर असलेल्या लोकांच्या खडतर आयुष्याचं वर्णन करणारा सविताताईंचा लेख असो... वाचता वाचताच भारून टाकणार्‍या रोहनच्या सप्त शिवपदस्पर्शाच्या लेखमालेचा अखेरचा भाग असो की सत्तापिपासू अमेरिकेचा बुरखा फाडणार्‍या निर्भीड वेबसाईटविषयी माहिती देणारा विद्याधरचा लेख असो की एका लढवय्याच्या अखेरच्या प्रवासाची डोळे पाणावणारी सौरभची कहाणी असो.. चार रंगांना लघुकथांत गुंफणारी सुषमेयची लघुकथामाला असो वा नारीचं दुर्गेच्या विविध रूपांशी असलेलं साधर्म्य दाखवणारं जास्वंदीचं स्फुट असो किंवा मग लहान मुलं ज्यांच्या तालावर नाचतात त्या बडबडगीतांच्या मागची कांचनने सांगितलेली दुःखद कहाणी असो... किंवा मग रोजच्या धावपळीत ओठांचे कंस सुलटे करण्यास भाग पाडणारी अपर्णाची सॉफ्टवेअर कामगाराची हलकीफुलकी कहाणी असो किंवा धो धो हसून मुरकुंडी वळवणारी गुरुदत्तची मुंबई-पुणे सायकल ट्रीप असो... हे सगळं एकापेक्षा एक आहे.. विलक्षण आहे.. सरस आहे.. ऑस्सम आहे.. जबरा आहे.. लय भारी आहे.

हे सगळे माझे प्रचंड आवडते लेख आहेत या महिन्यातले. या सगळ्या लेखांचा आणि लेखकांचा मी निर्विवाद चाहता आहे. हे लोक तसेही लिहितातच मस्त पण सुदैवाने माझ्या टाळक्यावर संपादकपदाची टोपी असताना यांनी हे एवढे छान लेख लिहिणं आणि मला ते आपल्या या महिन्याच्या अंकात समाविष्ट करायला मिळणं हा माझा बहुमान आहे का ते माहित नाही किंवा माझं सदभाग्य आहे का याचीही कल्पना नाही पण हे लेख घेता आल्याने प्रचंड आनंद झाला, समाधान लाभलं एवढंच सांगतो.

आणि हो जाताजाता.. यात माझाही एक लेख आहे. पण यात खुर्चीचा, सत्तेचा, पदाचा गैरवापर वगैरे अजिबात काही नाही हो.. कारण हा खरंच माझा मला खूप आवडलेला लेख आहे.. आणि आता ही आत्मप्रौढी वगैरेही नाही. आपण मित्राला ट्रेकचे किंवा असेच कुठलेही फोटो दाखवताना म्हणतो ना की "हा बघ .. माझा हा फोटो एकदम मस्त आलाय.." तर त्याला कोणी आत्मप्रौढी/आत्मस्तुती म्हणेल का? नाही ना? तर हाही त्यातलाच प्रकार आहे..

"हा अंक वाचकांच्या हातात देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे" किंवा "हा आम्ही आमचा बहुमान समजतो" वाली टिपिकल वाक्य नसणारं, सलीलच्या नेहमीच्या स्वतःच्या शैलीत लिहिलेलं संपादकीय वाचायची सवय असलेल्या आणि त्यामुळेच हे असलं उथळ, पाचकळ संपादकीय (!!) वाचून उरलेला अंक न वाचण्याचं जवळजवळ नक्की केलेल्या बा वाचकांनो !!!!! असं प्लीज करू नका. असं केलंत तर तो या चतुरस्त्र लेखन करणार्‍या लेखकांवर, त्यांच्या लेखांवर आणि सगळ्यांत महत्वाचं सांगायचं तर तुम्हा स्वतःवर भलामोठा अन्याय ठरेल. 'शितावरून भाताची परीक्षा' वाले नियम सगळ्या ठिकाणी लावायचे नसतात हो. तेव्हा उलटा पानं, करा सुरुवात वाचायला आणि फडशा पाडा याही अंकाचा.

तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! दिवाळीच्या शुभेच्छा देऊन हे लांबलेलं संपादकीय संपवण्यापूर्वी एकच सांगतो. हा दिवाळी अंक नाही पण तरीही शुभेच्छा मात्र अस्सल बावनकशी आणि मनापासून आहेत.. त्या दिवाळीपर्यंत पुरवा.. कारण पुढच्या महिन्यातला दिवाळी अंक घेऊन येणारी संपादक व्यक्ती माझ्यापेक्षा चिक्कार सिनियर आहे. दर्जेदार लिहिणारी आहे. त्यामुळे पुढच्या अंकाची वाट आत्तापासूनच पाहायला लागा.. चला भेटूच... अंकाच्या पानापानांत !!



-हेरंब ओक
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 16, 2010

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्व मराठी बांधवांना 'नेटभेट' परिवारातर्फे,


" विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ! "










Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 15, 2010

म्युझिक, मशिन्स अँड लाइफ.......

तीन-चार महिन्यांपुर्वी मी युट्युबवर एक व्हीडीओ पाहिला होता. तो व्हीडीओ एवढा भन्नाट होता की या व्हीडीओ बद्दल एक लेख नेटभेटवर लिहायचा हे मी लगेचच ठरवून टाकले होते. पण नंतर काही कारणाने त्या व्हीडेओबद्दल लिहायला जमले नाही (मध्यंतरी नेटभेटवर लिखाण अगदी बंदच झाले होते) आणि काही काळाने या व्हीडीओबद्दल विसरुनही गेलो.

आज एका वेगळ्याच विषयावर लेख लिहायला घेतला होता आणि अचानक या व्हीडीओची आठवण आली. मग काय About turn, विषsssय बदल.:-)

मित्रांनो ज्या व्हीडीओबद्दल मी बोलत आहे तो व्हीडीओ आहे “This Too Shall Pass.” या गाण्याचा. "Ok Go" या म्युझिक बँडच्या “This Too Shall Pass.” या गाण्याचा व्हीडीओ म्हणजे एक अखंड मशिन आहे. हे मशिन रुब गोल्डबर्ग (Rube Goldberg) या नावाने प्रसिद्ध असलेल्या मशिनचा एक प्रकार आहे. रुब गोल्डबर्ग मशिन म्हणजे एखादी सोपी गोष्ट करण्यासाठी मुद्दामहून अतिशय गुंतागुंतीचे आणि किचकट बनविलेले मशिन. खालील चित्र पाहिल्यावर रुब गोल्डबर्ग मशिन म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल.

अ‍ॅडम सॅडोस्की (Adam Sadowsky) हा उद्योजक व त्याची कंपनी Syyn Labs मधील कर्मचार्‍यांनी मिळून हे मशिन तयार केले आहे. हे मशिन तयार करण्यासाठी अ‍ॅडम सॅडोस्कीला काही पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या. पहिलं म्हणजे यामध्ये कोणतेही स्पेशल इफेक्ट किंवा संगणकाच्या सहाय्याने निर्माण केलेले कृत्रीम भास नसावेत, संपुर्ण मशिनची हालचाल गाण्याच्या ठेक्यासोबत सुसंगत रहायला हवी, मशिनने काही मोजके बीट्स वाजवून गाण्यात भाग घेतला पाहिजे, मशिनचं काम अगदी गाण्याच्या सोबतच बंद झाले पाहिजे आणि या सर्व अटी कमी होत्या की काय म्हणून अ‍ॅडम सॅडोस्कीला हा व्हीडीओ एकाच प्रयत्नान पुर्ण करण्याची सूचना देण्यात आली होती.
खाली दिलेला पहिला व्हीडीओ “This Too Shall Pass.” या गाण्याचा आहे आणि दुसर्‍या व्हीडीओमध्ये हे मशिन बनवण्याची कथा खुद्द अ‍ॅडम सॅडोस्की प्रेक्षकांना सांगत आहे.
 



सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अ‍ॅडम सॅडोस्कीने हे मशिन बनवताना आलेल्या अनुभवांचा जीवनात कसा उपयोग करुन घेता येईल हे देखिल सांगितले आहे. त्याची शिकवण त्याच्याच शब्दात मांडायचा मी प्रयत्न केला आहे.
-       लहान वाटणार्‍या. गोष्टीच सर्वाधिक त्रासदायक ठरतात. - मी आयुष्यात अनेकदा लहान सहान गोष्टींसाठी त्रासलेला असायचो, पण हे मशिन बनविताना लक्षात आले की लहान वाटणार्‍या गोष्टीच सर्वात महत्त्वाच्या असतात त्यामुळे मी बारिक-सारिक गोष्टींवर लक्षपूर्वक काम करु लागलो.

-       नियोजन खुप महत्त्वाचे आहे - मी नियोजनात बर्‍यापैकी चांगला असलो तरी बर्‍याचदा ऐनवेळी उस्फुर्तपणे काही गोष्टी करण्याकडे माझा कल असायचा मात्र “This Too Shall Pass.” करताना मला मला जाणवले की कोणतीही गोष्ट सुनियोजित नसली तर तिचे अंतिम परीणाम कधीच चांगले नसतात.

-      आयुष्य खुप गुंतागुंतीचं असते -  तणाव, आर्थिक अडचणी, कौटुंबीक प्रश्न या सगळयांमुळे आयुष्य खुप गुंतागुंतीचं होउन जाते मात्र या गुंतागुंतीचे उत्तर त्यातच दडलेले असते.
-      This too shall pass. हे माझे अतिशय आवडते बोल आहेत. अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाताना मला या शब्दांनीच धीर दिला आहे. 
हे मशिन बनविण्यामागची कल्पनाशक्ती, इंजीनीअरींगचे कौशल्य, भौतीकशास्त्राची सांगड, कमालीचा संयम या गुणांचे मिश्रण असलेल्या “This Too Shall Pass.” या गाण्याचा व्हीडीओ म्हणजे म्युझिक, मशिन्स अँड लाइफ या तीन मुख्य संकल्पनांचा परमोच्च बिदू आहे. 

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

October 14, 2010

विजेटची सही रे सही :- विजेटच जोडा आपली स्वाक्षरी म्हणून ... (How to add image signature in gmail )

विजेटची सही म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. आपण नेहमीच जीमेल मध्ये Signature हा पर्याय वापरतो, त्यातून आपले नाव, आपल्या साईटचे नाव ईत्यादींची माहिती आपल्याला फक्त शब्दस्वरूपात देता येते.याचा वापर आपल्यापैकी बरीच जणं करत असतील मी ज्या ऑफीसमध्ये काम करतो तिकडे दररोज १०० -१५० मेल मला बघावे लागतात. त्यातील एका मेल मध्ये मला चक्क एका माणसाची सही दिसली आणि त्याखाली त्याच्या कंपनीचा लोगो सुद्धा होता त्यावर मी क्लिक तर थेट त्या कंपनीच्या साईटवर गेलो म्हणजे. मी विचार केला की आपण सुद्धा जर आपल्या प्रत्येक मेलच्या शेवटी अशी रंगेबेरंगी सही दिली तर किती बरे होईल ना !!! मग काय भ्रमंती सुरु झाली इंटरनेटवर आणि एक भन्नाट युक्ती सापडली. आता माझी काही स्वतःची स्कॅन केलेली अशी सही नाही, मग काय करावे बरे असा विचार डोक्यात आला. मग ठरवले की आपले विजेटच जोडू की सही म्हणून काय फरक पडणार अहे त्याने ? तसेच य युक्तीचा दुसरा एक फायद म्हणजे असा की तुम्हाला हव्या त्या मेल्सनाच तुम्ही ही सही जोडू शकता, जी सुविध Signature या पर्यायाअंतर्गत नाही आहे (एकदा पडताळू पाहा.).
आता ही युक्ती कशी शिकायची ते बघुया.

जीमेल ला लॉगिन झाल्यावर डाव्या हाताला वरती Settings हा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करा.



तुमच्या समोर settings या पर्यायाअंतर्गत उपलब्ध असलेल्या अनेक उलाढालींचा तक्ता दिसेल. त्यातून आपल्याला Labs हा पर्याय निवडायचा आहे.


 Labs या पर्यायाअंतर्गत तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यातून तूर्तास आपल्या कामाचे फक्त दोनच पर्याय आहेत  बरं का ! बाकीच्यांकडे ढूंकून पण बघू नका. नाहीतर कदाचित गोंधळून जाल तुम्ही. कोणते दोन पर्याय आपल्याला निवडायचे आहेत ते आता सांगतो मी तुम्हाला पहिला म्हणजे Canned Responses आणि दुसरा Inserting images. हे दोन्ही पर्याय तुम्हाला Enable करावे लागतील. आधी आपण Canned Responses हा पर्याय Enable करुया.



आता अशाच प्रकारे दुसरा Inserting images हा पर्याय Enable करुया.



हे दोन्ही पर्याय Enable करून झाल्यावर Save Changes या बटणावर क्लिक करा.



तुम्ही Save Changes या बटणावर क्लिक केले की तुमचे ई मेल अकाऊंट आपोआपच रिफ्रेश होईल. आपल्याला कंपोस मेल मध्ये जाऊन आपल्याला हवी तशी सही बनवायची आहे. त्या साठी जसे तुम्ही आधी Signature साठी नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक , इत्यादी लिहत होता तसेच लिहायचे आहे.आणि हव्या त्या इमेज सुद्धा त्यात तुम्ही टाकू शकता, खालील आकृतीत मी २ इमेजेस / विजेट्स टाकून एक प्रोफेशनल signature बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही तुमची अधिक कल्पकता वापरून हवी तशी सही (signature) बनवू शकता. तुम्हाला हवी तशी सही ब्नवून झाल्यावर Canned responses हा पर्याय निवडा आणि New canned response... वर क्लिक करा.

 New canned response... वर क्लिक केल्यावर तुम्हाला ही सही सेव्ह करण्यासठीचा पर्याय सापडेल. तुम्ही हवे ते नाव देऊन, OK या बटणावर क्लिक करून ही सही सेव्ह करा.



आता तुमची सही विजेट सकट तयार झालेली असेल. तुम्हाला जर हवी असेल तर आणि तरच ही सही तुम्हाला हव्या त्या मेलला तुम्ही जोडू शकता अशी तरतूद आहे, म्हणजे Signature सारखे प्रत्येक मेलला आपोआप Signature  दिसण्याची भानगडच नाही ना काय !
मग आता हवा तसा मेल लिहा आणि Canned responses वर क्लिक करून Insert या नावा अंतर्गत असलेला तुम्ही सेव्ह केले पर्याय निवडा. तुम्हाला जर एखाद्या मेलला रिप्ल्याय द्यायचा आसेल किंवा एखादा आलेला मेल स्व्तःच्या थोपवून फोरवर्ड करायचा असेल तरी ही युक्ती अंमलात आणता येईल.

आपल्या ई मेलला एक प्रोफएशनल लूक देण्यासाठी ही युक्ती नक्कीच वापरता येईल असे मला वाटते, अर्थात तुम्ही त्यात किती क्ल्पकता आणि प्रोफेशनेलिटी वापरता यावर देखील ते अवलंबून असेल. असो तूर्तास ही भन्नाट युक्ती तुम्हाला कशी वाटली हे मला आपल्या प्रतिक्रियांद्वारे जरूर सांगा.
तसेच तुमच्या काही सूचना आणि समस्या असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोहोचवा .

प्रथमेश शिरसाट                   http://www.lekhaankan.co.cc/ / prathmesh.shirsat@gmail.com


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Related Posts with Thumbnails