मी अतुल अरुण राजोळी पुन्हा एकदा, नेटभेटच्या वाचकांना आणखी एका लेखाद्वारे भेटत आहे. मागील लेखात (हमखास यशाचा फोर्मुला) आपण यशस्वी माणसांच्या डोक्यात इंस्टॉल केलेल्या सॉफ्टवॅअरबद्दल जाणुन घेतले. या लेखात मी यशस्वी माणसांच्या एका महत्त्वाच्या गुणधर्माबद्दल बोलणार आहे. मला नेहमी असा प्रश्न पडायचा की समाजातील फक्त काही माणसांचे उत्पन्न प्रचंड असते व इतर माणसांचे त्या मानाने खुपच कमी. असे का? रिसर्च असे सांगतो की जगातील फक्त ५% माणसांकडे जगातील तब्बल ९५% संपत्ती आहे व इतर ९५% माणसांकडे उरलेली ५% संपत्ती आहे. असे का? या प्रश्नाचे उत्तर मिळविताना केलेल्या अभ्यासामध्ये मला असे आढळून आले की मार्केटमध्ये नेहमी उत्कृष्ट परफॉरमन्सला उत्कृष्ट मोबदला मिळतो. ५% माणसे इतर ९५% माणसांपेक्षा प्रचंड पैसे कमवतात कारण त्यापैकी बहुतांश लोक त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट मानले जातात. मार्केटमध्ये आपले उत्पन्न हे तीन बाबींवर अवलंबून असते. १) आपण काय करतो २) आपण जे करतो ते किती चांगल्या पध्दतीने करतो व ३) आपली जागा इतर कोणी भरुन काढणे किती कठीण आहे. एक महत्त्वाचा गुणधर्म जो मला यशस्वी माणसांमध्ये प्रकर्शाने आढळला तो म्हणजे 'उत्कृष्ट बनवण्याचा ध्यास'. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी एक महत्त्वाचा निर्णय घेतला की आपण आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट बनायचे. त्यांनी निर्णय घेतला, आपल्या कामाचा दर्जा अव्वल असला पाहिजे. त्यासाठी लागणारी किंमत ते मोजण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी बर्याच गोष्टींचा त्यांना त्याग करावा लागला. त्यासाठी जेवढा वेळ द्यावा लागेल तेवढा वेळ देण्याची सुध्दा त्यांची तयारी होती. याच निर्णयाचा परिणाम असा झाला की सर्वसाधारण माणसांपेक्षा त्यांचे स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण झाले. ते उच्च श्रेणीमध्ये गणले जाऊ लागले व परिणाम स्वरुपी त्यांचे उत्पन्न इतरांपेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट किंवा दहा पट वाढले. 'इतर' म्हणजेच ज्यांनी आपल्या कामामध्ये उत्कृष्ट बनण्याचा निर्णय घेतला नाही असे ९५% लोक होय! सुप्रसिध्द हॉटेल उद्योजक व ऑर्किड या जगातील उत्कृष्ट इकोटेल हॉटेलचे मालक विठ्ठल कामत यांनी कर्जबाजारी असताना जगातील उत्कृष्ट इकोटेल हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला. आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर, जगातील उत्कृष्ट फलंदाज सचिन तेंडूलकर याने लहान वयातच उत्कृष्ट फलंदाज बनण्याचा निर्णय घेतला होता. दोन साधारण चित्रपट बनविल्यानंतर आशुतोष गोवारिकर यांनी 'लगान' नावाचा उत्कृष्ट चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या लहान वयातच उत्कृष्ट गायिका होण्याचा निर्णय घेतला होता. घरातुन विरोध असुनसुध्दा माधुरी दिक्षितने उत्कृष्ट अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. अशी कित्येक यशस्वी माणसांची उदाहरणे मी देऊ शकतो ज्यांच्या या एका निर्णयामुळे त्यांचे आयुष्य बदलले. त्यांचे उत्पन्न प्रचंड वाढले व सर्वात महत्वाचे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचे एक असाधारण व अद्वितीय असे स्थान निर्माण झाले. ते यशस्वी झाले. त्यांच्या यशाची सुरुवात एका निर्णयामुळेच झाली. तो निर्णय म्हणजे... 'मला माझ्या क्षेत्रात उत्कृष्ट व्हायचं आहे'. हा एक निर्णय तुमचेही आयुष्य बदलु शकतो.
मित्रांनो, मी तुम्हाला आज एक आवाहन करतो, तुम्ही जे कोणी असाल, विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल, किंवा उद्योजक असाल; ज्या क्षेत्रात असाल. त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट बनण्याचा निर्णय तुम्ही आज घ्या. तुम्ही करत असलेल्या कामाचा दर्जा अव्वल असला पाहिजे असा निर्णय तुम्ही आज घ्या. तुम्ही केलेल्या कामाला जे अभिप्राय इतरांकडून मिळतील ते वॉव, उत्कृष्ट, अप्रतिम, अतिउत्तम, अविश्वसनिय, आउट स्टँडींग, माईंड ब्लोईंग, फॅनटास्टीक असेच असतील असा एक ठाम निर्णय तुम्ही आज घ्या. याक्षणी तुम्ही स्वतःला ठासुन सांगा 'I am going to be the best in my field'. याक्षणी स्वतःला प्रश्न विचारा की उत्कृष्ट बनण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला केल्या पाहीजेत? कोणता अभ्यास केला पाहीजे? कोणाला भेटले पाहीजे? कोणते नवीन ज्ञान मिळविले पाहीजे? कोणते कौशल्य आत्मसात केले पाहीजे? कोणती कृती केली पाहीजे? सध्या करत असलेल्या कामामध्ये कोणते सकारत्मक बदल केले पाहीजेत? आजच आत्ताच ठरवा. तुम्ही आत्ता जो ठाम निर्णय घेतला आहे तो फक्त मनातच ठेवू नका. तुमच्या डायरीत लिहून काढा. लक्षात ठेवा, लिहील्याने तुम्ही त्या निर्णयाबाबत अधिक ठाम व गंभीर बनता. म्हणूनच आत्ताच लिहा. आता तुम्ही एक खुप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि भविष्यात या निर्णयामुळेच तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचे एक वेगळे स्थान निर्माण होणार आहे. माझं असं ठाम मत आहे की जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो व लिहीतो, तेव्हा त्याला अनुसरुन कृती केल्या शिवाय गप्प नाही बसलं पाहीजे. मग आत्ताच तुमच्या निर्णयाला अनुसरुन एक कृती करा. काहीही! जेणे करुन एक सकरत्मक उर्जा निर्माण होईल. वेळ घालवू नका. आत्ताच एखादी कृती करा. ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्कृष्ट म्हणून मानले जाण्यासाठी कुठुनतरी सुरुवात ही करावी लागणारच. ती सुरुवात आज आणि आत्तापासुनच करा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासुन शुभेच्छा! Thank You Very Much! - अतुल अरुण राजोळी मी माझ्या आवडत्या TED.com या साईटला भेट दिली. आणि TED वर अगदी सुरुवातीलाच एक व्हीडीओ पाहिला मिश्कीन इंगावले (Myshkin Ingawale) या तरुणाचा. एका मराठी, महाराष्ट्रीय, भारतीय तरुणाला TED सारख्या जगभरात नावाजलेल्या व्यासपीठावर आपल्या संशोधनाबद्दल उस्फुर्तपणे बोलताना पाहून अतीशय अभिमान वाटला. मिश्कीन इंगावले ने एक असे यंत्र बनविले आहे ज्यामुळे अॅनिमीया सारख्या रोगाची तपासणी करणे अतिशय सोपे झाले आहे. मूळात अॅनिमीया हा आजार बरा करण्यासारखा आहे आणि त्यासाठीची औषधे सहज आणि स्वस्तात उपल्ब्ध देखिल आहेत. मात्र तरीही केवळ अॅनिमीयाची वेळीच तपासणी न केल्यामुळे जगभरात दर मिनिटाला २ व्यक्ती मरण पावतात. National Institute of technology, Bhopal मधून विद्युत अभियांत्रीकीची पदवी मिळवलेल्या मिश्कीनने IIM Calcutta मधून पीएचडी केली आहे. त्याचसोबत तो MIT (Massachusetts Institute of Technology) मध्ये कोपनहेगन बाईक या ईलेक्ट्रीक सायकलच्या प्रोजेक्टवर काही काळ काम करत होता. सुट्टीमध्ये एकदा मुंबई पासुन २ तासांवर असलेल्या पारोल या गावी मिश्कीन त्याच्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्याचा मित्र अभिषेक सेन तेथे डॉक्टर आहे. तेथे मिश्कीन पोहोचला तेव्हा तेव्हा अभिषेक एक बाळंत बाईला तपासण्यासाठी गेला होता. मात्र अॅनीमीया मुळे बाळ व आई दोघेही वाचू शकले नाहीत. मिश्कीनला हे कळल्यावर त्याला वाटले की जर हा बरा करता येण्यासारखा आजार आहे तर केवळ वेळीच आजार न ओळखला गेल्यामुळे असे मृत्यु का ओढवावेत. त्याने आपल्या डॉक्टर मित्राच्या सहाय्याने यावर उपाय शोधायचे ठरवले. अॅनीमीया तपासण्यासाठी रक्ताचा नमुना घेतला जातो आणि असे रक्त मग एका यंत्रामध्ये तपासले जाते. हे यंत्र महाग असून ग्रामीण आणि दुर्गम भागात उपलब्ध नसते. तेव्हा अशा ठीकाणी काम करणार्या आशा-वर्कर्सना (गावोगावी प्राथमिक उपचार करणार्या परिचारीका ) सहजगत्या अॅनीमीयाची तपासणी करता यावी, त्यांना सोबत नेता यावे असे हलके यंत्र बनविण्याचे मिश्कीनने ठरवले. मुख्य म्हणजे रक्ताचा नमुना न घेता, म्हणजेच सुई न टोचता तपासणी करणारे यंत्र बनवण्याचा त्याचा मानस होता. अथक प्रयत्नांनंतर मिश्कीनने हे काम पूर्ण केले. त्याने खिशात मावेल असे ToucHB नावाचे एक यंत्र बनवले ज्यामुळे साधी सुईदेखिल न टोचता जागच्या जागीच अॅनीमीयाची चाचणी करता येते. हे यंत्र २ AA बॅटरीवर चालणारे हे यंत्र एखाद्या Calculator सारखे दिसते. समाजातील एका वरकरणी साध्या पण तरीही गुंतागुंतीच्या समस्येवर मात करण्याच्या विचाराने प्रेरीत होऊन मिश्कीनने हे उपकरण बनविले. आणि आता २०२० पर्यंत जगाच्या नकाशावरुन अॅनीमीया नावाचा राक्षस मिटविण्याचे त्याने ठरवले आहे. TED.com वरील मिश्कीनच्या भाषणाचा व्हीडीओ येथे देत आहे, तो अवश्य पहा. त्याच्या संशोधना ईतकाच त्याचे presentation skills, आत्मविश्वास, उस्फुर्तता हे सारे गुण वाखाणण्याजोगे आहेत. मला त्याची presentation स्टाईल खुप आवडली. तेव्हा हा व्हीडीओ अवश्य पहा. आणि आवडला तर आपल्या मित्रांसोबत जरुर share करा. |