जे लोक स्वप्न पाहतात आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ती पुर्ण करण्यासाठी धडपडतात अशा लोकांना नियती किंवा परीस्थीती कधीच बांधून ठेवु शकत नाही. आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करताना वाटेत कितीही अडथळे आले तरी विचलीत न होता जे मार्गक्रमण करत असतात तेच आयुष्यात यशस्वी होतात. शरथ बाबु नावाच्या चेन्नई येथील एका मुलाने आपल्या दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर सर्व संकंटांवर मात करत स्वतःच एक मोठे स्वप्न पुर्ण केलं. अतीशय गरीब घरात, चेन्नईच्या एका झोपडप्ट्टीत जन्मलेल्या शरथने BITS PILANI मधून इंजीनीअरींग आणि IIM Ahmedabad मधून MBA चे शिक्षण पुर्ण केले. आज तो एक यशस्वी उद्योजक आणि 'फुडकिंग' (Foodking) या कंपनीचा मालक आहे. २००८ साली 'पेप्सी युथ आयकॉन' (आदर्श तरुण) म्हणून शरथला सन्मानीत करण्यात आले होते. शरथचा जन्म चेन्नई येथील माडीपक्कम मधील झोपडपट्टीत झाला. त्याला दोन मोठया बहिणी आणि दोन लहान भाऊ आहेत. शरथच्या आईने खुप मेहनतीने आपल्या पाच मुलांना वाढविले. त्यांच्या घरामध्ये कमावणारी ती एकमेव व्यक्ती होती. शरथची आई सकाळी ईडल्या विकत असे, दुपारी सरकारी शाळांमध्ये मुलांना दुपारी जेवण देण्याचे काम करत असे आणि संध्याकाळी प्रौढ शिक्षण वर्गामध्ये शिकवत असे. अशी तीन कामे करुन देखिल पाच मुलांना शिकवीणे आणि वाढविणे खुप जिकीरीचे काम होते. एवढी वाईट परीस्थीती असुनही शरथने कधीही आपल्या स्वप्नांवर पाणी फिरु दिले नाही. चेन्नई येथील किंग्ज मॅट्रीक्य्लेशन हायर सेकंडरी स्कूल मधून शिक्षण घेतल्यानंतर पुढे शरथने BITS Pilani या नामवंत संस्थेमधून केमीकल ईंजीनीअरींगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ३ वर्षे त्याने पोलारीस सॉफ्टवेअर या कंपनीमध्ये काम केले. मात्र पुढे शिकण्याची जबरदस्त ईच्छाशक्ती त्याला IIM Ahemadabad ला घेऊन गेली. पोलारीस मध्ये नोकरी करताना त्याने त्याच्या कुटुंबाचे सर्व कर्ज फेडून टाकले आणि CAT ची तयारी सुरु केली. पहिल्यांदा CAT ची परीक्षा दिली तेव्हा आपल्या यशाबद्दल त्याला पुर्ण खात्री होती मात्र तेव्हाच CAT परीक्षेचे पेपर लीक झाल्याने त्याला पुन्हा CAT ची परीक्षा द्यावी लागली. पुन्हा जोमाने प्रयत्न करुन शरथने CAT ची परीक्षा दिली आणि त्याला सहाही IIM कॉलेजेसमधून मुलाखतीसाठी बोलावणे आले. शरथची आई ईडली बनवत असे आणि शरथ आणि त्याचे दोन धाकटे भाऊ मिळून या ईडल्या विकण्याचे काम करत असत. एवढे सगळे करुनही महीना ७००-८०० रुपये मिळकतीमध्ये त्यांचा संसार चालत असे. मात्र या ईडली विकण्यातूनच शरथची उद्योजगतेशी तोंडओळख झाली. पुढे MBA झाल्यानंतरही त्याने ईडली विकण्यापासूनच आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याचेच आज "फुडकिंग" नावाच्या एका मोठ्या कॅटरींग कंपनीत रुपांतर झाले आहे. MBA नंतर एका मोठ्या आयटी कंपनीने दिलेली ८.५ लाख रुपये पगाराची नोकरी आपला ईडलीचा व्यवसाय करण्यासाठी शरथने नाकारली तेव्हा सर्वत्र तो एक चर्चेचा विषय झाला होता. मात्र आपल्या जिद्दीच्या बळावर शरथने "ईडली"वरचा आपला विश्वास सार्थ ठरवला. आज फुडकिंगची उलाढाल करोडो रुपयांमध्ये आहे. भारतभर फुडकिंगच्या ५०० हून अधिक शाखा आहेत आणि महत्त्वाचे फुडकिंगच्या माध्यमातून सुमारे ५०००० लोकांना रोजगार मिळतो आहे. २८ वर्षांचा शरथ आपल्या यशाचे आणि उद्योजगतेचे श्रेय त्याच्या आईला देतो. त्याच्यामते त्याची आईच खरी उद्योजक आहे. शरथ आपल्या व्यवसायामार्फत कमीत कमी दरात चांगले जेवण उपलब्ध करुन देण्याचे समाजकार्य करत आहेच मात्र समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्याने राजकारणामध्ये सक्रीय होण्याचा निर्णयही घेतला आहे. कोणत्याही पक्षाचा पुरस्कार न करता "गरीबी दूर करणे, सर्वांना शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन देणे" या त्रीसूत्रीचा पुरस्कार करत त्याने २००९ ची लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. यामध्ये त्याला जिंकता आले नसले तरी त्याने या निवडकुणीत नक्कीयाआपला ठसा उमटवला आहे. झी टीव्हीच्या "यंग ईंडीयन अचीव्हर्स" या कार्यक्रमामध्ये शरथची मुलाखत घेण्यात आली होती. त्या मुलाखतीचे भाग वाचकांसाठी येथे देत आहे. नक्की पहावी अशी ही मुलाखत आहे. मुंगीच्या तोंडातूनही दाणा खेचून घ्यावा लागण्याईतकी पराकोटीची गरीबी पाहिलेल्या शरथचे कर्तुत्व निश्चीतच मोठे आणि अत्यंत प्रेरणादायी आहे. शरथ बाबु बद्दल अधिक माहितीसाठी त्याच्या अधिकृत संकेतस्थलाला http://sarathbabu.co.in/ भेट द्या. धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |