नेटभेटच्या यूट्यूब चैनल वर , आमच्या फेसबुक पेजवर किंवा व्हॉट्सऍप मध्ये एक प्रश्न मला जवळपास दररोज विचारला जातो. तो म्हणजे, मला माझा जॉब सोडून बिझनेस सुरू करायचा आहे त्यासाठी मला मार्गदर्शन करा. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगवेगळी असते , प्रत्येकाचे शिक्षण, त्यांचे कौशल्य, घरातून असलेला सपोर्ट, त्यांचं नेटवर्क, त्यांची बुद्धिमत्ता, मेहनत करण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी वेगवेगळी असते. आणि म्हणून या प्रश्नाचं सरळ साधं सोपे उत्तर देता येणं कठीण असतं. बहुतेक वेळा मी असे प्रश्न टाळतो, त्यांना उत्तरच देत नाही. प्रत्येकाची केस समजुन घेऊन उत्तर देणे वेळेअभावी शक्य होत नाही. आणि म्हणूनच, आज या लेखामधून ढोबळमानाने नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेताना कसा विचार करावा हे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो, कदाचित हे प्रश्न तुम्हाला घाबरवतील, हा लेख कदाचित तुम्हाला आवडणारही नाही. पण उगाचच मोटिवेशनल बोलण्यात मला रस नाही. उद्योजक आणि जुगारी यांचा मध्ये फरक असतो. उद्योजकाला आपली रिस्क नक्की कोठे आहे, किती आहे हे ठाऊक असतं. वरील सर्व प्रश्नांमधून तेच सांगण्याचा मी मनापासून प्रयत्न केला आहे. १. बिझनेस सुरु करण्यामागची तुमची नेमकी प्रेरणा काय आहे ?
व्यवसाय करणं म्हणजे नऊ ते पाच नोकरी करण्यासारखं नव्हे. व्यवसायामध्ये दिवस-रात्र एक करावा लागतो, सगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. टेबलवर आईत बसून काहीच मिळत नाही. त्यामुळे तुमच्या व्यवसायाबद्दलची मनापासून तुम्हाला प्रेरणा नसेल किंवा यशस्वी व्हायची आंतरिक तळमळ नसेल तर बिजनेस तुमच्यासाठी नाही हे मी आताच सांगतो. अर्थात नोकरी वाईट व्यवसाय चांगला असं नाही. नोकरीमध्ये आयुष्याचा बॅलन्स योग्य प्रकारे सांभाळता येतो. आर्थिक, मानसिक, भावनिक या सर्व गरजा नोकरीमध्ये थोड्याफार प्रमाणात पूर्ण करता येतात. व्यवसायामध्ये निदान सुरुवातीची काही वर्षे तरी वरील सर्वच गोष्टी मिळत नाहीत. बऱ्याचदा स्वतःचे निर्णय स्वतः घेता यावेत यासाठी म्हणजेच फ्रीडम साठी लोकांना व्यवसाय करावासा वाटतो. परंतु नंतर ते आपल्याच व्यवसायात नोकरी करायला लागतात. मित्रांनो, व्यवसायामध्ये कस्टमर आपला बॉस असतो. आणि अनेक कस्टमर अनेक वेगळ्या बॉस सारखे वागतात. विचार करा, तुमच्या आताच्या नोकरीत एक बॉस सांभाळताना त्रास होत असेल, तर व्यवसायात काय होईल. तेव्हा, तुमच्या व्यवसायाबद्दल, प्रॉडक्ट बद्दल जर तुम्हाला आत्मीयता असेल, ते तुमचं प्रेरणास्थान असेल तर आणि तरच व्यवसायात जा. केवळ पैसा बघून किंवा बॉसला वैतागून व्यवसाय सुरु करणे योग्य नाही. २. तुम्ही मार्केटचा योग्य अभ्यास केला आहे का ? - तुम्ही ज्या बिजनेस मध्ये उतरत आहात त्या बाजारपेठेचा योग्य अभ्यास करा. - नक्की ग्राहकांचा प्रश्न काय आहे? - तो सोडवण्यासाठी मी काय करणार आहे? - सध्या जे लोक याच व्यवसायात आहेत त्यांचे मुख्य प्रश्न काय आहेत? - त्यांच्या अडचणी काय आहेत? - ते यशस्वी का झाले? - किंवा ते अपयशी का होत आहेत? - माझे स्पर्धक काय नवीन करत आहेत? - मार्केट कोणत्या वेगाने बदलत आहे ? - भविष्यामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत ? - त्यानुसार मला माझ्या उत्पादनांमध्ये किंवा सेवांमध्ये बदल करता येणे शक्य आहे का ? - साधारण किती वेळ या बिजनेस मध्ये सेटल होण्यासाठी जातो? - त्यासाठी किती गुंतवणूक लागते? - ब्रेक इव्हन साठी किती ग्राहक मिळवावे लागतील? या सर्व प्रश्नांचा सखोल अभ्यास करून बिजनेस प्लान बनवा. ( नेटभेट तर्फे बिजनेस प्लान कसा तयार करावा याची सखोल माहिती देणारा एक ऑनलाईन कोर्स आम्ही मराठी मधून उपलब्ध करून दिलेला आहे. या कोर्समध्ये वरील सर्व बाबी व्हिडीओ स्वरुपात , उदाहरणांसहित, मराठीतून शिकवण्यात आल्या आहेत. या लिंक वर क्लिक करून कोर्स बद्दल अधिक माहिती घेऊ शकता - http://netbhet.com/businessplan . तुमचा वेळ, पैसा, मेहनत वाचविण्यासाठी आणि भविष्यातील निराशा टाळण्यासाठी तुम्ही बिजनेस प्लान बनविणे अत्यंत महत्त्वाचे आहे) ================== नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर मिळविण्यासाठी आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा . ================== ३. तुम्हाला अपयशाची भीती वाटते का ? हजारो स्टार्टअप सुरु होतात, आणि हजारो स्टार्ट अप्स बंद देखील होतात. जर अपयशाची भीती वाटत असेल तर व्यवसाय करणे आपल्यासाठी नाही हे समजून घ्या. जगभरातून साधारण तीन ते पाच टक्के नवीन उद्योग तीन वर्षांपेक्षा जास्त चालतात. त्यामुळे failure rate जास्त आहे हे लक्षात घ्या. पहिल्याच प्रयत्नात बिझनेस सहसा यशस्वी होत नाहीत. साधारण तीन ते चार वेगवेगळे बिझनेसेस करून पाहिल्यानंतरच यशाचा फॉर्मुला सापडतो. आणि तोपर्यंत अपयशाचा सामना करावा लागतो. अर्थात, थोडी भिती असलीच पाहिजे. कारण या अपयशाची भीतीच तुमच्याकडून जास्त मेहनत आणि जास्त स्मार्ट वर्क करून घेऊ शकते. भीती तुम्हाला निराशाग्रस्त करत असेल तर व्यवसायापासून दूर रहा आणि भीती तुम्हाला नवीन प्रयत्न करण्याची प्रेरणा देत असेल तर व्यवसाय जरूर करा. ४. तुमचा प्लान B काय आहे ? नोकरी सोडल्यानंतर सुरू केलेला बिझनेस जर मनासारखा चालला नाही तर पुढे काय करणार त्याच्यासाठी दुसरा प्लान तयार पाहिजे. आपण व्यवसायाला यशस्वी होण्यासाठी किती वेळ देणार हे आधी मनाशी ठरवलं पाहिजे. मी देखील जेव्हा माझा व्यवसाय सुरू केला तेव्हा माझ्या घरच्यांना तो निर्णय आवडला नव्हता. चांगल्या पगाराची नोकरी सोडून मी एका नव्या क्षेत्रात बिझनेस करणार होतो. म्हणून मी स्वतः समोर दोन वर्षांच लक्ष ठेवलं होतं. दोन वर्षात मी नोकरीमध्ये कमवतोय तेवढं उत्पन्न कमावलं नाही तर मी पुन्हा नवी नोकरी शोधेन हे मी स्वतःला आणि माझा घरच्यांना सांगितला होतं. सुदैवाने ती वेळ आली नाही. परंतु त्यासाठीची माझी तयारी मी केली होती. तुम्ही देखील, वेळेचं टार्गेट ठेवून त्यानुसार प्लान बी बनविला पाहिजे असा मी तुम्हाला अवश्य सल्ला देईन. ५. बेस्ट बिझनेस आयडिया च्या मागे धावताय का ? - बेस्ट बिझनेस आयडिया असं काहीच नसतं. तुम्ही बिझनेस सुरु करता, तो Improve करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना राबवता. त्यातली काही यशस्वी होतात तर काही फसतात. असं करत करत, काय चालतंय, काय मला जमतंय, मार्केटला नक्की काय पाहिजे, आणि स्पर्धकांना काय देता येत नाही या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळायला लागतात. आणि मग तुम्ही बेस्ट बिझनेस आयडिया स्वतःच शोधता. तेव्हा सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. ६. तुम्हाला विक्री करता येते का ? - जगातले बरेचसे बिझनेसेस उद्योजकांना ग्राहक मिळवता येत नाही म्हणून बंद होतात. विक्री करता येणे हा उद्योजकाचा सर्वात आवश्यक गुण आहे. विक्रीची कला अंगी बाणवल्या शिवाय उद्योग सुरू करू नका. त्यासाठी पार्ट टाइम मध्ये आपल्याला आवड असलेल्या क्षेत्रांमध्ये सेल्स जॉब करून बघा. ग्राहक आपल्याला बरेच काही शिकवतात. सेल्समध्ये आपल्याला ते शिकता येतं. म्हणून अधिक दुसऱ्यांची उत्पादन/ सेवा विकून बघा. तुम्हाला जर ते जमलं, तर तुम्हाला स्वतःलाच एक विश्वास आलेला असेल की तुम्ही ही व्यवसाय करू शकता. हा कॉन्फिडन्स तुम्हाला इतर कोणीही देऊ शकत नाही. तो तुमचा तुम्हालाच मिळवावा लागणार. 5. Is the timing right? ७. तुमचा Runway किती असणार हे तुम्हाला माहीत आहे का? स्टार्टअप मध्ये Runway हा एक परवलीचा शब्द आहे. बाहेरून येणाऱ्या गुंतवणुकीशिवाय, किंवा विक्री मधून येणाऱ्या पैशांशिवाय तुम्ही आणि तुमचा बिझनेस किती काळ तग धरून राहू शकतो याला Runway असं म्हणतात . साधारण 18 ते 24 महिने पुरेल इतका Runway तयार झाल्याशिवाय नोकरी सोडून व्यवसायात उतरू नका. काही सेवा व्यवसायांमध्ये पाच ते सहा महिन्यांचा Runway पुरेसा असतो. परंतु उत्पादन( product) बिजनेस मध्ये किमान 18 ते 24 महिने पुरेल इतका पैसा उभा करणे आवश्यक असेल. मित्रांनो, कदाचित हे वरील प्रश्न तुम्हाला घाबरतील, हा लेख कदाचित तुम्हाला आवडणारही नाही. पण उगाचच मोटिवेशनल बोलण्यात मला रस नाही. उद्योजक आणि जुगारी यांचा मध्ये फरक असतो. उद्योजकाला आपली रिस्क नक्की कोठे आहे, किती आहे हे ठाऊक असतं. वरील सर्व प्रश्नांमधून तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. याचा नीट विचार करून मगच तुम्ही व्यवसायाची सुरुवात करा . आणि एकदा सुरुवात केल्यानंतर प्रचंड जिद्द आणि चिकाटीने यशाच्या दिशेने पावले टाका. यशस्वी भवः ! सलिल सुधाकर चौधरी संस्थापक - नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com ================== नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर मिळविण्यासाठी आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा . ================== |