'गरज ही शोधाची जननी आहे', अशी एक म्हण आहे. या उक्तीनुसारच 'रोटीमॅटीक'चा जन्म झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोल आणि चांगल्या चपात्या बनविणे, हे एका नवविवाहित तरुणीकरिता किंवा नव्याने स्वयंपाक करावयास शिकणाऱ्या कोणासाठीही अग्निपरिक्षेप्रमाणे असते. मात्र ही अग्निपरिक्षा देणे, सहजसोपे आणि सुकर झाले आहे ते 'रोटीमॅटीक' या रोबोटमुळे. झिंप्लिस्टीक निर्मित रोटीमॅटीक हा पहिला असा रोबोट आहे, जो केवळ घरगुती चवीच्या चपात्याच बनवत नाही तर अवघ्या एका सेकंदात त्या घडी करुनदेखील ठेऊ शकतो. रोटीमॅटीक या रोबोटच्या निर्मात्या असलेल्या प्रणोती नगरकर यांनी कुटुंबाला ताजे जेवण देण्यासाठी मदत म्हणून या रोबोटची निर्मिती केली. गोष्टी सहजसोप्या होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रणोती यांना लग्नानंतर कामाच्या वेळापत्रकात धावपळ होऊ लागल्याने ही कल्पना सुचली. याबाबत त्या सांगतात की, 'महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकत असताना मी शर्टांना इस्त्री करण्यासाठी स्वयंचलित इस्त्री तयार केली होती. त्यावेळेस मी चांगली संशोधक होऊन, माझ्या या संशोधनांनी इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकेन, अशी मला आशा वाटली.' प्रणोती यांना अभियांत्रिकीचा हा वारसा पिढीजातच लाभला आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रणोती या चौथ्या पिढीतील अभियंत्या असून, संशोधक होण्याचे आणि नवनवीन शोध लावण्याचे त्यांचे स्वप्न होते. आपल्या कुटुंबाबद्दल मोकळेपणाने बोलताना प्रणोती सांगतात की, 'माझे आई-वडिल दोघेजणही उद्योजक होते. माझी आई अत्यंत हुशार आणि चैतन्यदायी अशी चित्रकार. स्वतःचा इंटेरियर डिझायनिंगचा व्यवसायदेखील तिने सुरू केला. आजच्या युगाशी बरोबरी साधण्यासाठी तिने संगणकाचे प्रशिक्षणदेखील घेतले. याशिवाय माझी आई एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. तिला आवडत असलेल्या गणित विषयाच्या ती शिकवण्या घेते. याउलट माझे वडिल. ते अगदी धाडसी, व्यवहारी, विचारी आणि तर्कनिष्ठ असे होते. मशीन निर्मिती करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. विशेष म्हणजे वयाच्या पन्नाशीत त्यांनी स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले. माझ्यात मात्र माझ्या पालकांचे दोन्ही गुण उतरले आहेत. कला क्षेत्रातील आईचा स्वभाव थोडासा बंडखोर. मात्र वडिल तेवढेच नम्र विचारांचे आणि स्वभावाचे.' पुण्यात बालपण घालवलेल्या प्रणोती यांना महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात सिंगापूर एयरलाईन्स शिष्यवृत्तीअंतर्गत सिंगापूरला जाण्याची संधी मिळाली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचे निश्चित असल्याने त्यांनी मॅकेनिकल अभियांत्रिकी विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सिंगापूरमधील बार्कले येथील राष्ट्रीय विद्यापीठात प्रोडक्ट डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. स्टुडन्ट एक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत त्या शिक्षणासाठी सिंगापूरला गेल्या होत्या. उत्पादनाच्या विस्ताराची प्रक्रिया समजण्यासाठी प्रणोती यांनी एका प्रोडक्ट डिझायनिंग कंपनीत दोन वर्षे कामाचा अनुभवदेखील घेतला. मात्र हे सर्व करत असताना प्रणोती यांच्या डोक्यात मात्र आपल्याला भविष्यात काय करायचे आहे, याचा विचार घोंगावत होता. कालांतराने प्रणोती यांचे लग्न झाले आणि त्यानंतर आजच्या युगात तरुणींना भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या समस्येवर त्यांनी मात केली. रोटीमॅटीकच्या निर्मितीबद्दल विस्तृतपणे सांगताना प्रणोती सांगतात की, '२००८ साली मी झिंप्लिस्टीकची सुरुवात केली. स्वयंचलित चपात्या बनवणारे मशीन बनवण्याचे माझे स्वप्न होते. माझी वेळ, बचत आणि मेहनत पणाला लावत मी रोटीमॅटीकची निर्मिती केली आणि माझे स्वप्न साकारले.' गेली सात वर्षापासून प्रणोती आणि टीम अथक परिश्रम घेत असून, त्यांनी सिंगापूरमध्ये एक स्पर्धादेखील जिंकली आहे. इंटेल बार्कले या इलेक्ट्रॉनिक बिझनेस चॅलेंज स्पर्धेत प्रणोती आणि त्यांच्या टीमने तिसऱे स्थान पटकावत आपली मेहनत सिद्ध केली. रोटीमॅटीक हा रोबोट मिनिटाला एक अशाप्रकारे वीस चपात्या तयार करू शकतो. चपात्यांची जाडी किंवा त्या कशाप्रकारे भाजायच्या आहेत तसेच त्यासाठी तेल किती वापरायचे आहे, हे सर्व विकल्प या रोटीमॅटीकमध्ये आहेत. २०१४ मध्ये जेव्हा त्यांनी उत्पादन बाजारात दाखल करण्यापूर्वी ग्राहकांची मागणी लक्षात घेतली तेव्हा त्यांना ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद उदंड होता. प्रणोती यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची संख्या आता वाढू लागली आहे. सुरुवातीला ती संख्या ३५ होती आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. टीममध्ये योग्य आणि कुशल कर्मचाऱ्यांची निवड करणे, हे संस्थापक म्हणून प्रणोती यांच्यासमोरील मोठे आव्हान होते, असे त्या सांगतात. रोटीमॅटीकसारखे सर्वांना फायदेशीर आणि उपयोगी असे जगातील पहिले उत्पादन घडवण्यासाठी मनात चांगल्या कामाची इच्छा आणि संशोधनासाठी पूरक असे वातावरण असणे, हे सर्वात महत्वाचे असल्याचे प्रणोती सांगतात. अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे योग्य ठरते, ज्यांच्यासोबत आपण एका कुटुंबाप्रमाणे काम करू शकतो, असे प्रणोती सांगतात. सध्या त्यांच्या ग्राहकवर्गात सर्वाधिक प्रमाण हे अनिवासी भारतीयांचे आहे. विशेष करुन अमेरिकेत स्थायिक असलेली भारतीय कुटुंबे. चपाती हा भारतीयांच्या जेवणातील मुख्य पदार्थ आहे. पोटभर खाता येईल असा हा पदार्थ आहे, मात्र तो बनवण्यास सर्वाधिक कसब लागते. चपाती बनवण्याची प्रक्रिया हे वेळखाऊ असून, बऱ्याचदा भरपूर पसारादेखील होतो. त्यामुळे चपाती खायची इच्छा असूनदेखील, अनेकांना ती बनवता येत नसल्याने जेवणात चपाती नसल्याची त्यांची तक्रार असते. |