July 19, 2011

"आपली मुले संगणकाचा गैरवापर तर करीत नाही ना ?" यावर पाळत ठेवा.

नेटभेटचे नियमीत वाचक असलेल्या एका सदगृहस्थांनी मला एक प्रश्न विचारला होता. तो असा -

- मला एक जाणून घ्यायचे आहे की, आपली मुले, भाऊ, बहिणी त्यांच्या लॅपटॉप किंवा
डेस्क्टॉप वर काय काय करत असतात, कुणाशी बोलत असतात, काय बोलत असतात इंटरनेट वर योग्य तेच करतात का हे त्यांना न कळता कसे जाणून घ्यायचे?
जर याबद्दल काही उपाय असेल तर क्रुपया मला त्याबद्दल माहिती द्याल का?

खरे तर कोणाची अशी छुपी माहिती जमा करणे (मग ती स्वतःच्या मुलांची असली तरीही) मला उचित वाटत नाही. मात्र अशाच आशयाच्या आणखी काही ईमेल्स मला आल्या ज्यामध्ये हाच प्रश्न वेगळ्या प्रकारे मांडला होता.

- माझ्या ऑफीसमधील संगणकावर माझ्याव्यतीरीक्त इतरही लोक काम करतात. आणि माझ्या अनुपस्थीतीत माझ्या संगणकावर काही प्रतिबंधीत वेबसाईट्स पाहतात मात्र त्यातून येणार्‍या व्हायरस मुळे माझा संगणक नेहमी बिघडतो. आपोआप इंस्टॉल होणार्‍या काही अश्लिल वॉलपेपर्समुळे माझी बदनामी देखिल होते. तेव्हा माझ्या संगणकाचा गैरवापर नक्की कोण आणि केव्हा करते हे मला शोधता येईल का?

- मी एक उद्योजक असून कामानिमित्त नेहमी फिरतीवर असतो. मात्र मी ऑफिसमध्ये नसताना माझ्या ऑफिसमधील माणसे नीट काम करत आहेत ना, काही टाळाटाळ किंवा पर्सनल कामे करतात का तसेच संगणकाचा आणि इंटरनेटचा गैरवापर तर करीत नाहीत ना ? हे मला कसे शोधता येईल?

वरील प्रश्न पाहिल्यावर मात्र अशा प्रकारे माहिती मिळविण्यामुळे जर कोणाचे नुकसान टाळता येत असेल तर आपण या प्रश्नास उत्तर द्यावे असा विचार करुन मी हे उत्तर शोधले आणि सर्वांच्या माहितीकरता येथे देत आहे. (असे करणे उचित आहे की नाही हे सुजाण वाचकांनी आपले आपणच ठरवावे.)

संगणकाचा वापर कसा केला जातोय हे पाहण्याचा सोपा उपाय म्हणजे इंटरनेट हिस्ट्री Internet History किंवा Start > My Recent documents तपासणे हा होय. मात्र हे दोनही प्रकार बर्‍याच लोकांना माहित असल्याने हिस्ट्री डीलीट करुन किंवा My Recent documents मधील फाईल्स डिलीट करुन लपवता येतात. आपण जो उपाय पाहणार आहोत तो थोडा वेगळा आहे.

या सॉफ्टवेअरची माहिती घेण्याआधी आपण ते कसे काम करते हे पाहुया. एकदा का संगणकावर हे सॉफ्टवेअर इंस्टॉल केले की ते आपोआप स्क्रीनशॉट्स Screenshots घेणे चालू करते. स्क्रीनशॉट म्हणजे संगणकाच्या स्क्रीनचा फोटो. हे स्क्रीनशॉट आपण ठरवून दिलेल्या फोल्डरमध्ये चित्ररुपात (Image format) साठविले जातात. अर्थात असे स्क्रीनशॉट्स घेतले जात आहेत हे वापरकर्त्यांला कळतही नाही.

असे आपोआप स्क्रीनशॉट्स घेणारे अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. आपण त्यापैकीच एका भरवशाच्या सॉफ्टवेअरची माहिती घेऊयात. या सॉफ्टवेअरचे नाव आहे Automatically take screenshot software. freesoft80.com या साईटवर येथे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

सॉफ्टवेअर डाउनलोड व ईंस्टॉल करण्याची पद्धती -

१. येथे क्लिक करुन Automatically take screenshot software डाउनलोड करुन घ्या.

२. Automatically take screenshot software डाउनलोड करण्याआधी संगणकामध्ये मायक्रोसॉफ्ट डॉट नेट फ्रेमवर्क ३.५ (Microsoft .net framework 3.5 ) असणे आवश्यक आहे. हे सॉफ्टवेअर तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या साईटवर येथे जाऊन डाउनलोड करु शकता. (इन्स्टॉलर 2MB चा असला तरी मुख्य सॉफ्टवेअर ५७ MB चे आहे !)


३. एकदा मायक्रोसॉफ्ट डॉट नेट फ्रेमवर्क ३.५ इंस्टॉल झाले की आपण Automatically take screenshot software इंस्टॉल करु शकतो.






४. सॉफ्टवेअर इंस्टॉल झाल्यानंतर खाली दाखविल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल.

यामध्ये A, B व C चा अर्थ अनुक्रमे असा आहे -

A - आपोआप घेतले जाणारे स्क्रीनशॉट्स ज्या फोल्डरमध्ये save करावयाचे आहेत ती जागा. उदाहरणार्थ मी येथे Auto screenshots हा फोल्डर बनविला आहे.

B - किती अंतराने स्क्रीनशॉट्स घ्यायचे आहेत ती वेळ. उदाहरणार्थ मी येथे ३ मिनीटे १० सेकंद अशी वेळ ठरवलेली आहे.

C - या अतिशय महत्त्वाच्या सेटींग्ज आहेत. चित्रात दाखविल्याप्रमाणे Load this software on windows startup आणि Start as hidden application हे दोनही पर्यात निवडा (सिलेक्ट करा). या दोन सेटींग्जचा अर्थ असा आहे की संगणक सुरु करताच हे सॉफ्टवेअर आपोआप चालू होईल आणि लपून राहील त्यामुळे स्क्रीनशॉट्स घेतले जात आहेत हे वापरकर्त्यांना कळणार नाही.

बस. आता संगणकामध्ये घडणार्‍या प्रत्येक घडामोडीचा ठरवलेल्या वेळेनुसार फोटो काढण्यात येईल. हे स्क्रीनशॉट्स पाहून संगणकाचा वापर कसा केला जातोय याकडे बारकाईने लक्ष ठेवता येईल.

Note - सतत स्क्रीनशॉट्स save झाल्यामुळे संगणकाची बरीचशी मेमरी स्पेस वापरली जाईल. तेव्हा ठराविक अंतराने हे स्क्रीनशॉट्स डीलीट करायला विसरु नका.

हा लेख आणि हे सॉफ्टवेअर कसे वाटले ते आम्हाला जरुर लिहून कळवा. आणि कृपया याचा गैरवापर करु नका. प्रत्येकाला असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करा.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

July 18, 2011

गुगल प्लस प्रोजेक्ट - मराठी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन

ईंटरनेटवरील सर्व प्रकारच्या व्यवसायात अग्रणी राहण्याचा चंग बांधलेल्या गुगल काकांना मागील काही वर्षांपासून फेसबुकचा तडाखा बसला होता. एखाद्या राक्षसाप्रमाणे वाढणार्‍या फेसबुकमुळे गुगलची महासत्ता संकटात सापडते की काय हा गेले काही दिवस जाणकारांच्या चर्चेचा विषय झाला होता. तसे फेसबुकचे वाढते सामर्थ्य लक्षात घेऊन गुगलने सोशल मीडीया मध्ये मुसंडी मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला. ऑर्कूट असो, गुगल वेव्ह असो किंवा गुगल बझ्झ असो , गुगलच्या या तिनही प्रयत्नांना जगभरातील नेटीझन्सने फारसा प्रतिसाद दिला नाही. मात्र हार न मानता गुगलने गेल्या महिन्यात गुगल प्लस प्रोजेक्ट लाँच केले. अजून गुगल प्लस खुपच नविन असले तरी गुगलचा हा प्रयत्न फेसबुकला खर्‍या अर्थाने आव्हान ठरेल असे वाटतेय.

सुरुवातीला गुगल प्लस फक्त निमंत्रीतांसाठीच होते. बझ्झ मध्ये सुरुवातीला आलेल्या अडचणींमुळे गुगलचा एक चांगला प्रयत्न फसला होता. तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून गुगलने यावेळेस अतिशय बचावात्मक पवित्रा घेतला होता. साईटचा फाँट, कलर, स्पीड, नावे, युझॅबिलीटी (वापरण्यास सोपे) यांचा खोलवर अभ्यास करून गुगलप्लस तयार करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे सोशल नेटवर्कींग साईट्स वापरण्यात लोकांना काय अडचणी येतात किंवा येऊ शकतात ते अभ्यासून गुगल प्लसची रचना करण्यात आली आहे.

सुरु झाल्यानंतर केवळ २ आठवड्यांतच गुगल प्लसच्या सभासदांची संख्या १ करोड इतकी झाली आहे. आणि दर तासाला लाखो लोक गुगल प्लसचे सभासद होत आहेत. गुगल ने गुगल प्लसमधूनच फेसबुक आणि ट्वीटर वापरता येईल अशी सुविधा ही पुरविली आहे. (पडद्यामागून !) यामुळे गुगल प्लसचा वापर निश्चीतच वाढेल. अजुनही गुगल प्लस सर्वांसाठी खुले करण्यात आलेले नाही. मात्र एकदा का गुगल प्लस सर्वांसाठी उपलब्ध झाले तर जीमेल प्रमाणेच गुगल प्लसचेही वर्चस्व कायम होईल असे वाटते.

मला स्वतःला गुगल प्लस खुपच आवडले. गुगलच्या इतर सेवांप्रमाणे गुगल प्लस वापरण्यास आणि समजण्यास सोपी आहे. फेसबुक प्रमाणे privacy issues समोर येऊ नये याची काळजी गुगल प्लसने घेतली आहे. आणि म्हणूनच मला गुगल प्लस जास्त भावली आहे.

गुगल प्लस सर्वांसाठी खुले झाल्यावर आम्ही त्याबद्दल माहितीपर अनेक लेख लिहिणारच आहोत. मात्र तत्पुर्वी नेटभेटच्या सर्व वाचकांना गुगल प्लसची तोंडओळख व्हावी म्हणून आम्ही एक मराठी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन (Google plus project - A Marathi Powerpoint presentation by Netbhet.com) बनविले आहे. हे प्रेझेंटेशन तुम्ही ऑनलाईन पाहू शकता तसेच डाउनलोड करून घेऊ शकता. ( आणि तुमच्या मित्रमंडळींना ईमेल देखिल करु शकता !)

प्रेझेंटेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा - goo.gl/OZZNe


नेटभेटचा हा नविन प्रयोग कसा वाटला ते आणि गुगल प्लस बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रीया आम्हाला खाली कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

July 17, 2011

घर विकत घेताय? या काही गोष्टी समजून घ्या.

सहसा जेव्हा तुम्ही घर खरेदीसाठी पहायला जाता तेव्हा बिल्डर किंवा रीअल ईस्टेट एजंट घर खरेदीसंबंधी वापरले जाणारे काही विशिष्ट शब्द वापरतात. ही परीभाषा ते ग्राहकास समजावून सांगत नाहीत. एक तर त्यांना असे वाटते की ग्राहकाला हे माहित असेल आणि जर ग्राहकाला यासंबंधी माहिती नसेल तर त्यांना आनंदच होईल. अशा वेळेस बिल्डर्/रीअल ईस्टेट एजंट तुम्हाला दिवसा तारे दाखवू शकतात.

ज्यांना घर विकत घ्यायचे असेल किंवा कार्पघरामध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांना हे काही महत्त्वाचे शब्द माहिती असलेच पाहिजेत. यामुळे तुमची कोणीही फसवणूक करु शकणार नाही. तसे हे शब्द कधीतरी आपल्या ऐकण्यात आलेले असतात पण त्यांचा नेमका अर्थ काय आणि घर खरेदीच्या व्यवहारात या शब्दांचे महत्त्व काय असते हे बर्‍याचदा ठाऊक नसते.

१. Carpet area - (कार्पेट एरीआ - चटई क्षेत्र) -

कार्पेट एरीआ म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी जागा. याचा अर्थ असा की फ्लॅट मधील जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु शकतो ती जागा. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चार भिंतींमधील जागा ज्यावर तुम्ही गालिचा (Carpet) पसरवू शकता.

२. Built up Area - ( बिल्ट अप एरीआ) -

कार्पेट एरीआ अधिक आतील व बाहेरील भिंतींची जाडी म्हणजे बिल्ट अप एरीआ. बिल्ट अप एरीआ हा साधारणपणे कार्पेट एरीआ पेक्षा १०% ते १५% जास्त असतो.

३. Super built up / Saleable area ( SBU - सुपर बिल्ट अप एरीआ) -

बिल्ट अप एरीआ अधिक लिफ्ट, जिना यांसाठी वापरण्यात आलेली संयुक्त जागा म्हणजे सुपर बिल्ट अप (SBU). साधारणपणे Super built up area बिल्ट अप एरीआच्या २५% ते ३०% जास्त असतो. सध्या बहुतेक स्थावर मालमत्ता सुपर बिल्ट अप एरीआच्या आधारे विकल्या जातात. ( मात्र प्रत्यक्षात खरेदी करारावर कार्पेट एरीआचीच नोंद असते.)

समजा तुम्ही बिल्डर कडून खरेदी करणार असलेल्या फ्लॅटचा सुपर बिल्ट अप एरीआ १००० चौरस फूट इतका असेल तर प्रत्यक्षात वापरासाठी मिळणारा कार्पेट एरीआ ६५० ते ७०० चौरस फूट असेल.

४. Approved plans - (मान्यताप्राप्त आराखडा)

स्थावर मालमत्तेचा आराखडा हा संबंधीत महापालिकेने मंजुर केलेला असतो. यामध्ये प्रकल्पाचा आराखडा आणि प्रत्येक फ्लॅटचा आराखडा समाविष्ट असतो.

हा एक महत्त्वाचा दस्तऐवज (Document) असुन बांधकाम कायदेशीर रीत्या करण्यात आले असल्याचा एक मुख्य पुरावा असतो. घर खरेदीचा निर्णय घेण्यापुर्वी मान्यताप्राप्त आराखडा अवश्य तपासून पहावा.

५. Completion certificate / Occupation certificate (OC) -

Occupation certificate (OC) हा एक महत्त्वाचा दाखला असतो. हा दाखला महानगरपालिकेकडून बिल्डरला देण्यात येतो. ईमारतीमध्ये पाणी विजपुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे तसेच सुरुवातीस मंजुर केल्याप्रमाणे आणि मान्यताप्राप्त आराखड्याप्रमाणे ईमारतीचे बांधकाम केले असल्याचा हा दाखला असतो. या दाखल्याद्वारे महानगरपालिकेने सदर ईमारत राहण्यायोग्य असल्याचे जाहीर केलेले असते.

६. Mortgage (गहाणखत) -

गृहकर्ज पुरविणारी बँक आणि खरेदीदार यांमध्ये झालेल्या करारानुसार गृहकर्जाची पुर्ण परतफेड होईपर्यंत विकत घेतलेल्या घराचा ताबा बँकेकडे ठेवला जातो. या करारास गहाणखत किंवा Mortgage Agreement असे म्हणतात.

मालमत्तेची सर्व कागदपत्रे कर्ज फिटेपर्यंत बँकेकडेच राहतात.

७. Possesion letter - (मालकीपत्र)

हे पत्रक बिल्डर कडून ग्राहकास देण्यात येते. यामध्ये असे लिहिलेले असते की मालमत्ता राहण्यासाठी पुर्णपणे तयार आहे आणि आता ग्राहकाकडे हस्तांतरीत करण्यात येत आहे. Possesion letter (मालकीपत्र) मिळविल्याशिवाय ग्राहकास सदनिकेत राहण्यासाठी जाता येत नाही.

८. Registration of an agreement (करार नोंदणी) -

बिल्डर आणि ग्राहकामध्ये जागेचा/घराचा जो करार झालेला असतो त्याची Indian registration Act खाली नोंदणी केली जाते. नोंदणी करण्यापुर्वी Stamp duty (मुद्रांकशुल्क) भरणे आवश्यक असते. स्थावर मालमत्ता विकत घेताना झालेला व्यवहार व करार यांची नोंदणी करणे अत्यावश्यक असते.

सदर नोंदणी करण्यासाठी रजीस्ट्रेशन चार्जेस (Registration charges) द्यावे लागतात.

९. Sales deed (खरेदीखत) -

जमिनीचा मूळ मालक/ बिल्डर यांनी ठराविक रकमेच्या मोबदल्यात मालमत्तेचा मालकी हक्क खरेदीदाराच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठीचा जो करार केला जातो त्यास Sales deed असे म्हणतात. Sales deed ची नोंदणी करणे महत्त्वाचे असते.

१०. Stamp Duty - (मुद्रांक शुल्क)

नोंदणीकृत विक्री मुल्याच्या (Transaction Value) काही टक्के रक्कम मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात सरकारला द्यावे लागतात. ग्राहकाने Stamp duty भरलेली आहे आणि त्याच्या/ तिच्या नावावर मालमत्तेची नोंदणी झालेली आहे. Stamp duty विक्री मुल्याच्या ५% ते १४% पर्यंत असते. हे दर वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे असतात.

घरखरेदीसाठी उपयुक्त ठरणारी ही माहिती आपल्याला नक्कीच आवडेल आणि उपयुक्त ठरेल अशी आम्हाला आशा वाटते. घरखरेदी संबंधी इतरही उपयुक्त माहिती आम्ही विविध लेखांद्वारे प्रकाशित करणार आहोत. हा लेख कसा वाटला ते आणि काही प्रश्न व सूचना असल्यास आम्हाला खाली comments मध्ये नक्की लिहून कळवा.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

July 08, 2011

'सिलिकॉन व्ह्याली ' (Silicon Valley) एक अजब रसायन

अमेरिकेतील स्यान फ्रान्सिस्को ( San Francisco ) ते स्यान ओजे ( San Jose ) या ८० मैलांच्या पाट्याला ' बे अरिया' ( Bay Area ) असे म्हणतात. हाच एरिया अख्या जगामध्ये ' सिलिकॉन व्ह्याली' म्हणून ओळखला जातो. कॉम्पुटर, हार्ड वेअर, सोफ्ट वेअर ( Soft Ware ) आणि आय. टी. इंडस्ट्रीची ही मक्का म्हणून ओळखली जाते.या खेत्रातील १५० प्रमुख कंपन्यांची मुख्यालये ( Head Quarters ) याच भागात आहेत. यामध्ये इंटेल (Intel ), Apple , गुगल ( Google ), याहू (yahoo ), Oracle , सिस्को ( Cisco ), एच. पी. ( H.P. ),सन मायक्रो ( Sun Micro ), फेसबुक ( Face book ), Twitter , यु ट्यूब ( You Tube ), या प्रमुख कंपन्या आहेत. IBM, डेल (Dell), Microsoft या प्रमुख कंपन्या या भागातील नाहीत. पण या भागाचे महत्व ओळखून व या भागात आपला प्रेझेन्स असावा म्हणून या कंपन्यांनी सिलिकॉन व्ह्याली मध्ये आपली ऑफिसेस थाटली आहेत.

सिलिकॉन व्ह्याली हे एक अजब रसायन आहे. उद्योग व्यवसायातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी येथे घडत असतात.अनेक नवीन उत्पादनाबरोबरच अनेक नवीन कल्पना, नवीन विचार, नवीन परंपरा यांचा जन्म येथे होत असतो.

पहिली गोष्ट म्हणजे येथील बहुतेक प्रमुख कंपन्यांचे संस्थापक हे शाळा- कॉलेजमधील ड्रोप आउट झालेले किंवा शिक्षण पूर्ण न केलेले आहेत. त्यातील बहुतेक जण गरीब- मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेले आहेत. बहुतेक जणांना उद्योग व्यवसायाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. असे असूनही आज ही मंडळी प्रसिध्धीच्या झोतात आहेत. यातील कित्येक जणांची नावे जगातील अब्जाधीश व्यक्तींच्या यादीत झळकली आहेत. बहुतेकांनी अगदी तरुण वयातच हे यश संपादन केले आहे. खालील यादी बघा.

  • बिल गेट्स ( Bill Gates ) :- हार्वर्ड मधला ड्रोप औट. Microsoft ची स्थापना. श्रीमंत क्र. २. संपत्ती ५६ अब्ज डॉलर्स म्हणजे २४७५ अब्ज रुपये. वय ५५ वर्षे.
  • लेरी अलीसन ( Larry Ellison ) :- युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय ( Illinois ) आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो ( Chicago ) मधून ड्रोप औट. Oracle ची स्थापना. श्रीमंत क्र.५. संपत्ती ३९.५ अब्ज डॉलर्स म्हणजे १७७५ अब्ज रुपये. वय ६६
  • स्टीव जॉब्स ( Steve Jobs ) :- रीड कोलेज ( Reed College Portland ) मधून ड्रोप औट. Apple ची स्थापना. श्रीमंत क्र.११०. संपत्ती ८.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ३८२.५ अब्ज रुपये.वय ५६.
  • मार्क झुकेरबर्ग( Mark Zuckerberg ) :- हार्वर्ड मधून ड्रोप औट. Face book ची स्थापना. श्रीमंत क्र.५२. संपत्ती १३.५ अब्ज डॉलर्स म्हणजे ६०७.५ अब्ज रुपये. वय २७
  • जेरी यांग ( Jerry Yang ) आणि डेव्हिड फिलो ( David Filo ):-
    दोघेही Stanford युनिवर्सिटी मध्ये पी. एच डी. करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Yahoo ची स्थापना.

जेरी यांग( Jerry Yang )-श्रीमंत क्र.९३८. संपत्ती १.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ५८.५ अब्ज रुपये. वय ४२.

डेव्हिड फिलो ( David Filo )- श्रीमंत क्र.८७९. संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स म्हणजे ६३ अब्ज रुपये. वय ४५

  • सर्जी ब्रिन ( Sergey Brin ) आणि ल्यारी पेग ( Larry Page ) :- दोघेही Stanford मध्ये पी. एच डी करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Google ची स्थापना

सर्जी ब्रिन ( Sergy Brin )- श्रीमंत क्र.२४. संपत्ती १९.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ८९१ अब्ज रुपये. वय ३८.

ल्यारी पेग ( Larry Peg )- श्रीमंत क्र.२४. संपत्ती १९.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ८९१ अब्ज रुपये. वय ३७

दुसरी गोष्ट म्हणजे यातील बहुतेक कंपन्या या अत्यल्प भांडवलावर, ग्यारेजेस मध्ये सुरु केलेले अती अल्प लघु उद्योग ( Very Small Scale Industry ) आहेत. आज याच कंपन्यांचे रुपांतर जगातील मोठ्या, प्रतीष्टीठ, दर्जेदार आणि बलाढ्य कंपन्यांमध्ये झाले आहे. बीझिनेससाठी शाळा कॉलेजमधील शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असतेच असे नाही. तुमच्याकडे जर चांगला बिझिनेस प्लान किंवा कल्पना असेल तर शाळा कोलेजच्या शिक्षणात वेळ घालविण्यात काही अर्थ नाही. कारण हे शिक्षण जरूर भासल्यास तुम्ही नंतर केव्हाही पूर्ण करू शकता. अशी येथील विचार धारा आहे.

माणसाच्या क्वालिफिकेशन, डिग्री, परीक्षेतील मार्क, टक्केवारी, ग्रेड या पेक्षा त्याचा ' Talent ' महत्वाचा! त्याच्या 'पास्ट पर्फोर्मंस ' ( Past Performance ) पेक्षा तो 'फ्युचर 'मध्ये काय करू शकतो हे महत्वाचे. त्याची traditional पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करायची कुवत किती हे महत्वाचे. त्याला किती नवीन कल्पना सुचू शकतात हे महत्वाचे. सिलीकोन व्ह्यालीमधील बोझीनेस हा पाया आहे. म्हणूनच हा भाग जगातील Technology व Talent चा हब ( Hub ) म्हणून ओळखला जातो.

परंतु तेथील बिझिनेस या एवढ्याच क्वालिफिकेशन वर यशस्वी झालेले नाहीत. वरील लोकांमध्ये आहे तो धृढ आत्मविश्वास. स्वतःच्या क्षमतेवर आणि कर्तुत्वावर असलेला पूर्ण विश्वास! आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा आपले उत्पादन/ कल्पना/ आयडिया जास्त चांगली आहे या विषयी असलेली अतूट श्रद्धा! आणि कांहीतरी वेगळे, 'हटके', नवीन करण्याची प्रबळ इच्छा आणि तळमळ. या मुळेच हे बिझिनेस एवढे मोठे होऊ शकले.

माणसाच्या Talent वर त्याला प्रगतीची संधी देणारा हा भाग आहे. या मध्ये जात, पात, लिंग भेद, कातडीचा रंग या गोष्टी आड येवू नयेत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे अख्या जगातले Talented तरुण सिलीकोन व्ह्यालीकडे आकर्षित झाले नसतील तरच नवल! आज सिलीकोन व्हालीमध्ये जेवढे फोरीन वर्कर्स काम करतात तेवढे जगात कुठेच आढळून येत नाहीत. तसेच त्यांच्या जेवढी विविधता दिसून येते तेवढी जगात दुसरीकडे कोठेच आढळून येणार नाही. या मध्ये हेस्प्यानिक ( म्हणजे mexico तून आलेले व Spanish मातृ भाषा असलेले ) लोक सर्वात जास्त आहेत. त्यानंतर आशियाई लोकांची संख्या आहे. यामध्ये चीनी आणि भारतीय लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर जपानी, कोरियन, तैवानीज, Vietnam मधून आलेले लोक, फिलिपिनो यांची संख्या आहे. त्यानंतर इतर देशातून आलेल्या लोकांची संख्या आहे. आज सिलिकॉन व्ह्यालीमधील ४६ % लोकसंख्या परदेशातून आलेल्या लोकांची आहे. त्या मुळे तेथे खऱ्या अर्थाने जागतिक संस्कृतीचे दर्शन घडते. तसेच भारतातील अनेक राज्यातील लोक तेथे गेले आहेत. त्यामुळे तेथे मिनी भारत दर्शन घडते.

व्यवस्थापन क्षेत्रात या विभागावे अनेक नवीन कल्पना अमलात आणल्या, अनेक नवीन पायंडे पडले. येथे अगदी वेगळ्या प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात आल्यावर मुलाखतीच्या तंत्रामध्ये ( Interview Techniques ) अमुलाग्र बदल करण्यात आले. हल्ली मुलाखतीमध्ये कोडी ( Puzzles ) विचारण्याची पध्धत बर्याच ठिकाणी अवलंबली जाते. त्याची सुरवात येथूनच झाली. उत्तम मनुष्यबळ पुरविण्याचे काम शाळा, कॉलेजेस आणि Universities करत असतात हे ध्यानात आल्यामुळे तेथील कंपन्यांनी शिक्षण संस्थांबरोबर घनिष्ट संबंध पहिल्यापासूनच ठेवले आहेत. Stanford हि जगप्रसिध्ध University याच भागात आहे. ही खाजगी University जगातील नम.१ ची सर्वोत्तम University समजली जाते. याचे बजेट हे अनेक राष्ट्रांच्या बजेट पेक्षा जास्त असते. SUSJ (State University of San Jose), University of Santa Clara तसेच बर्कले येथील University या चार प्रमुख Universities या भागात आहेत

येथील CEOs नी बॉस या कल्पनेमधेच अमुलाग्र बदल घडवून आणले. कंपनीचा बॉस हा नेहमी सुटा-बुटातच असला पाहिजे. त्याला भली मोठी केबिन असायला पाहिजे. त्याच्या भोवती सेक्रेटरींची टीम असायला हवी अशी जी परंपरा होती ती पार मोडीत काढली. कंपनीचा बॉस हा सुध्धा कंपनीतील इतर साध्या सुध्या वर्कर सारखाच असावा. त्याने पण इतरांसारखेच हॉल मध्ये बसून काम करावे. त्याला केबिन, सेक्रेटरी असा थाट नसावा. तसेच त्याचे कपडे पण सर्व साधारण माणसांसारखे साधे व क्याजुअल असावेत असा नवीन पायंडा पडला.

छोट्या स्टार्ट अप कंपनीचे रुपांतर जगातल्या मोठ्या कंपनीत कसे करता येते हे सिलीकोन व्ह्यालीने दाखवून दिले आहे. श्रीमंतीचे वाटप कसे करता येते. व्यवस्थापन क्षेत्रात किती नवीन कल्पना राबविता येऊ शकतात हे सिलीकोन व्ह्यालीने दाखवून दिले आहे. आज सिलीकोन व्ह्यालीमधील कंपन्या जेवढा रेवेन्यु निर्माण करतात तेवढा जगात दुसरीकडे कोठेच निर्माण होत नाही.

आज भारतीय लीकांना अमेरिकेमध्ये जी इज्जत, प्रतिष्ठा, सन्मान आणि गौरव मिळतो आहे त्यामध्ये सिलिकॉन व्यालीचे योगदान फार मोठे आहे. आज तेथे हजारो भारतीय तरुण अभियंते आणि तंत्रज्ञ तेथील सर्वच कंपन्यांमध्ये उत्तम काम करीत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये अनेक भारीतीय उच्च पदावर काम करीत आहेत. यामध्ये मराठी लोकांची पण संख्या लक्षणीय आहे. आपण सुध्धा उच्च दर्जाचे काम उत्तम पणे करू शकतो असा आत्मविश्वास भारतीयांमध्ये जागृत करण्याचे फार मोठे काम सिलिकॉन व्हालीने केले आहे.

भारतीय, विशेषतः मराठी तरुणांना यातून बरेच काही शिकता येण्यासारखे आहे.

आज भारताची जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने घोड दौड चालू आहे. याचा अर्थ आज जागतिक स्तरावर उद्योग व्यवसाय सुरु करण्याची संधी भारतीय तरुणांपुढे चालून आली आहे. मराठी तरुण तरुणींनी या सुवर्ण संधीचा फायदा उठवावा. ज्याप्रमाणे पेशव्यांच्या काळात मराठी झेंडा अटकेपार( जे आता पाकिस्तानात आहे) नेला होता. त्याप्रमाणे उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने मराठी झेंडा अमेरिका ते new zealand पर्यंत आख्या जगात फडकवा. तसेच यापुढे मराठी समाजातच बिल गेट्स आणि मार्क झुकेरबर्ग निर्माण व्हावेत हीच शुभेच्छा!

From:-उल्हास हरी जोशी
ए -३/ ८, सारीतानगरी फेज १,
गणेश मला
सिंहगड रोड
पुणे ४११ ०३०
E-Mail:-
ulhas_h_joshi@yahoo.co.in

joshiulhas5@gmail.com


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Related Posts with Thumbnails