स्टीव्ह जॉब्जचं निधन झालं तेव्हा अख्ख जग रडलं होतं. कारण या अवलियाने आपल्या मेहनतीने, ध्यासाने आणि तंत्रज्ञानातील अनन्यसाधारण हुशारीने जग बदललं होतं. संगणक, मोबाईल, संगीत, डीझायनींग या सर्व क्षेत्रांमध्ये त्याने कमालीचे बदल घडवुन आणले. शेवटी जग सर्वाधीक पैसे कमावणार्या,सर्वात प्रसिद्ध व्यक्तींची दखल न घेता असामान्य कर्तुत्वाची दखल घेते हे स्टीव्हने दाखवुन दिले. स्टीव्ह प्रमाणेच जग बदलवण्याची क्षमता असणारा आणखी एक ईंजीनीअर, डीझायनर, बिझनेसमॅन अशी व्यक्ती सध्या अमेरीकेत आहे. आणि मला असं वाटतंय की नेटभेट्च्या बर्याच वाचकांना त्या व्यक्तीबद्दल माहिती नाही आहे. मित्रांनो, या व्यक्तीचे नाव आहे एलॉन मस्क (Elon Musk). एलॉनला आताच भविष्यातील स्टीव्ह जॉब्स असे लोक म्हणू लागले आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण असं का म्हंटल जातं ते पाहणार आहोत आणि त्याच्या अनन्यसाधारण , महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती घेणार आहोत. सुरुवात दक्षीण अफ्रीकेमध्ये जन्म झालेल्या आणि नंतर अमेरीकेत स्थीरावलेल्या एलॉनने 12 वर्षांचा असताना स्वतः प्रोग्रामींग करुन बनवलेला एक व्हिडीओ गेम कोड ५०० डॉलर्सला विकला होता. ती त्याच्या व्यवसायाची छोटीशी सुरुवात होती. त्यानंतर दहा वर्षांनी त्याने ZIP2 ही कंपनी सुरु केली आणि लवकरच ३ करोड अमेरिकन डॉलर्सला Compaq या बड्या अमेरिकन कंपनीला ती विकली. पुढे जाऊन एलॉनने X.com ही ऑनलाईन फायनान्स कंपनी सुरु केली. याच कंपनीने जगप्रसिद्ध Paypal ही कंपनी विकत घेतली. पुढे Paypal ने ऑनलाईन खरेदी आणि पैशाची देवाणघेवाण या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं. एक यशस्वी उद्योजक म्हणून एलॉन नावारूपाला आला. मात्र या मध्ये न रमता एलॉनने ही कंपनी देखील ebay.com या मोठ्या कंपनीला २००२ साली तब्बल १५० करोड अमेरिकन डॉलर्सला विकली. टेस्ला मोटर्स इथेपर्यंत सगळं ठीक होतं पण नंतर एलॉनने जे केलं त्यामुळे बऱ्याच लोकांनी एलॉनला वेड्यात काढलं. एलॉनने सुरु केली SpaceX नावाची एक रॉकेट कंपनी. ही कंपनी तग धरते न धरते तोपर्यंत त्याने टेस्ला मोटर्स Tesla Motors या आणखी एका नव्या कंपनीत मोठी गुंतवणूक केली. टेस्ला मोटर्स ही इलेक्ट्रिक कार्स बनविण्यासाठी संशोधन करत होती. २००८ पर्यंत Tesla Motors ची किंमत कमी होऊन फक्त ९० लाख डॉलर्स इतकी राहिली होती. पण अजिबात हार न मानता एलॉनने या कंपनी मध्ये आपले सर्व पैसे पणाला लावले. याच वर्षी एलॉनला कंपनीचा चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याने Tesla च्या Product Development ची पूर्ण जबाबदारी घेतली आणि कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार Tesla Roadster बाजारात आणली. ही कार खूप महाग असल्याने फारशी चालली नाही. परंतु ही कंपनी करत असलेल्या प्रयोगांमध्ये काही खास आहे हे तथ्य जगासमोर आलं. टेस्लाने विकसित केलेली इलेक्ट्रिक कार टेक्नोलॉजी (electric powertrain systems) स्वत:पुरती मर्यादित न ठेवता मर्सिडीझ आणि टोयोटा या कंपन्यांना विकायलाही सुरुवात केली. टेस्लाची या तंत्रज्ञानातील प्रगती पाहून या दोनही कंपन्यांनी टेस्लामध्ये मोठी गुंतवणूक केली. जून २०१२ मध्ये टेस्लाने आपली दुसरी कार Tesla Model S ही लक्झरी सेदान या श्रेणीतील कार बाजारात आणली. ही खऱ्या अर्थाने पहिली परिपूर्ण इलेक्ट्रिक कार होती. डिसेंबर २०१३ पर्यंत टेस्लाने २५००० गाड्या विकल्या आहेत. २०१३ चा World Green Car of The Year आणि Car of the year हे दोनही सन्मान टेस्ला मॉडेल S ला मिळाले. तसेच टाईम मासिकाचा २५ महत्वपूर्ण शोधांपैकी एक हा पुरस्कार ही मिळाला. मॉडेल S चा व्हीडीओ पाहून या गाडीची क्षमता आपल्या लक्षात येईल. येत्या काही वर्षात पेट्रोल, डीझेल वरील गाड्यांची जागा पूर्णपणे इलेक्ट्रिक कार्स ने घेतलेली असेल. SpaceX Technologies एलॉनने २००२ साली सुरु केलेल्या SpaceX Technologies या कंपनीने दरम्यानच्या काळात बरीच प्रगती केली होती. SpaceX ने फाल्कन ९ हे रॉकेट आणि Dragon हे स्पेसक्राफ्ट बनविले. २००८ साली खुद्द NASA ने SpaceX बरोबर सहकार्य करार केला. सॅटेलाईट पृथ्वीच्या कक्षेबाहेर पोहोचवणारी SpaceX Technologies ही जगातील पहिली खाजगी कंपनी ठरली. मंगळावर मानवी वस्ती करण्यासाठी संशोधन करणे, मंगळावर माणसाला पोहोचवण्यात येणाऱ्या खर्चाच्या १/१० (एक दशांश) खर्चात मंगळावरील दळणवळण शक्य करणे ही SpaceX ची मुख्य उद्दिष्टे आहेत. एलॉनच्या मते मानवी संस्कृती टिकण्यासाठी आणि तिची प्रगती होण्यासाठी पृथ्वी व्यतिरीक्त इतरत्र मानवी वस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा ग्लोबल वार्मिंग, अणुयुद्ध, प्रलय, दुष्काळ, पाणी आणि अन्नाचा अभाव अशा कोणत्याही कारणाने मनुष्यजातीचा संपूर्ण विनाश होईल. त्याच्या मते, डायानोसोर्स ना जे शक्य नव्हत ते माणसाला शक्य आहे. म्हणूनच इतरत्र वस्ती करणे हे संपूर्ण मनुष्यजातीसाठी आवश्यक आहे. SpaceX ने मंगळावर माणसे आणि सामग्री पोहोचवून पुन्हा व्यवस्थित पृथ्वीवर परत येणारे यान बनवायला घेतले आहे आणि त्याची पहिल्या टप्प्यातील यशस्वी चाचणीही घेतली आहे. आणखी १०-१२ वर्षांत मंगळावरील दळणवळण सोपे, स्वस्त आणि शक्य होईल (थोडक्यात मंगळावरील शटल सर्विस!) असा एलॉनचा दावा आहे. खाली दिलेला व्हीडीओ पाहून SpaceX च्या कामाची एक झलक आपल्याला दिसू शकेल. गेले कित्येक वर्षे दररोज १६ तास असे अथक आणि अविरत परिश्रम करणारा एलॉन मस्क हा अनोखा ईंजीनीअर आणि बिझनेसमॅन एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आणखीही जीवनमान बदलवून टाकणारया आणखीही काही महत्वाच्या योजना हाती घेतल्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊया पुढील लेखात ! धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com धीरूभाई अंबानी यांचे व्यवहार आणि व्यवसाय चातुर्य आपणा सर्वाना माहित आहेच. दडून बसलेली संधी शोधणे आणि त्या संधीचा योग्य उपयोग करून त्यातून नफा मिळवण्याची धीरुभाईंची हातोटी खरंच वाखाणण्याजोगी होती. धीरुभाईंच्या या हुशारीचे एक उदाहरण नुकताच वाचनात आले. ते असे...
गोष्ट आहे १९५० सालची. तेव्हा धीरूभाई येमेन या देशात नोकरी करत होते. त्या काळात येमेन सरकारच्या अर्थ खात्यातील काही अधिकाऱ्याना एक विचीत्र गोष्ट लक्षात आली. येमेनचे चलन असलेल्या रियालची (Rial) नाणी झपाट्याने लुप्त होत होती. ही नाणी अचानक कुठे जाऊ लागली याचा त्यांनी शोध सुरु केला. काही दिवसांनंतर त्यांचा लक्षात आले की सर्व नाणी येमेन मधील आदेन या शहरातून अदृश्य होत आहेत. आणखी चौकशी केली असता त्यांना कळले की धीरूभाई नावाचा एक भारतीय कारकून बाजारातून ही नाणी चलनाच्या किमतीपेक्षा जास्त भाव देऊन विकत घेत होता. धीरूभाई तेव्हा जेमतेम २० वर्षांचे होते. त्यांच्या लक्षात आले होते की येमेनचे चलन असलेले रियाल हे नाणे चांदीचे होते. आणि चलनी बाजारात असलेल्या या नाण्याच्या ब्रीटीश पौंडामधील किमतीपेक्षा , तेवढयाच वजनाच्या चांदीची किमत अधिक होती. धीरुभाईंनी नाणी बाजारातून जास्त भावाने खरेदी केली आणि नंतर ती नाणी वितळवून धातूच्या बाजारात जास्त भावाने विकली. केवळ तीन महिन्यात या सर्व व्यापातून धीरुभाईंनी त्याकाळी काही लाखांचा फायदा कमावला होता. पुढे सरकारच्या लक्षात आल्यावर धीरुभाईंनी हा उपद्व्याप थांबवला पण आपल्या व्यवहार चातुर्याची चुणूक मात्र त्यांनी दाखवून दिली होती. धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com आपण साधा चाट मसाला विकत आणला तर त्यावर आलू चाटची पाककृती मागे लिहिलेली असते. लोणची मसाल्यांचेही तसेच. आणि कुकर घेतला तर पूर्ण पाककृतींचे पुस्तकच विनामुल्य मिळते. आपल्याला स्वयंपाक येत नसला तरी अगदी मोजक्या शब्दांत, सहज मिळालेली ही पाककृतींची मदत सुखावणारी असते. शिवाय, वेगवेगळ्या पदार्थांच्या, लोणच्यांच्या तोंडाला पाणी सुटेल आणि पटकन खायची इच्छा होईल अशा प्रतिमापण त्या छोट्याशा पाकिटावर लिहिलेल्या असतात. आणि आपण अगदी ५-६ सेकंद विचार करून ते उत्पादन घेतोसुद्धा. हे सगळे काय आहे? आपल्याला मदत करणाऱ्या पाककृती, भुरळ पाडणाऱ्या प्रतिमा?
हेच आहे कंटेंट मार्केटिंग – ग्राहकोपयोगी माहितीचे वितरण करून साधलेले विपणन. पण हे झाले अगदीच पारंपरिक पद्धतीचे कंटेंट मार्केटिंग. आजच्या काळात सर्व वयोगटांतील लोकांचा जास्तीत जास्त वेळ इंटरनेट, मोबाईल, सोशल मिडिया व विविध अॅप्स् यांवरच जातो. अर्थातच, विविध लहानमोठ्या व्यवसायांना त्यांचे संभाव्य ग्राहक मिळविण्यासाठी कंटेंट मार्केटिंग ऑनलाइन जगातच प्रामुख्याने करावे लागते. आज आपण कंटेंट मार्केटींगचे आव्हानात्मक तरीही रंजक विश्व बघुयात. कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय?कंटेंट मार्केटिंग म्हणजे आपल्या उत्पादनाशी संबंधित किंवा आपल्या व्यवसायाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती विविध स्वरुपांत विविध मिडियावर उपलब्ध करून देणे. पण ही माहिती प्रत्यक्ष विक्रीसंबंधित नसावी. म्हणजे सतत आपल्या उत्पादनाची जाहिरात नसावी. रोजच्या जीवनात आपल्याला कुठल्याही विषयासंबंधी छोटी मोठी समस्या निर्माण झाल्यास आपण पटकन गुगल उघडतो, आपली समस्या शोध चौकटीत लिहून शोध घेतो. परिणामांमध्ये जे संकेतस्थळ आपल्याला आवश्यक माहिती देईल, ते आपल्याला आवडते. कंटेंट मार्केटिंगमध्ये आपल्याला हेच करायचे आहे. कंटेंट म्हणजे अशी माहिती लोकांना सहज उपलब्ध करून द्यायची, जी उपयुक्त ठरेल. एखादा ब्रँड जेव्हा उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती देऊ लागतो, तेव्हा लोक त्या ब्रँडशी मनाने जुडतात. आणि अर्थातच, आपल्या उत्पादनाची किंवा सेवांची जाहिरात बघताच किंवा बघण्याआधीही आपल्या उत्पादनांकडे आकर्षित होतात. स्वत: कंपनीच्या विविध सेवा आणि उत्पादनांची माहिती घेतात आणि उपयुक्त माहितीमुळे आधीच निर्माण झालेल्या विश्वासाने आपल्या आवडत्या ब्रँडचेच उत्पादन घेणे पसंत करतात. कंटेंट मार्केटिंग नीती कशा ठरवाव्यात?माझ्या मते मार्केटिंग म्हणजे आपल्या ग्राहकांना जाणणे. इतकेच. त्यासाठी लोकांशी चर्चा, संवाद साधणे फार आवश्यक ठरते. त्यावर खर्च होतो, पण संवाद साधल्याने जो विश्वास निर्माण होतो, तो केवळ जाहिरातींनी होणे शक्य नाही. आणि आपला संवाद सुरु होतो उत्कृष्ट कंटेंटने. ग्राहकोपयोगी माहितीचे विविध प्रकार आहेत, लेख, संबंधित बातम्या, प्रश्नोत्तरे, श्वेतपत्रे, ई बुक्स, विडीओज, इन्फोग्राफिक्स, प्रतिमा, ग्राहक – प्रतिक्रिया. कंटेंट मार्केटिंग करताना सर्वांत महत्त्वाची बाब ध्यानात ठेवणे आवश्यक आहे, की माहिती प्रसारित करून साधले जाणारे आपले ध्येय. आपण माहिती प्रसृत करतो, तेव्हा येणारा खर्च, वेळ आणि त्यापासून आपल्याला किती व्यवसायवृद्धी हवी आहे. त्याचे स्पष्ट लक्ष्य ठरवून मगच कंटेंट नीती ठरवावी. परिणामांचे नियमित अवलोकन करावे आणि पुढे आवश्यक ती नीती ठरवीत जावी. कंटेंट मार्केटींगची विविध माध्यमे: सोशल मिडिया मार्केटिंग: सोशल मिडिया विनामुल्य असल्यामुळे, तांत्रिक दृष्ट्या वापर सहज सोपा असल्याने सर्व वर्गांतील लोक सोशल मिडीयावर माहिती वाचतात, शेयर करतात आणि अर्थातच आपली मते बनवितात. तरीही, सर्वच व्यवसायांसाठी, सर्व सोशल मिडिया वाहिन्या आवश्यक नाहीत. कंटेंट मार्केटिंग नीती ठरविण्यापूर्वी आपले संभाव्य ग्राहक, कुठल्या सोशल साईटवर मुख्यत: सक्रीय आहेत हे बघावे. आणि त्या वाहिनीवरच आपले माहिती प्रसारित करण्याचे, फोलोअर्स मिळविण्याचे लक्ष केंद्रित करावे. संकेतस्थळ व ब्लॉग: जेव्हा ग्राहक समस्या सर्च इंजिनवर शोधतात, त्यावेळी परिणाम मुख्यत: संकेतस्थळे किंवा ब्लॉग्स असतात. उदा: वैद्यकीय समस्या किंवा विविध मोबाईल फोन, संगणक, स्मार्टफोन यांची परीक्षणे. त्यामुळे आपल्या व्यवसायाचा विषय जर सर्च इंजिनवर अधिक शोधला जात असेल, तर आपण लेख, मार्गदर्शनपर ब्लॉग, प्रश्नोतरे या माध्यमांतून कंटेंट मार्केटिंग करू शकतो. ध्वनिचित्रमुद्रणे: युट्युबवर विडीओ अपलोड करणे अगदी सोपे आहे. वाचण्यापेक्षा विविध विषयांवरची माहिती ऐकणे आणि बघणे, कुणी समजावून सांगणे हे बऱ्याच ग्राहकांना आवडते आणि ते काही विषयांच्या बाबतीत उपयुक्तसुद्धा ठरते, उदा. पाककृती, तांत्रिक समस्या निराकरण (Troubleshooting) ईमेल मार्केटिंग: आपल्या आवडत्या विषयाची माहिती थेट इनबॉक्समध्ये मिळण्याने शोध करण्याचा वेळ वाचतो. आपण जी ग्राहकोपयोगी माहिती देत असाल ती ईमेलद्वारे संभाव्य ग्राहकांना सबस्क्राइब करायला प्रेरित करा. ग्राहकांच्या समस्यांना ईमेल किंवा थेट चर्चेद्वारे (chat) उत्तरे द्या. माहिती प्रसारित करण्यापूर्वी त्याचे वेळापत्रक बनवा आणि ठराविक कालावधीने माहिती ग्राहकांसमोर सादर करा. ~~ सार ~~ इंटरनेट क्रांतीमुळे कंटेंट मार्केटिंग खूप सोपे झालेय पण म्हणूनच स्पर्धात्मकसुद्धा. आजपासूनच आपल्या मार्केटिंग नीतीमध्ये कंटेंट मार्केटिंग समाविष्ट करा. आपल्या व्यवसायासंबंधी विषयाची माहिती प्रसारित करण्यापूर्वी तीन प्रश्नांवर विचारमंथन करा आणि यशाच्या या नव्या वाटेवर चालणे सुरु करा. कंटेंट मार्केटिंग: कुठे, काय आणि केव्हा! - मोहिनी पुराणिक |