June 23, 2011

बघा जरा पटतय का ते ???

असं समजा की एक 2BHK फ्लॅट विकायचा आहे. त्या फ्लॅट ची कींमत ५० लाख आहे. आणि बँक तुम्हाला त्याच्या एकूण किमतीच्या ८५% कर्ज देऊ करत आहे. आपण धरून चालु कि हे कर्ज आपण २० वर्षांसाठी घेतो आहे. आणि आता खाली दिलेले "calculation " पहा.

घर घेण्यासाठी तुम्ही स्वतः दिलेले contrbution १५% : रुपये ७.५ लाख ( यामध्येच सगळी बचत/जमापुंजी संपुन जाते !)

गृह कर्ज : रुपये ४२.५ लाख

दरमहा येणारा EMI (व्याजदर ११%) : रु .४७०००
maintenance charges दरमहा : रु .२०००
मालमत्ता कर दरमहा (Property tax) : रु .१०००-१५००

गृह कर्ज व्याजावर मिळणारी कर सवलत : दरमहा रु .४००० ( ते ही फक्त पहिल्या काही वर्षांपर्यंतच )
म्हणजे घरासाठी येणारा एकूण खर्च (अंदाजे) दरमहा : रु. ५००००
(मेंटेनन्स चार्जेस आणि कर हे भविष्यात महागाई दराप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे.)

आणि दरमहा एवढे सगळे पैसे दिल्यानंतर -
१. प्रत्येक वेळी तुमच्या कुटुंबाला खरेदीसाठी नकारघंटा ऐकावी लागणार (जरी तुमचा पगार ७० ते ८० हजार असेल तरी)
२. पहिल्या काही वर्षांसाठी तरी खर्चावर संपुर्ण नियंत्रण , Family holiday आणि नविन गाडीचा प्लान पुढे ढकलला जाणार :-)
३. आणि जर या काळात नोकरी गेली, कामावरुन बडतर्फ केले (जे मंदीच्या काळात हमखास होते !) तर तुमची आर्थिक गणिते अशी काही बिघडतील की काही खैर नाही.

२० वर्षांनंतर तुम्ही दिलेली एकुण रक्कम असेल : ( ५००००० X २० X १२ ) + ७५०००० = १२७५०००० = रुपये १.३ करोड
आणि एवढे सगळे करुन करून तुम्हाला काय मिळालं तर एका २० वर्ष जुन्या असलेल्या society मधला एक २० वर्ष जुना झालेला फ्लॅट. २० वर्षांनंतर तुमच्या 2 BHK घराची (market price ) किंमत १.५ करोड असेल. आणि 20 वर्षात एका घराशिवाय काहिही मिळाले नसेल.

हेच घर जर तुम्ही घर भाडयाने घेतले तर तुम्हाला जास्तित जास्त घरभाडे १०००० येईल. इतर सगळा खर्च मिळून , आणि असं समजून चालूया की भाडे दरवर्षी ८% दराने वाढेल ( खरे तर कमीच वाढेल). प्रतीवर्षी तुम्ही दिलेलं घरभाडे असेल १.२ लाख, १.३ लाख, १.४ लाख.........
याच दराने २० वर्षांनंतर तुम्ही भरलेलं एकुण भाडे असेल ................फक्त ६० लाख.

फायदे -

१. तुम्ही कधीही घर बद्लु शकता. अगदी एखाद्या छोट्याशा कारणासाठी देखिल !
२. अचानक परगावी किंवा परदेशी स्थायीक होण्याची संधी मिळाली तर तुम्ही सहजगत्या ती संधी स्वीकारु शकता.
३. आपल्या सोयीनुसार ऑफीसच्या जवळ, मुलांच्या शाळेच्या जवळ घर घेऊ शकता.
४. तुमच्या वाढत्या कुटुंबासाठी 3BHK फ्लॅट कधीही घेउ शकता.
५. राहत्या घराचे भाडे जसजसे वाढेल त्यानुसार HRA मध्ये कर सवलतही मिळेल.
आता जर तुम्ही "हुशार" असाल तर काही पैसे शेअर बाजारात किंवा Mutual fund मध्ये गुंतवाल कारण तुम्ही फक्त रुपये १०००० घरभाडे देत आहात, ५०००० EMI नाही.

जर तुम्ही २० वर्षांपर्यंत १५% दराने दरमहा रुपये २५००० गुंतवले ( उदाहरणार्थ तुम्ही जागा खरेदी करा किंवा Mutual Fund, PPF मध्ये गुंतवा.) जसे तुमचे घरभाडे वाढेल तसे तुम्ही गुंतवणुकीची रक्कम कमी करु शकाल, आणि तरी सुद्धा तुम्ही २.५ करोड या २० वर्षात कमवु शकता ( हे तुमच्या SMART गुंतवणुकीवर अवलंबून आहे.)

आणि नंतर तुम्ही असाच एखादा FLAT तुमच्या मूलांकरिता खरेदी करु शकता आणि काही पैसे तुम्ही त्यांच्या शिक्षण आणि विकासावर सुद्धा खर्च करु शकता.



Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

June 08, 2011

नोकरी की व्यवसाय?



द्योग, व्यवसाय, धंदा किंवा मराठी समाजात अनेक समज, गैरसमज आहेत. त्यातील कित्येक गैरसमज तर पिढ्यान्‌पिढ्या पोसले गेले आहेत. ते दूर करणे आवश्‍यक आहे.

बिझनेस सुरू करायला मोठ्या प्रमाणावर भांडवल, म्हणजे पैसा लागतो; तसेच बराच अनुभव लागतो, बिझनेस करणारा माणूस "चार सौ बीस असला पाहिजे, त्याशिवाय त्याला बिझनेस जमूच शकत नाही, बिझनेस करायला फारशी अक्कल लागत नाही, या व अशा प्रकारच्या अनेक भ्रामक कल्पना मराठी समाजात आहेत. इतर समाजामध्ये बिझनेस करणे प्रतिष्ठितपणाचे समजले जाते. मराठी समाजामध्ये बिझनेस करणाऱ्या माणसाकडे संशयाने बघितले जाते. मराठी समाजात बिझनेसची प्रतिष्ठा काय दर्जाची आहे, याचा उत्तम अनुभव सदाशिव बोराटे यांना आला आहे. लग्नाच्या वेळी वधूपक्षाकडून विचारणा झाली, तेव्हा मुलगा बिझनेस करतो, नोकरी करत नाही असे सांगितल्यानंतर त्यांना कुणी मुलगी द्यायला तयार होत नव्हते. तीन वर्षे अथक प्रयत्न केल्यावर त्यांचे लग्न झाले. माझे दुसरे एक नारायणगावचे उद्योजकमित्र सुभाष झानपुरे यांचापण हाच अनुभव आहे. बी.कॉम.नंतर त्यांनी नोकरी न करता बिझनेस करायला सुरवात केली. त्यामुळे त्यांना लग्नासाठी मुलगी मिळेनाशी झाली. इतर समाजात बिझनेस करणाऱ्या कुटुंबात मुलगी देणे प्रतिष्ठेचे समजले जाते. मराठी समाजात अशा घरात मुलगी देण्याआधी शंभर वेळा विचार करण्यात येतो. बिझनेसबल मराठी मनात ही जी काही "निगेटीव्हिटी' किंवा नकारात्मक भावना आहे, ती दूर करणे आवश्‍यक आहे. याचा परिणाम नव्याने उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या मराठी तरुण-तरुणींवर होत असतो. त्यांच्यातील सकारात्मक विचारांना पावलोपावली ठेचा लागून त्यांच्यातील नकारात्मक प्रवृत्तीला खतपाणी मिळत जाते. अनेक मराठी व्यवसायक अयशस्वी होतात, त्यामागे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे आढळून आले आहे.

बिझनेससाठी मोठ्या प्रमाणावर पैसा किंवा भांडवल लागते हा एक मोठा गैरसमज आहे. अनेकांची गाडी भांडवलाशी अडते. भांडवल नाही, भांडवल मिळाले नाही. पुरेसे भांडवल नाही, कोणी भांडवल द्यायला तयार नाही, अशी कारणे पुढे करण्यात येतात. बिझनेससाठी तीन प्रकारच्या भांडवलाची गरज असते. पहिले म्हणजे पैशांचे भांडवल, दुसरे म्हणजे वेळेचे भांडवल व तिसरे म्हणजे मनुष्यकाळाचे भांडवल. यापैकी वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. या भांडवलाचा योग्य उपयोग केला, तर पैशांचे भांडवल आपोआप मिळत जाते. जगातील अनेक मोठ्या कंपन्या व औद्योगिक घराण्याची सुरवात अगदी छोट्या प्रमाणात व अत्यल्प भांडवलात झाली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाची सुरवात सायकलच्या दुकानापासून झाली. "रिलायन्स'ची सुरवात मुंबईतील एका चाळीतील भाड्याच्या एका खोलीतून झाली. "मायक्रोसॉफ्ट', "एच.पी.', "गुगल', "ऍपल' या कंपन्यांची सुरवात घराच्या गॅरेजमधून झाली, तर "डेली'ची सुरवात हॉस्टेलच्या डॉर्मेटरीतून झाली. "सोनी' या प्रख्यात जपानी कंपनीची सुरवात बॉंबहल्ल्यात उद्‌ध्वस्त झालेल्या एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या तळघरातील 10 फूट स 10 फूट या छोट्या जागेतून झाली. दहा हजार रुपयांच्या अल्पशा भांडवलावर "इन्फोसिस'ची सुरवात पुण्यात दोन खोल्यांच्या जागेत झाली, तर "विप्रो'ची सुरवात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या छोट्या गावात झाली. केशवलक्ष्मी प्रसाधने (केप्र) ही पुण्यातील लोणची-मसाले बनविणारी एक प्रसिद्ध कंपनी. केवळ पाच रुपयांच्या भांडवलात त्याची सुरवात झाली. "वॉरन बफे'चे नाव जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीतील एक व सर्वांत यशस्वी गुंतवणूकदार म्हणून घेतले जाते. केवळ शंभर डॉलरच्या भांडवलावर त्यांनी गुंतवणुकीला सुरवात केली. या सगळ्यांनी आपल्याकडील वेळेच्या व मनुष्यकाळाच्या भांडवलाचा योग्य उपयोग केला, म्हणून त्यांना पैशांचे भांडवल मिळत गेले.

बिझनेससाठी अनुभवाची गरज असते, हा दुसरा मोठा गैरसमज आहे. उलट अनुभवाची गरज नसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे "सबत्वे सॅंडविच'. हा वर्षाला अब्जावधी डॉलरची उलाढाल असलेला जगातील सगळ्यात मोठा साखळी रेस्टॉरंटचा बिझनेस. फ्रेड डिल्युका या 17 वर्षांच्या शाळकरी मुलाने महाविद्यालयाची फी जमविण्यासाठी म्हणून या व्यवसायाला सुरवात केली. त्या वेळी फ्रेडला हॉटेलमध्ये जाऊन सॅंडविचेस खाल्ल्याशिवाय या बिझनेसचा दुसरा कोठलाही अनुभव नव्हता. त्याने जो काही अनुभव मिळवला, तो बिझनेसमधूनच तोसुद्धा चुका करत, ठेचा खात, शिकत आज त्यांची जगभर 21 हजारांवर रेस्टॉरंट आहेत. 275 प्रकारची सॅंडविचेस ते पुरवतात. त्याची पण सुरवात केवळ दोन हजार डॉलरच्या भांडवलावर झाली आहे. हे भांडवलसुद्धा फ्रेडच्या वडिलांच्या मित्राने पुरवले!

बिझनेससाठी लागणारा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे निर्णय घेण्याची व निर्णय राबविण्याची क्षमता. निर्णय चुकेल या भीतीपोटी अनेक जण निर्णय घेण्याचे टाळत तरी असतात किंवा चालढकल तरी करत असतात. तर बऱ्याच वेळा ही जबाबदारी इतरांवर सोपवली जाते. अनेक कुटुंबांमध्ये तरुणांमधील निर्णयक्षमता मारली जात असते. मुलांविषयीचे सर्व निर्णय पालक घेत असतात व मुलांना "होयबा' बनवून ठेवतात. ही "होयबा' मनोवृत्ती नोकरीसाठी ठीक असते; पण बिझनेससाठी नाही. बिझनेसमध्ये अनेक निर्णय स्वतःचे स्वतः घ्यावे लागतात. कधी कधी हे निर्णय घाई गडबडीत किंवा "ऑन द स्पॉट' घ्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने निर्णय घेण्याची सवय लावून घ्यायला हवी. निर्णय चुकला तर त्यामुळे घाबरून जाऊ नये. एकदा निर्णय घेण्याची सवय लागली की अचूक निर्णय घेण्याची क्षमता आपोआप निर्माण होते.

बिझनेससाठी लागते धाडस, हिंमत, चिकाटी, दूरदृष्टी, महत्त्वाकांक्षा, माणसाची पारख, माणसे जोडण्याची कला, परिस्थितीप्रमाणे स्वतःमध्ये व स्वतःच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची लवचिकता, उत्तम व्यवहार यात व मार्केटिंगचे कौशल्य. यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही तरी गुण असतातच. जे लोक मार्केटमध्ये शिरण्याचे धाडस दाखवतात, मार्केटमध्ये उभे राहण्याची जिद्द दाखवतात व मार्केटमध्ये टिकून राहण्याचे कौशल्य दाखवतात त्यांचे बिझनेस सहसा कधी बुडत नसतात.

बिझनेससाठी अजून एका गोष्टीची आवश्‍यकता असते. ती म्हणजे धोका पत्करायची तयारी. मराठी समाजामध्ये धोका पत्करण्याची मानसिकता फार कमी आहे. त्यांना सुरक्षित वातावरणाची सवय आहे किंवा अशा वातावरणाकडे ओढा आहे. जे सदैव सुरक्षित वातावरणात वावरत असतात. त्यांच्यात धोका पत्करण्याची मानसिकता नसते; पण आपण रोजच्या आयुष्यात, पावलोपावली अनेक धोक्‍यांना सामोरे जात असतो. घरातून कार्यालयात, महाविद्यालयात किंवा शाळेत जाण्यासाठी बाहेर पडतो. तेव्हा अपघाताचा धोका असतोच. हा धोका पत्करून आपण जातच असतो. हा धोका पत्करायचा नाही असे ठरवले, तर घरातच बसून राहावे लागेल. परीक्षेला जाताना परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याचा धोका असतो, तसेच परीक्षेत पहिले येण्याचीपण शक्‍यता असते. अनुत्तीर्ण होण्याचा धोका पत्करून परीक्षेला बसले तर पहिले येता येते. त्यामुळे धोका हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. "नो रिस्क नो रिवॉर्ड' म्हणजे धोका पत्करल्याशिवाय फायदा मिळत नाही.

बिझनेसमध्ये "वाकेन, पण मोडणार नाही', हे वाक्‍य महत्त्वाचे ठरते. शिवचरित्राचा जर बारकाईने अभ्यास केला, तर शिवाजी महाराजांनी हे तंत्र वापरून व प्रसंगी पड खाऊन अनेक वेळा स्वराज्य वाचवले आहे. "अंथरूण बघून हात पाय पसरावेत', असे वाक्‍य शिकवले जाते. याचा अर्थ आपली ऐपत बघून उड्या माराव्यात; पण पांघरूण हवे तेवढे मोठे करता येते, हे शिकवले जात नाही! ते शिकवणे आता आवश्‍यक आहे. या ठिकाणी "अंथरूण' म्हणजे "आर्थिक पाया', जो हवा तेवढा मोठा करता येतो. "माणसाने अल्पसंतुष्ट असावे, मिळेल त्यात समाधान मानावे', असे शिकवले जाते. हा अल्पसंतुष्टपणा समाजासाठी घातक असतोच, पण बिझनेस करणाऱ्या माणसास फारच घातक असतो. मला आता जे मिळते आहे, यापेक्षा जास्त मिळाले पाहिजे, या मनोवृत्तीनेच प्रगती होत असते. त्यामुळे बिझनेस करणाऱ्या माणसाने नेहमी "असंतुष्ट' असले पाहिजे. तो आता जे काही करतो आहे, त्यापेक्षा अधिक चांगले करण्याची इच्छा त्याने सदैव बाळगायला हवी. आता माझे पोट भरले आहे. आता अजून मिळविण्याची इच्छा नाही,' अशी भावना जेव्हा निर्माण होते. तेव्हा बिझनेसने "रिव्हर्स गिअर'मध्ये जायला सुरवात केली आहे. किंवा बिझनेसच्या अधोगतीला सुरवात झाली आहे असे खुशाल समजावे.

आर्थिक निरक्षरता हा मराठी माणसाचा फार मोठा दुर्गुण आहे. आर्थिक व्यवहार न समजणे, आर्थिक व्यवहार समजावून घेण्यामध्ये चालढकल करणे, हिशेब ठेवण्याची सवय नसणे, आर्थिक शिस्त नसणे, आर्थिक नियंत्रण नसणे, इतरांवर अतिविश्‍वास ठेवून आर्थिक व्यवहार करणे ही सगळी आर्थिक निरक्षरतेची लक्षणे आहेत. बिझनेस हा शेवटी पैशांचा खेळ असतो व तो व्यवस्थित खेळता येणे आवश्‍यक असते. त्यामुळे आर्थिक साक्षरता वाढवणे गरजेचे आहे.

एकीमध्ये बळ असते. हे लक्षात ठेवावे. मृदू बोलणे हे कमजोरपणाचे लक्षण समजले जाते, तर कठोर बोलणे हे सक्षमपणाचे लक्षण समजले जाते. एक मृदू शब्द दहा माणसे जोडू शकतो, तर एक कठोर शब्द शंभर माणसे तोडू शकतो, हे लक्षात ठेवावे. या गोष्टी अमलात आणल्या तर उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात मराठी समाज स्वतःचे एक आगळेवेगळे व आदरणीय स्थान निर्माण करेल. पाहिजे फक्त प्रबळ इच्छाशक्ती, ईर्षा आणि महत्त्वाकांक्षा!

उल्हास हरी जोशी

ए -३/ ८, सारीतानगरी फेज १, गणेश मळा , सिंहगड रोड पुणे ४११ ०३०

E-Mail:- ulhas_h_joshi@yahoo.co.in

joshiulhas5@gmail.com


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Related Posts with Thumbnails