January 31, 2011

टुक टुक मीटर - India’s first GPS based Auto Meter.

लोकल ट्रेन आपल्याला स्टेशन्स पर्यंत सोडतात, बस आपल्याला बस थांब्यांपर्यंत सोडतात. पण आपल्याला हव्या त्या ठीकाणी हव्या त्या वेळेला पोहोचवणारे एकमेव वाहन म्हणजे ऑटो रिक्षा. पुर्ण भारतभर ऑटो रीक्षा हे प्रवासाचं एक मुख्य माध्यम आहे. पण या सोयीस्कर वाहनाबरोबर रीक्षाचालक नावाचा एक प्राणी देखिल असतो. प्रवासासाठी जेवढा विश्वास आपण रीक्षावर टाकतो तेवढाच विश्वास रीक्षाचालकावर आणि त्याच्या मीटरवर टाकता येत नाही. रीक्षाचा मीटर बरोबर आहे की नाही? हा रीक्षावाला अधिक पैसे घेऊन आपल्याला फसवत तर नाही ना? हे प्रश्न आपल्याला प्रवासात सतावत असतात. आपल्या याच अडचणीवर एक उपाय केरळ मधीले MindHelix Technologies या एका कंपनीने शोधला आहे. या उपायाचे नाव आहे टुक्-टुक मीटर (Tuk Tuk Meter). टुक टुक मीटर आहे एक मोबाईल ऑटो रीक्षा मीटर.

GPS (Global Positioning System ङ्लोबल पोझीशनींग सीस्टम) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रीक्षाचे अचुक भाडे मोजण्याचे काम टुक्-टुक मीटर करते. हे एक मोबाईल अप्लिकेशन आहे. अँड्रॉईड (Android), ब्लॅकबेरी (Blackberry) आणि सींबीयन (Symbian) यापैकी कोणतीही ऑपरेटींग सीस्टम असलेल्या स्मार्टफोन्स मध्ये हे अप्लिकेशन काम करते.

कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहिती नुसार खालील ऑपरेटींग सीस्टम्सवर टुक्-टुक मीटर हे अप्लिकेशन वापरता येते.


Android2.1 (Eclair), Android 2.2 ( Froyo ) or above
BlackBerry (OS v4.5,v4.6,v4.7, v5.0)
Symbian S60v3 or S60v5 phones with GPS
Other smart phones which have support for GPS and Java

टुक्-टुक मीटर साठी ईंटरनेट जोडणीची आवश्यकता नसते. (हो तुम्ही बरोबर वाचलत ! तुमच्या फोनला ईंटरनेट जोडणी नसेल तरीही टुक्-टुक मीटर  चा वापर करता येतो.)  हे अप्लिकेशन वापरण्यास अतीशय सोपे आहे.यामध्ये केवळ Start (सुरु) आणि Stop (बंद) अशी दोन बटणे असतात. अप्लिकेशन वापरण्या आधी सेटींग्जमध्ये आपल्या शहरासाठीचा प्रतीमीटर रीक्षादर एकदा सेव्ह (Save) केला की हे अप्लिकेशन वापरण्यास तयार होते. यामुळेच भारतातील कोणत्याही शहरामध्ये याचा वापर करता येतो.

रिक्षा सुरु झाल्यावर टुक्-टुक मीटरचे Start बटण दाबायचे आणि रिक्षा थांबल्यावर Stop बटण दाबायचे. बस ! एवढंच करायचं आहे. टुक्-टुक मीटर लगेचच तुम्ही कापलेले अंतर आणि रिक्षाभाडे मोबाईलवर दाखवेल. अगदी दूरच्या गावांमध्येही हे अप्लिकेशन उत्तम काम करते असा कंपनीचा दावा आहे.

मित्रहो, नुसतेच स्मार्ट फोन बाळगण्यात अर्थ नाही. त्याचा वापरही तितक्याच स्मार्टपणे करा. टुक्-टुक मीटर हे अप्लिकेशन आपल्या मोबाईलसाठी आजच डाउनलोड करा. यासाठी http://tuktuk.mindhelix.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.












Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

January 28, 2011

"शरथ बाबु" - एक प्रेरणादायी उद्योजक

 जे लोक स्वप्न पाहतात आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ती पुर्ण करण्यासाठी धडपडतात अशा लोकांना नियती किंवा परीस्थीती कधीच बांधून ठेवु शकत नाही. आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करताना वाटेत कितीही अडथळे आले तरी विचलीत न होता जे मार्गक्रमण करत असतात तेच आयुष्यात यशस्वी होतात. शरथ बाबु नावाच्या चेन्नई येथील एका मुलाने आपल्या दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर सर्व संकंटांवर मात करत स्वतःच एक मोठे स्वप्न पुर्ण केलं. अतीशय गरीब घरात, चेन्नईच्या एका झोपडप्ट्टीत जन्मलेल्या शरथने BITS PILANI मधून इंजीनीअरींग आणि IIM Ahmedabad मधून MBA चे शिक्षण पुर्ण केले. आज तो एक यशस्वी उद्योजक आणि 'फुडकिंग' (Foodking) या कंपनीचा मालक आहे. २००८ साली 'पेप्सी युथ आयकॉन' (आदर्श तरुण) म्हणून शरथला सन्मानीत करण्यात आले होते.

शरथचा जन्म चेन्नई येथील माडीपक्कम मधील झोपडपट्टीत झाला. त्याला दोन मोठया बहिणी आणि दोन लहान भाऊ आहेत. शरथच्या आईने खुप मेहनतीने आपल्या पाच मुलांना वाढविले. त्यांच्या घरामध्ये कमावणारी ती एकमेव व्यक्ती होती. शरथची आई सकाळी ईडल्या विकत असे, दुपारी सरकारी शाळांमध्ये मुलांना दुपारी जेवण देण्याचे काम करत असे आणि संध्याकाळी प्रौढ शिक्षण वर्गामध्ये शिकवत असे. अशी तीन कामे करुन देखिल पाच मुलांना शिकवीणे आणि वाढविणे खुप जिकीरीचे काम होते. एवढी वाईट परीस्थीती असुनही शरथने कधीही आपल्या स्वप्नांवर पाणी फिरु दिले नाही.

चेन्नई येथील किंग्ज मॅट्रीक्य्लेशन हायर सेकंडरी स्कूल मधून शिक्षण घेतल्यानंतर पुढे शरथने BITS Pilani या नामवंत संस्थेमधून केमीकल ईंजीनीअरींगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ३ वर्षे त्याने पोलारीस सॉफ्टवेअर या कंपनीमध्ये काम केले. मात्र पुढे शिकण्याची जबरदस्त ईच्छाशक्ती त्याला IIM Ahemadabad  ला घेऊन गेली. पोलारीस मध्ये नोकरी करताना त्याने त्याच्या कुटुंबाचे सर्व कर्ज फेडून टाकले आणि CAT ची तयारी सुरु केली. पहिल्यांदा CAT ची परीक्षा दिली तेव्हा आपल्या यशाबद्दल त्याला पुर्ण खात्री होती मात्र तेव्हाच CAT परीक्षेचे पेपर लीक झाल्याने त्याला पुन्हा CAT ची परीक्षा द्यावी लागली. पुन्हा जोमाने प्रयत्न करुन शरथने CAT ची परीक्षा दिली आणि त्याला सहाही IIM कॉलेजेसमधून मुलाखतीसाठी बोलावणे आले.

शरथची आई ईडली बनवत असे आणि शरथ आणि त्याचे दोन धाकटे भाऊ मिळून या ईडल्या विकण्याचे काम करत असत. एवढे सगळे करुनही महीना ७००-८०० रुपये मिळकतीमध्ये त्यांचा संसार चालत असे. मात्र या ईडली विकण्यातूनच शरथची उद्योजगतेशी तोंडओळख झाली. पुढे MBA झाल्यानंतरही त्याने ईडली विकण्यापासूनच आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याचेच आज "फुडकिंग" नावाच्या एका मोठ्या कॅटरींग कंपनीत रुपांतर झाले आहे. MBA नंतर एका मोठ्या आयटी कंपनीने दिलेली ८.५ लाख रुपये पगाराची नोकरी आपला ईडलीचा व्यवसाय करण्यासाठी शरथने नाकारली तेव्हा सर्वत्र तो एक चर्चेचा विषय झाला होता. मात्र आपल्या जिद्दीच्या बळावर शरथने "ईडली"वरचा आपला विश्वास सार्थ ठरवला. आज फुडकिंगची  उलाढाल करोडो रुपयांमध्ये आहे. भारतभर फुडकिंगच्या ५०० हून अधिक शाखा आहेत आणि महत्त्वाचे फुडकिंगच्या माध्यमातून सुमारे ५०००० लोकांना रोजगार मिळतो आहे. २८ वर्षांचा शरथ आपल्या यशाचे आणि उद्योजगतेचे श्रेय त्याच्या आईला देतो. त्याच्यामते त्याची आईच खरी उद्योजक आहे.

शरथ आपल्या व्यवसायामार्फत कमीत कमी दरात चांगले जेवण उपलब्ध करुन देण्याचे समाजकार्य करत आहेच मात्र समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्याने राजकारणामध्ये सक्रीय होण्याचा निर्णयही घेतला आहे. कोणत्याही पक्षाचा पुरस्कार न करता "गरीबी दूर करणे, सर्वांना शिक्षण  आणि रोजगार उपलब्ध करुन देणे" या त्रीसूत्रीचा पुरस्कार करत त्याने २००९ ची लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. यामध्ये त्याला जिंकता आले नसले तरी त्याने या निवडकुणीत नक्कीयाआपला ठसा उमटवला आहे.

झी टीव्हीच्या  "यंग ईंडीयन अचीव्हर्स" या कार्यक्रमामध्ये शरथची मुलाखत घेण्यात आली होती. त्या मुलाखतीचे भाग वाचकांसाठी येथे देत आहे. नक्की पहावी अशी ही मुलाखत आहे.

मुंगीच्या तोंडातूनही दाणा खेचून घ्यावा लागण्याईतकी पराकोटीची गरीबी पाहिलेल्या शरथचे कर्तुत्व निश्चीतच मोठे आणि अत्यंत प्रेरणादायी आहे. शरथ बाबु बद्दल अधिक माहितीसाठी त्याच्या अधिकृत संकेतस्थलाला http://sarathbabu.co.in/ भेट द्या. 

   
   
 
 


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


January 16, 2011

नेटभेट.कॉमचा नविन उपक्रम - सर्वोत्तम मोफत सॉफ्टवेअर्स

वाचक मित्रहो, आज आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत नेटभेट.कॉमचा एक अतीशय महत्त्वाकांक्षी उपक्रम. दैनंदीन संगणकीय वापरामध्ये आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरत असतो. इंटरनेट सर्फींगसाठी ब्राउजर्स, संगणकाच्या सुरक्षीततेसाठी अँटीवायरस सॉफ्टवेअर्स, गाणी आणि व्हीडीओज पाहण्यासाठी मीडीया प्लेअर्स, संगणकातील सर्व फाईल्स हाताळण्यासाठी फाईल मॅनेजर्स, चित्र आणि फोटो साठवण्यासाठी, एडीट करण्यासाठी पिक्चर एडीटर्स, संगणकातील महत्त्वाच्या माहितीचा बॅक-अप घेणारी अप्लिकेशन्स असे अनेक सॉफ्टवेअर्स आपण दररोज वापरत असतो. हल्ली एवढी सॉफ्टवेअर्स बाजारात आली आहेत की एखादे सॉफ्टवेअर आपल्याकडे नसेल तर ते ईंटरनेटवर शोधताना मात्र तारांबळ उडते. त्यातल्या त्यात मोफत सॉफ्टवेअर शोधण्याच्या नादात आपण भलत्याच साईट्स वरून सॉफ्टवेअर डाउनलोड करतो आणि त्याचसोबत व्हायरस आणि ट्रोजन्सच्या दुष्टचक्रात अडकतो. या सर्व व्यापातून नेटभेटच्या वाचकांची मुक्तता करण्यासाठी आम्ही या नविन उपक्रमाची सुरुवात केली आहे.


नेटभेटच्या या नविन उपक्रमाचे नाव आहे Best free softwares. ईंटरनेटवर मुशाफीरी करुन आम्ही आपल्यासाठी काही उत्तमोत्तम मोफत सॉफ्टवेअर्सची माहिती आणली आहे. केवळ माहिती नसून सॉफ्टवेअर्सची वर्गवार मांडणी आणि थेट डाउनलोड लिंकही देण्यात आली आहे. जेथे शक्य असेल तेथे सॉफ्टवेअर निर्मात्यांच्या मूळ वेबपानाची लिंक सुद्धा दिलेली आहे. या सॉफ्टवेअर्स विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्ही थेट या लिंक्सचा वापर करु शकता.

Best free softwares पाहण्यासाठी या http://freesoftwares.netbhet.com 
या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


नेटभेट.कॉम असताना आणखी एका साईटची गरज काय ?

नेटभेट.कॉम वर आम्ही सॉफ्टवेअर्सची माहिती देऊ शकलो असतो मात्र तसे न करता आम्ही यासाठी एक स्वतंत्र साईट बनविली. याचे मुख्य कारण म्हणजे नेटभेट.कॉम वर आम्ही कोणत्याही सॉफ्टवेअरची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे खुप कमी सॉफ्टवेअर्सची माहिती तुमच्यापर्यंत नेटभेट.कॉम मार्फत पोहोचत होती. Best free softwares मध्ये सॉफ्टवेअर्सची मराठीत तोंडओळख आणि खात्रीशीर डाउनलोड लिंक आहे. बर्‍याचशा सॉफ्टवेअर्सच्या वापरासाठी जास्त माहितीची गरज नसते अशा सॉफ्टवेअर्सची माहिती नेटभेटच्या मूळ साईटवर देता आली नसती मात्र Best free softwares अशा अनेक सॉफ्टवेअर्सची थोडक्यात माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सध्या येथे ७५ मोफत सॉफ्टवेअर्सची माहिती उपलब्ध आहे. आणि या वर्षाअखेरीस सुमारे २०० आणखी सॉफ्टवेअर्स Best free softwares मध्ये पहायला मिळतील. एवढया सॉफ्टवेअर्सची मराठी मध्ये माहिती उपलब्ध करुन देणारी नेटभेट ही पहिलीच साईट आहे याचा आम्हाला आनंद वाटतो.

Best free softwares मध्ये फक्त दोन गोष्टींवर आम्ही भर दिला आहे -
१. उत्तमोत्तम मोफत सॉफ्टवेअर्स
२. संपुर्णपणे सुरक्षीत (व्हायरस फ्री) डाउनलोड लिंक

नेटभेटच्या इतर अनेक उपयोगी प्रकल्पांप्रमाणेच Best free softwares हा आमचा उपक्रम देखिल वाचकांना आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास आपण आम्हाला मदत कराल अशी अपेक्षा.
नेटभेटचा हा उपक्रम अधिकाधिक उपयोगी व्हावा यासाठी आपल्या सुचना व प्रतीक्रीया आम्हाला अवश्य कळवा.

धन्यवाद.

टीम नेटभेट

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

January 14, 2011

साद देती हिमशिखरे !


Kanchenjunga
सुरवातीलाच एका वैश्विक सत्याचा उल्लेख करायचा मोह आवरत नाही.सर्वसाधारणपणे कोणत्याही क्षेत्रात नावाजलेल्या माणसाचं उदाहरण घेतलं तर असं लक्षात येतं की त्याचं ध्येय त्याच्या विशीतच पक्कं झालेलं आहे.त्या वयात त्याला यश मिळायला सुरवात झालेलीही आढळते.
एखाद्याजवळ त्याच्या विशीच्या आसपास एखादं ध्येय समोर ठेऊन ते अंमलात आणायला प्रवृत्त करणारी धारणा असते का?
अशी धारणा जवळ असणे ही गोष्टं दोन घटकांवर अवलंबून असते असं दिसतं.एक म्हणजे अंत:प्रेरणा आणि दुसरा घटक म्हणजे पार्श्वभूमी.अंत:प्रेरणेच्या संदर्भातलं एक उदाहरण सुप्रसिद्ध साहित्यिक आनंद यादवांचं.जेमतेम प्राथमिक शाळेत जाणार्‍या लहानग्या आनंदाला शिक्षण घेण्याची प्रचंड आसक्ती कुठून निर्माण झाली? (वाचा: झोंबी हे त्यांचं आत्मकथन) आसक्तीच म्हणायला पाहिजे.कारण घरातल्या थोरामोठ्यांकडून शीक! शीक! असा उपदेश होणं अशक्यच होतं.प्रतिकूल परिस्थिती होती.शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती.आधीच्या पिढ्यानपिढ्यांच्या वारशाचा तर प्रश्नंच नाही.जेवढा जेवढा विरोध जन्मदात्याकडून होत होता तेवढी शिक्षण घेण्याची इच्छा प्रज्वलित होत होती.प्रचंड प्रतिकूल परिस्थिती आणि तिच्याविरूद्धं उठाव करण्याचं भान ही नंतरची गोष्टं.पण आपल्या अंत:प्रेरणेवरचा प्रचंड विश्वास, इच्छाशक्ती, प्रयत्न या सगळ्याची सांगड घालत ते फक्तं स्वत:च शिकले असं नाही तर त्यांनी तळागाळातल्या समाजाला शिक्षण मिळावं यासाठी प्राध्यापक बनून प्रयत्नंही केले.

kumar_gandharva  , ,we love youस्व.कुमार गंधर्व लहानग्या वयातच एखाद्या मोठ्या शास्त्रीय गायकाचं गाणं जसंच्या तसं म्हणून दाखवत.हे कुठून आलं? जन्मजात अंत:प्रेरणा किंवा उपजत धारणाशक्ती ही जेव्हा अशाप्रकारे चमत्कारी स्वरूपाची असते तेव्हा ती कुठून येते याबद्दल निश्चित विधान करणं धाडसाचं आहे असं दिसतं.
आपल्याला अमुक एक कौशल्य असलेली संतती हवी असा निश्चयी संकल्प केलेल्या पतीपत्नीच्या पोटी तशी संतती निपजते असं आपल्या शास्त्रांमधे म्हटलं जातं.कुठलही ध्येय हे एका आयुष्यामधे पुरं होत नाही.माणूस जसजसा एखाद्या क्षेत्रात खोलवर जातो तसं आणखी आव्हानात्मक झालेलं ध्येय त्याच्यासमोर उभं रहात असतं.एका जन्मात अपूर्ण राहिलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी जन्मजन्मांतरीचा प्रवास करावा लागतो.शेवटी एखाद्या जन्मात तो त्या क्षेत्रात अत्त्युच्च शिखर गाठतो.ध्येयाचं अत्त्युच्च शिखर गाठलेल्या अशा महान व्यक्तीच्या संदर्भात अशीही गोष्टं आढळते की त्याचं नाव चालवणारा वारस त्याला लाभत नाही.असलाच तर तो निष्प्रभ असतो किंवा दुसर्‍याच कुठल्या तरी क्षेत्रात झेप घेत असतो. (उदा. प्रकाश पदूकोण: दीपिका पदूकोण)
चमत्कारी स्वरूपाच्या अंत:प्रेरणा या घटकाचा माग या दिशेने काढता येऊ शकतो.या संदर्भातलं आणखी एक उदाहरण हृतिक रोशन या स्टार अभिनेत्याचं.एक आजोबा सर्जनशील संगीतकार (स्व.रोशन), दुसरे आजोबा दिग्गज निर्माता-निर्देशक (जे.ओमप्रकाश) वडील अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि काका संगीतकार.

ATcAAACgiqEKNXgtTr_IlEW6Oq839ejgcqjTcfamzha9GtyrYLOks6CDXyvmUbUn8ogX9FxT2mlCfmWmN99T1Dcbkf-rAJtU9VBKtlZoEKmrMWty5F6HYi-Qo4syYQसगळं सहजप्राय असूनही हृतिकला आपला तोतरेपणा घालवण्यावर प्रचंड मेहेनत घ्यावी लागली.शरीर कृश होतं म्हणून ते कमवावं लागलं.त्यानं केलेले शंभर टक्के प्रयत्नं त्याला पहिल्याच फटक्यात त्याला ध्येयप्राप्तीच्या मार्गावर कितीतरी पुढे घेऊन गेले.आपण कुठेही कमी पडता कामा नये म्हणून त्याने स्वत:ला आवडत्या नृत्यासकट प्रत्येक गोष्टीवर केलेली मेहेनत विसरण्याजोगी नाही.पार्श्वभूमी, वारसा, अंत:प्रेरणा, प्रयत्न आणि हुशारी ही पंचसूत्री त्याच्या चांगल्याच कामी आली.
शंभर शतकांच्या उंबरठ्यावर असलेला सचिन हे त्यापुढचं मोठ्ठं उदाहरण!
उच्च ध्येय गाठलेल्यांच्या आयुष्यात पदार्पणातलं यश परिणामकारक ठरल्याचं दिसतं.अथक प्रयत्नं मात्रं कुठल्याही पायरीवर अपरिहार्यच ठरतात...
सगळ्यांनाच फार मोठी ध्येयं गवसणं शक्य नाही.चमत्कारी यश मिळतंच असं नाही.वेगवेगळ्या कलांची, शास्त्रांची अनुवांशिकता मिळणं शक्य नाही किंवा अनुवांशिकता नसतानाही अंत:प्रेरणा असतेच असं नाही.सर्वसाधारण माणसाचं काय? त्यालाही ध्येयं असतातच!
विशीच्या अलिकडपलिकडच्या सर्वसाधारण मुलाचं ध्येय त्याच्या आईबापांनी आधीच निश्चित केलेलं असतं.आई, बाप स्वत: कार्यरत असलेल्या क्षेत्रात किंवा ते जाऊ न शकलेल्या त्यांच्या आवडत्या क्षेत्रात ते आपल्या पाल्याचं ध्येय निश्चित करतात.हे तसं व्यवहार्यंच म्हटलं पाहिजे.
मग लाटा सुरू होतात... डॉक्टर होण्याची, इंजिनियर बनण्याची, संगणक तज्ज्ञं होण्याची, परदेशी शिक्षण घेऊन तिथे स्थायिक होण्याची...
ढोबळ लाटांना ध्येयं तरी कसं म्हणायचं? अशा लाटांवर आपल्या मुलांना लोटणार्‍या पालकांना आपल्या मुलात याहीपेक्षा वेगळ्या प्रकारची प्रज्ञा आहे याची जाणीव नसते की धाडस कमी पडतं की व्यवहार्यतेच्या कोषातून बाहेर पडायचं नसतं?
मुलांना ’सचिन तेंडुलकर’ बनवण्याची, मुलांना टीव्ही सेलिब्रेटी बनवण्याची, मुलांना नागरी सेवेत घालण्याची, अंतिम स्वरूप म्हणून व्यवस्थापनतज्ज्ञ बनवण्याची अशा वेगळ्या वाटेवरच्या लाटांचही चांगलंच स्वागत झालं.
महाजालावर माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध आहे.आज मराठी घरातला मुलगा, मुलगी ह्या साठ्याचा उपयोग करून स्वत: स्वत:चं ध्येय ठरवतो आहे हे बघून अभिमान वाटतो.त्यातही लाटांचा सहारा घेणं अपरिहार्य ठरतं.सहज असतं.कुठल्याही क्षेत्रात शिरलं तरी अंतिमत: मॅनेजमेंट किंवा फायनान्समधे जाणं या आणखी काही लाटा.आज रिस्क घेण्याचं प्रमाण वाढतं आहे.नोकरीत पर्मनंट हा शिक्का साफ पुसला जातोय.ध्येयासाठी नोकर्‍या बदलण्याचं प्रमाण वाढतंय.ट्रॅवल आणि टुरिझमसारखी वेगवेगळी क्षेत्रं विकास पावताहेत.महाजाल हे केवढं मोठं क्षेत्रं आहे! आज एकाच क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर जाण्याचा मोहही राहिलेला नाही उलट वेगवेगळी क्षेत्रं धुंडाळून आर्थिक समाधानाबरोबर मानसिक समाधान मिळवण्याची ओढ वाढली आहे.संघर्षं करण्याची क्षमता वाढली आहे.हे निश्चित कौतुकास्पद आहे.
पूर्वी या ना त्या करणाने ढोबळ ध्येयांचीही जाणिव दिसत नव्हती.काहीच ध्येय नसलेले कारकून नोकरीचे सर्व फायदे उपटताना कर्तव्याच्या वेळी अळीमिळी गुप चिळी या नात्याने रहात होते.कामगार संघटनांचा दरारा होता.आज ध्येय हे सर्वात महत्वाचं झालं आहे.ध्येयासाठी सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत राबणार्‍यांची संख्या वाढते आहे.त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे.अनिवासी भारतीयांची संख्या वाढते आहे.
आर्थिक आणि व्यावसायिक समाधानानं एक चांगलं टोक तर गाठलंय पण त्याच्या जोडीनंच येणार्‍या अतिलोभाच्या, आसुरी स्पर्धेच्या, अपरिहार्य अशा कौटुंबिक जीवनाच्या अभावाच्या दुसर्‍या टकमक टोकाकडे आजच्या पिढीचं लक्षं आहे का?
ध्येयनिश्चितीसाठी पहिला मैलाचा दगड अजूनही शाळा-कॉलेजातलं जास्तीत जास्तं टक्के मिळवणारं शिक्षण हाच राहिला आहे.विद्यार्थ्यांची अशी अवस्था होतेय की पुस्तक आणि चष्मा याव्यतिरिक्तं कुठलीही गोष्टं वापरताना त्यांच्यात आत्मविश्वास असेल का याची खात्री देता येत नाही.
Student Studying
आजच्या स्पर्धेच्या युगात नक्की कसली आवशकता आहे?
अथक प्रयत्नं आणि संपूर्ण समर्पण या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण त्याचबरोबर निवडलेल्या क्षेत्राचा अचूक अंदाज पाहिजे.कुठली कळ दाबली की वरची पायरी उघडेल याची समज पाहिजे.नसली तर ती संपादित करता आली पाहिजे.निवडलेल्या क्षेत्रात आपल्याला नक्की काय हवं याचा निर्णय पक्का हवा.एक प्रकारची आक्रमकता अंगी बाणवता आली पाहिजे.प्रचंड स्पर्धेच्या, दिखाव्याच्या या जगात शर्यतीतला योग्य उंदीर होता आलं पाहिजे.अन्यथा... आपल्याला जे आवडतं, पटतं, योग्यं आहे असं वाटतं ते प्रचंड संयम ठेऊन करत रहाण्याची ताकद कमवता आली पाहिजे.
भावनिक, आर्थिक, लौकिक कशाही प्रकारचं आव्हान झेलता आलं पाहिजे, प्रचंड सोसता आलं पाहिजे आणि तरीही प्रयत्नात सातत्य ठेवता आलं पाहिजे...

लेखक - श्री. विनायक पंडीत
http://vinayak-pandit.blogspot.com/


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

January 07, 2011

"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग सातवा)

एका मोठया ब्रेकनंतर आज आपण पुन्हा गुगल अ‍ॅडसेन्सबद्दल माहिती घेणार आहोत. या लेखमालिकेत सर्वांना एकाच वेगाने जाता यावे आणि मी सांगीतलेले प्रयोग करुन पाहता यावेत यासाठी मी २ महिन्यांचा अवधी देणार होतो. प्रत्यक्षात मात्र उर्वरीत लेख लिहायला जास्तच वेळ लागला. असो, आधीच्या सहा लेखांच्या मदतीने आतापर्यंत बर्‍याच जणांनी अ‍ॅडसेन्स अकाऊंट मिळविले असेल अशी मी आशा करतो. यापुढील सर्व लेख अ‍ॅडसेन्स वापरण्यासंबंधी असणार आहेत म्हणजेच अ‍ॅडसेन्स अकाऊंट ज्यांनी मिळविले आहे अशा सर्वांसाठी यापुढील लेख असणार आहेत.

मागील लेखांमधील माहिती जरा Refresh करुन पहा -


  • अ‍ॅडसेन्स कशाला म्हणतात?
  • अ‍ॅडसेन्स म्हणजे नक्की काय?
  • अ‍ॅडसेन्स कसे मिळवावे?
  • अ‍ॅडसेन्सचे प्रकार
  • अ‍ॅडसेन्सच्या टीप्स
  • अ‍ॅडसेन्सची मांडणी


  • आजच्या सातव्या लेखामध्ये आपण अ‍ॅडसेन्स मधील जाहिराती वापरण्यासंबंधीची माहिती पाहुया -

    १. www.google.com/adsense किंवा www.adsense.com या लिंकवर क्लिक करुन आणि आपला गुगल ईमेल पत्ता वापरुन अ‍ॅडसेन्स मध्ये Log in करा.
    २. Adsense setup वर क्लिक करा.

    ३. येथे अ‍ॅडसेन्स वापरण्यासाठीचे पाच पर्याय दिसतील.




    यापैकी शेवटचे दोन पर्याय Adsense for doamins आणि Adsense for Mobile content  असे असतील. सध्या आपण या दोनही पर्यांयांकडे दुर्लक्ष करणार आहोत. (हे पर्याय Advance users साठी आहेत) . ब्लॉगर्ससाठी अ‍ॅडसेन्सचे मुख्य उत्पन्न हे पहिल्या तीन प्रकारांमधूनच येते. ते प्रकार पुढील प्रमाणे -


    Adsense for content - अ‍ॅडसेन्स फॉर कंटेंट हा पर्याय ब्लॉगर्ससाठी सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे.
    Adsense for Search - प्रत्येक साईट आणि ब्लॉगवर Search ची (Search bar) सुविधा असणे गरजेचे असते. गुगलचा सर्चबार वापरुन शोध घेतल्यावर शोध परिणामांच्या बाजूला जाहिराती दिसतात. या जाहिरातींवर वाचकांनी क्लिक केल्यास त्यापासून ब्लॉगरला पैसे मिळू शकतात. याद्वारे मिळणारे उत्पन्न तुलनेने खुप कमी असते.
    Adsense for feeds -  Feedburner या सुविधेमधून लेख ईमेल द्वारे ब्लॉगच्या सभासदांपर्यंत पोहोचवता येतात. यालाच ब्लॉग फीड्स असे म्हणतात. ब्लॉग फीड्स सोबत गुगलच्या जाहिराती थेट वाचकांच्या ईमेल बॉक्समध्ये पोहोचवता येतात. दुर्दैवाने मराठी फीड्स साठी जाहिराती दिसत नाहीत. ( याचे देखिल एक "जुगाड" सोल्युशन मी शोधले आहे. मात्र या सोल्युशनचे तोटे देखिल आहेत. तेव्हा हे वापरायचे की नाहीत हे तुम्हीच ठरवा.)


    Adsense for content म्हणजे काय ? -


    Adsense for content  या प्रकारामध्ये ब्लॉगवरील किंवा वेबसाईटवरील मजकुराला अनुसरून तसेच वाचकाच्या भौगोलिक ठिकाणाला (Location) अनुसरुन जाहिराती दाखविल्या जातात. उदाहरणार्थ नेटभेटच्या How to calculate EMI in excel? या लेखाच्या पानावर सर्रास ICICI home loans ची जाहिरात पहायला मिळते. हाच लेख वाचणारी व्यक्ती जर भारतात असेल तर वेगळी जाहिरात आणि अमेरीकेत असेल तर वेगळी जाहिरात दिसते. कोणत्या वेळेला, कोणती जाहिरात, कोणत्या मजकुरासाठी (Keywords), कोणत्या देशातील्/भागातील वाचकांना दिसेल हे गुगलच्या एका कठीण अल्गोरीदम द्वारे ठरवले जाते.


    Adsense for content कसे वापरावे ? -

    ( ही सर्व माहिती मी Old adsense editor नुसार देत आहे. अ‍ॅडसेन्स अकाऊंट मध्ये उजव्या बाजूला वरती जुने व नविन अ‍ॅडसेन्स सीलेक्ट करण्याची सुविधा आहे. त्यापैकी Old adsense interface हा पर्याय निवडा )
    Adsense setup > Get Ads > Adsense for content येथे क्लिक करा. Adsense for content चे दोन उपप्रकार दिसतील.




    Ad Unit व Link Unit

    Ad unit मधील जाहिरातींमध्ये चित्र आणि शब्दस्वरुपात जाहिरात केली जाते. यामध्ये जाहिरातीबद्दल अधिक माहिती असते. फक्त शाब्दिक जाहिरात (Text only) , फक्त चित्रस्वरुपातील जाहिरात (Image ads only) आणि चित्र व शाब्दिक जाहिरात (Text and image ads) या उपप्रकारांपैकी एक प्रकार निवडता येतो.
    चित्ररुपातील जाहिराती आकर्षक असतात आणि त्या वाचकांचे लक्ष वेधून घेतात त्यामुळे बरेच ब्लॉगर्स हा पर्याय हमखास निवडतात. मात्र लेखातील मजकुरामध्ये बेमालुमपणे मिसळणार्‍या शब्दरुपातील जाहिराती योग्यरीत्या वापरल्या तर खुप फायद्याच्या ठरु शकतात.

    Link Unit मधील जाहिराती मध्ये एक किंवा दोन शब्दांच्या जाहिराती लिंक्सच्या स्वरुपात असतात. वरकरणी अगदीच निरुपयोगी वाटल्या तरी या जाहिराती योग्यरीत्या वापरल्या तर खुप फायद्याच्या ठरु शकतात. मेनुबार किंवा साईडबार सोबत बेमालुमपणे मिसळण्यासाठी Link Unit चा वापर केला जातो.

    आता आपण Ad Unit वापरण्याची पद्धती सवीस्तरपणे पाहूया . (ही पद्धती पाहिल्यानंतर Link Unit बनविणे अगदी सोपे आहे.)
    १. Ad Unit हा पर्याय आणि सोबत त्याचा उपप्रकार (फक्त शाब्दिक जाहिरात (Text only) , फक्त चित्रस्वरुपातील जाहिरात (Image ads only) आणि चित्र व शाब्दिक जाहिरात (Text and image ads) ) निवडा. व Continue या बटणावर क्लिक करा.
    २. येथे Format , Color, Fonts, Corner style असे चार पर्याय दिसतील.


    Format मध्ये तुम्ही जाहिरातीचा आकार निवडू शकता. येथे दिलेल्या आकारांपैकी ३००*२५०, ३३६*२८०, ७२८*९० आणि १६०*६०० या आकारातील जाहिराती जास्त फायद्याच्या असतात असे खुद्द गुगलकाकांनी एका अहवालात म्हंटले होते.

    Color - येथे जाहिरातींची रंगसंगती ठरवता येते. हा पर्याय फक्त शाब्दीक (Text Only) या जाहिरातींसाठीच असतो. रंगसंगती ठरवताना लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी -
       - शक्यतो तुमच्या ब्लॉगच्या थीममधील बॅकग्राउंड कलर आणि जाहिरातीच्या बॅकग्राउंड कलर व किनारीचा रंग (Border color) एकच ठेवा. यामुळे जाहिराती आणि ब्लॉगवरील मजकूर एकमेकांत मिसळला जाईल.
       - ब्लॉगमधील लिंक्सचा रंग आणि जाहिराती मधील लिंक्सचा रंग एकच असावा. वाचकांना सर्व लिंक्स सारख्याच दिसून त्यावर अनावधानाने क्लिक्स मिळण्याची शक्यता वाढते.

    Fonts - ब्लॉगमध्ये वापरलेला फाँट आणि जाहिरातीमधील फाँट शक्यतो एकच असावा.

    Corner style - ब्लॉगच्या टेम्प्लेटशी सुसंगत अशी Corner style निवडावी.

    या सोप्या पर्यायांनंतर आणखीन एक पर्याय खाली दिसेल. Alternate ads or colors असे लिहिलेले दिसेल. मराठी ब्लॉग्जवर गुगलच्या जाहिराती दिसत नाहीत तेव्हा या पर्यायाचा उपयोग होतो. Ads for indians, admaya किंवा इतर पर्यायांचा वापर गुगल जाहिरातींबरोबर करण्यासाठी आपण Alternate ads वापरु शकतो. जेव्हा गुगल जाहिरात दाखविण्यास असमर्थ अस्ते तेव्हा आपोआप दुसर्‍या नेटवर्कची जाहिरात दिसु लागते.
    याची पद्धती खालीलप्रमाणे -

    एक Notepad फाईल उघडा.

    त्यामध्ये खालील कोड लिहा -



    वरील कोडमध्ये Begin of AdsforIndians AdNetwork व End of AdsforIndians AdNetwork  या ओळींच्यामध्ये तुमचा Ads for indians, admaya किंवा इतर अ‍ॅड नेटवर्कचा कोड चिकटवा. तुम्ही स्वतः बनविलेल्या जाहिरातीचा कोड देखिल येथे चिकटवू शकता. वरील कोडमध्ये table style wirdth आणि hight जाहिरातीच्या आकारानुसार बदला आणि title तुम्हाला हवे तसे बदला.

    फक्त गुगल जाहिरातीचा आकार आणि इतर अ‍ॅडनेटवर्क मधील जाहिरातीचा आकार सारखाच असेल असे पहा.
    आता या नोटपॅड फाईलला एक नाव द्या. आणि Save as करून फाईलचे नाव.html असे सेव्ह करा. उदाहरणार्थ altads.html

    या फाईलला ईंटरनेटवर होस्ट करा. अनेक Free file hosting पुरविणार्‍या साईट्स तुम्हाला शोधता येतील. माझ्यामते 110mb.com ही एक उत्तम साईट आहे. (येथे तुम्ही मोफत वेबसाईट सुद्धा बनवु शकता. त्याबद्दल नंतर कधीतरी!)

    फाईल होस्ट केल्यानंतर त्या फाईलची लिंक मिळेल. ही लिंक आपण वर पाहिलेल्या गुगल अ‍ॅडसेन्समधील पाचव्या alternate ads or colors या पर्यायात वापरणार आहोत. alternate ads or colors मधील दुसरा पर्याय Show non-Google ads from another URL निवडा आणि आपण मिळवलेली लिंक येथे चिकटवा.
    आता Continue या बटणावर क्लिक करा.


    आता जाहिरातींसाठी एक channel निवडा/बनवा. चॅनल्स म्हणजे नक्की काय आणि ते कसे वापरावे याबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती घेणार आहोत. सध्या कोणतेही एक नाव देऊन एक चॅनेल बनवा आणि Continue या बटणावर क्लिक करा.

    जाहिरात बनविण्याच्या अंतिम पायरीवर आपण पोहोचलो आहोत. येथे जाहिरातीला उचित असे नाव द्या. तुम्हाला जाहिरात नीट ओळखता यावी यासाठी हे नाव असते. वाचकांना जाहिरातीचे हे नाव दिसत नाही.
    आता Submitt and get ad code या बटणावर क्लिक करा. अभिनंदन ! तुम्ही बनविलेल्या पहिल्या अ‍ॅडसेन्स जाहिरातीचा html code आता तयार झाला आहे.

    ब्लॉगर मध्ये आपल्या ब्लॉगच्या साईडबार किंवा मेनुबार च्या खाली add html/javascript widget असे क्लिक करुन त्यामध्ये वरील जाहिरातीचा कोड चिकटवा आणि Save करा. जाहिरात तयार झाल्यानंतर ब्लॉगवर दिसेपर्यंत १० मिनिटाचा कालावधी लागतो. तेवढे थांबून मग page refresh करा. आता तुम्ही यशस्वीरीत्या गुगल जाहीरात आपल्या ब्लॉगवर दाखविलेली आहे.

    पुढील लेखामध्ये आपण अ‍ॅडसेन्स अकाऊंट मधील इतर पर्यांयाची माहिती घेउयात. So stay tuned.....

    January 05, 2011

    नेटभेट्.कॉमचा नवीन उपक्रम - Everything Marathi !


    वाचकमित्रहो, आज आम्ही नेटभेटचा एक नविन उपक्रम आपल्यासमोर सादर करीत आहोत. या उपक्रमाचे नाव आहे, "Everything Marathi".  (नाव वगळता यामध्ये खरंच सर्वकाही मराठी आहे !)

    नेटभेटच्या अनेक वाचकांनी आमच्याकडे वेळोवेळी संगणकावरील मराठी लिखाणासंबंधी माहिती, मराठी फाँट्स डाउनलोड करण्यासंबंधी माहिती विचारली होती. ऑनलाईन मराठी लिहिण्यासंबंधी आम्ही यापुर्वीच नेटभेट आणि ब्लॉगकट्टा या संकेतस्थळांवर काही लेख प्रकाशित केले होते. मात्र सर्व मराठी फाँट्स एकत्र पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असलेले एकही संकेतस्थळ पाहण्यात आले नाही. मराठी वाचकांना मराठी फाँट्स डाउनलोड करता यावेत या मुख्य उद्देशाने आम्ही Everything Marathi या संकेतस्थळाची निर्मीती केली.

    Everything Marathi मधील सर्व फाँट्स आम्ही esnips, Rapidashare, lullar, ziddu, mediafire, easy-share या संकेतस्थळांवरुन शोधुन घेतले आहेत. हे सर्व फाँट्स कसे दिसतात हे वाचकांना कळावे म्हणून प्रत्येक फाँटमध्ये A to z ही अक्षरे आणि 0 to 9 हे अंक लिहून दाखविले आहेत. हे सर्व फॉंट्स Google sites मध्ये साठवून ठेवलेले आहेत आणि ते सर्वांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

    Everything Marathi हे संकेतस्थळ http://marathi.netbhet.com  या लिंकवर पाहता येईल. (आजच बुकमार्क करा !)

    मराठी मधील फाँट्स शोधायला सुरुवात केली तेव्हा फार फार तर १५०-२०० फाँट्स मिळतील असा आमचा अंदाज होता. परंतु आश्चर्य म्हणजे आम्हाला चक्क ७५० हून अधिक मराठी फॉंट्स मिळाले. यापैकी ३०० फाँट्स Everything Marathi वर प्रकाशित केले असून. पुढे दररोज एक नविन फॉंट वाचकांना येथे पाहता येईल.
    मराठी फाँट्स डाउनलोड करण्यासोबतच ते इंस्टॉल करण्यासंबंधी येथे माहिती देण्यात आलेली आहे. ऑनलाईन मराठी लिहिण्यासाठीची माहिती तर येथे आहेच त्यासोबत येथे मराठी लिहिण्याची सोय देखिल पुरविण्यात आलेली आहे. http://write-in-marathi.blogspot.com/ या संकेतस्थळावर देखिल मराठीत लिहिण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

    नेटभेटची ही नववर्ष भेट (थोडी उशिरा आली तरीही !) आपल्याला नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे. Everything Marathi बद्दल आपल्या मित्रमंडळींना ईमेल करून, फेसबुक, ऑर्कुट आणि ट्वीटर वरून नक्की कळवा. आणि मायमराठीच्या जास्तीत जास्त लेकरांना या सुविधेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्हाला मदत करा !


    Marathi.Netbhet.com

    Everything Marathi चं विजेट आपल्या ब्लॉगवर चिकटवा !

     

    टीप - आम्ही उपलब्ध करुन दिलेले फाँट्स ही नेटभेटची निर्मीती नसून ते फाँट्स बनविणार्‍या मूळ व्यक्तींची आहे. जेथून हे फाँट्स डाउनलोड केले आहेत तेथे फाँट्सच्या मूळ मालकी हक्कांसंबंधी किंवा फाँट्सच्या वापराबद्दल (Copyright) माहिती मिळाली नाही. त्यामुळे येथे मराठी फाँट्स उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची परवानगी मिळविणे शक्य झाले नाही. तरी फॉट्स येथे दाखविण्यासंबंधी कोणालाही काही शंका अथवा हरकत असल्यास आम्हाला admin@netbhet.com वर संपर्क साधावा.

    Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
    Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

    Related Posts with Thumbnails