स्वतःचे घर, चांगली नोकरी, प्रेम करणारे कुटुंब, मित्रांचा गोतावळा, देश- विदेशात प्रवास असे सगळे छान चालले असताना, अचानक आपल्याला एक दिवस प्रश्न पडतो “आयुष्यात एवढी उलथापालथ केव्हा झाली?” आयुष्य एवढे कधी गुंतले? सगळं सुरळीत चालू असताना मधेच कुठेतरी ठिणगी पडते, आणि एका क्षणात सगळे चित्रच बदलून जाते.
आपण बेभान आणि भरकटल्या सारखे होतो. डोक्यात चक्र चालू होतात. आणि खवळलेल्या सागरात सापडलेल्या गलबतासारखी आपली अवस्था होते. आपण जे ठरवले होते ते “हे” नाहीच असे वाटू लागते. मग आपण स्वतःच्या आवडीचे काहीतरी सुरु करायचा विचार करतो, आणि आधीच ताण कमी की काय, म्हणून अजून गुंता वाढवतो. अजून जबाबदाऱ्यांमध्ये वाढ करतो. जर आपल्याला आपल्या आयुष्याला चांगले वळण आणि व्यवसायाला उत्तम कलाटणी द्यायची असेल तर आपले मन भानावर आणि थाऱ्यावर असणे खूप गरजेचे आहे. हे कसे करायचे मग? सर्वप्रथम, तुम्हाला खंबीर व्हायला हवे. अधोगती होण्यापासून स्वतःला रोखा. आपले आयुष्य सोपे करा. जे महत्वाचे आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. बाकी गोष्टींचा खूप विचार करत बसू नका. आपण सगळ्या गोष्टींच्या मागे लागतो, आणि शेवटी हातात काहीच उरत नाही. दहा दगडावर पाय ठेवण्यापेक्षा एका दगडावर पाय ठेवा. जसजशी वर्ष सरत जातात, एकएक जबाबदारीची भर पडते, आणि जबाबदाऱ्यांचे ओझे वाढतच जाते. हे ओझे आपले आपणच ओढवून घेतो. हो बरोबर, आपणच ओढवून घेतो. शब्द ऐकायला कठोर आहेत, पण नुसते गोड बोलुन वास्तविकता बदलता येत नाही. त्यासाठी आपण कृती करणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ आपल्या आयुष्यातल्या ३ सर्वांत तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी लिहा. आता त्या प्रत्येक मुद्यावर तुम्ही काय करू शकता ते लिहून काढा. मग ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी काय करता येईल ते लिहा. आता हे सगळं प्रत्यक्ष करा. आता पुन्हा हेच करा पण आपल्या व्यवसायाचा बाबतीत करा.(जर तुमचा व्यवसाय असेल किंवा नवा व्यवसाय करायचा विचार करत असाल तर). दुसरे महत्वाचे पाऊल म्हणजे, आपल्या मनात चाललेल्या अनेक विचारांपैकी जे महत्वाचे आहेत ते वेगळे करा आणि त्याच्यावरच लक्ष केंद्रित करा. कित्येकदा आपल्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ असतो, त्यामुळे आपला गोंधळ होतो. नेमके काय महत्वाचे आहे त्याचा निर्णय आपण घेऊ शकत नाही. आपल्याला हे समजणे गरजेचे आहे कि सगळ्याच गोष्टी एकसारख्या नसतात. आपल्याला सगळ्या गोष्टींची गरज असतेच असे नाही किंवा आपण सगळं केलच पाहिजे असे ही नाही. जे आपल्यासाठी आणि आपल्या व्यवसायासाठी महत्वाचे आहे त्यावरच आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. शेवटी, अजून एक महत्वाची गोष्ट- “नाही म्हणायला शिका”. सगळ्याच गोष्टींचा स्वीकार करणे म्हणजे आपल्या आयुष्यातला गुंता अजून वाढवण्यासारखे आहे. सगळ्यांनी आपल्यावर प्रेम करावे, आपले कौतुक करावे असे आपल्याला नेहमी वाटत असते, परंतु प्रत्येक गोष्टीचा स्वीकार केलाच पाहिजे असे गरजेचे नाही. जेव्हा जेव्हा आपण इच्छा नसताना एखाद्या गोष्टीचा स्वीकार करतो, त्या प्रत्येक वेळी आपण एखाद्या इच्छुक गोष्टीला नाकारत असतो. त्यामुळे तुम्ही व्यस्त राहता खरे, पण उत्पादन क्षमता मात्र वाढत नाही. आपण काहीही साध्य न करता केवळ व्यस्त राहतो. कुठेतरी थांबायची, थोडं विसावायची गरज आहे. आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे ताण जाणवतोय हे पाहणे गरजेचे आहे. आपल्याला काय महत्वाचे आहे हे समजण्याची आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आहे. आपल्याला नको असेलेल्या गोष्टींना नाही म्हणण्याची, आणि महत्वाच्या गोष्टींना स्वीकारण्याची हीच वेळ आहे. आपले आयुष्य आणि आपला व्यवसाय उत्तम जगण्याची ही वेळ आहे. आता पुन्हा माघारी फिरणे नाही! टीप: तुम्ही काही न करता फक्त विचारच करत बसलात, तर काहीच होणार नाही, उलट तुमच्या मनातला गुंता आणखीनच वाढत राहील. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेले, कधीही चांगलेच, नाही का? ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |