• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet

Blogs, Thoughts & Updates

साद देती हिमशिखरे !

9/19/2011

Comments

 
Picture
सुरवातीलाच एका वैश्विक सत्याचा उल्लेख करायचा मोह आवरत नाही.सर्वसाधारणपणे कोणत्याही क्षेत्रात नावाजलेल्या माणसाचं उदाहरण घेतलं तर असं लक्षात येतं की त्याचं ध्येय त्याच्या विशीतच पक्कं झालेलं आहे.त्या वयात त्याला यश मिळायला सुरवात झालेलीही आढळते.
एखाद्याजवळ त्याच्या विशीच्या आसपास एखादं ध्येय समोर ठेऊन ते अंमलात आणायला प्रवृत्त करणारी धारणा असते का?
अशी धारणा जवळ असणे ही गोष्टं दोन घटकांवर अवलंबून असते असं दिसतं.एक म्हणजे अंत:प्रेरणा आणि दुसरा घटक म्हणजे पार्श्वभूमी.अंत:प्रेरणेच्या संदर्भातलं एक उदाहरण सुप्रसिद्ध साहित्यिक आनंद यादवांचं.जेमतेम प्राथमिक शाळेत जाणार्‍या लहानग्या आनंदाला शिक्षण घेण्याची प्रचंड आसक्ती कुठून निर्माण झाली? (वाचा: झोंबी हे त्यांचं आत्मकथन) आसक्तीच म्हणायला पाहिजे.कारण घरातल्या थोरामोठ्यांकडून शीक! शीक! असा उपदेश होणं अशक्यच होतं.प्रतिकूल परिस्थिती होती.शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती.आधीच्या पिढ्यानपिढ्यांच्या वारशाचा तर प्रश्नंच नाही.जेवढा जेवढा विरोध जन्मदात्याकडून होत होता तेवढी शिक्षण घेण्याची इच्छा प्रज्वलित होत होती.प्रचंड प्रतिकूल परिस्थिती आणि तिच्याविरूद्धं उठाव करण्याचं भान ही नंतरची गोष्टं.पण आपल्या अंत:प्रेरणेवरचा प्रचंड विश्वास, इच्छाशक्ती, प्रयत्न या सगळ्याची सांगड घालत ते फक्तं स्वत:च शिकले असं नाही तर त्यांनी तळागाळातल्या समाजाला शिक्षण मिळावं यासाठी प्राध्यापक बनून प्रयत्नंही केले.
​

Picture

स्व.कुमार गंधर्व लहानग्या वयातच एखाद्या मोठ्या शास्त्रीय गायकाचं गाणं जसंच्या तसं म्हणून दाखवत.हे कुठून आलं? जन्मजात अंत:प्रेरणा किंवा उपजत धारणाशक्ती ही जेव्हा अशाप्रकारे चमत्कारी स्वरूपाची असते तेव्हा ती कुठून येते याबद्दल निश्चित विधान करणं धाडसाचं आहे असं दिसतं.

आपल्याला अमुक एक कौशल्य असलेली संतती हवी असा निश्चयी संकल्प केलेल्या पतीपत्नीच्या पोटी तशी संतती निपजते असं आपल्या शास्त्रांमधे म्हटलं जातं.कुठलही ध्येय हे एका आयुष्यामधे पुरं होत नाही.माणूस जसजसा एखाद्या क्षेत्रात खोलवर जातो तसं आणखी आव्हानात्मक झालेलं ध्येय त्याच्यासमोर उभं रहात असतं.एका जन्मात अपूर्ण राहिलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी जन्मजन्मांतरीचा प्रवास करावा लागतो.शेवटी एखाद्या जन्मात तो त्या क्षेत्रात अत्त्युच्च शिखर गाठतो.ध्येयाचं अत्त्युच्च शिखर गाठलेल्या अशा महान व्यक्तीच्या संदर्भात अशीही गोष्टं आढळते की त्याचं नाव चालवणारा वारस त्याला लाभत नाही.असलाच तर तो निष्प्रभ असतो किंवा दुसर्‍याच कुठल्या तरी क्षेत्रात झेप घेत असतो. (उदा. प्रकाश पदूकोण: दीपिका पदूकोण)
चमत्कारी स्वरूपाच्या अंत:प्रेरणा या घटकाचा माग या दिशेने काढता येऊ शकतो.या संदर्भातलं आणखी एक उदाहरण हृतिक रोशन या स्टार अभिनेत्याचं.एक आजोबा सर्जनशील संगीतकार (स्व.रोशन), दुसरे आजोबा दिग्गज निर्माता-निर्देशक (जे.ओमप्रकाश) वडील अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि काका संगीतकार.
​

Picture
सगळं सहजप्राय असूनही हृतिकला आपला तोतरेपणा घालवण्यावर प्रचंड मेहेनत घ्यावी लागली.शरीर कृश होतं म्हणून ते कमवावं लागलं.त्यानं केलेले शंभर टक्के प्रयत्नं त्याला पहिल्याच फटक्यात त्याला ध्येयप्राप्तीच्या मार्गावर कितीतरी पुढे घेऊन गेले.आपण कुठेही कमी पडता कामा नये म्हणून त्याने स्वत:ला आवडत्या नृत्यासकट प्रत्येक गोष्टीवर केलेली मेहेनत विसरण्याजोगी नाही.पार्श्वभूमी, वारसा, अंत:प्रेरणा, प्रयत्न आणि हुशारी ही पंचसूत्री त्याच्या चांगल्याच कामी आली.
शंभर शतकांच्या उंबरठ्यावर असलेला सचिन हे त्यापुढचं मोठ्ठं उदाहरण!
उच्च ध्येय गाठलेल्यांच्या आयुष्यात पदार्पणातलं यश परिणामकारक ठरल्याचं दिसतं.अथक प्रयत्नं मात्रं कुठल्याही पायरीवर अपरिहार्यच ठरतात...
सगळ्यांनाच फार मोठी ध्येयं गवसणं शक्य नाही.चमत्कारी यश मिळतंच असं नाही.वेगवेगळ्या कलांची, शास्त्रांची अनुवांशिकता मिळणं शक्य नाही किंवा अनुवांशिकता नसतानाही अंत:प्रेरणा असतेच असं नाही.सर्वसाधारण माणसाचं काय? त्यालाही ध्येयं असतातच!
विशीच्या अलिकडपलिकडच्या सर्वसाधारण मुलाचं ध्येय त्याच्या आईबापांनी आधीच निश्चित केलेलं असतं.आई, बाप स्वत: कार्यरत असलेल्या क्षेत्रात किंवा ते जाऊ न शकलेल्या त्यांच्या आवडत्या क्षेत्रात ते आपल्या पाल्याचं ध्येय निश्चित करतात.हे तसं व्यवहार्यंच म्हटलं पाहिजे.
मग लाटा सुरू होतात... डॉक्टर होण्याची, इंजिनियर बनण्याची, संगणक तज्ज्ञं होण्याची, परदेशी शिक्षण घेऊन तिथे स्थायिक होण्याची...
ढोबळ लाटांना ध्येयं तरी कसं म्हणायचं? अशा लाटांवर आपल्या मुलांना लोटणार्‍या पालकांना आपल्या मुलात याहीपेक्षा वेगळ्या प्रकारची प्रज्ञा आहे याची जाणीव नसते की धाडस कमी पडतं की व्यवहार्यतेच्या कोषातून बाहेर पडायचं नसतं?
मुलांना ’सचिन तेंडुलकर’ बनवण्याची, मुलांना टीव्ही सेलिब्रेटी बनवण्याची, मुलांना नागरी सेवेत घालण्याची, अंतिम स्वरूप म्हणून व्यवस्थापनतज्ज्ञ बनवण्याची अशा वेगळ्या वाटेवरच्या लाटांचही चांगलंच स्वागत झालं.
महाजालावर माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध आहे.आज मराठी घरातला मुलगा, मुलगी ह्या साठ्याचा उपयोग करून स्वत: स्वत:चं ध्येय ठरवतो आहे हे बघून अभिमान वाटतो.त्यातही लाटांचा सहारा घेणं अपरिहार्य ठरतं.सहज असतं.कुठल्याही क्षेत्रात शिरलं तरी अंतिमत: मॅनेजमेंट किंवा फायनान्समधे जाणं या आणखी काही लाटा.आज रिस्क घेण्याचं प्रमाण वाढतं आहे.नोकरीत पर्मनंट हा शिक्का साफ पुसला जातोय.ध्येयासाठी नोकर्‍या बदलण्याचं प्रमाण वाढतंय.ट्रॅवल आणि टुरिझमसारखी वेगवेगळी क्षेत्रं विकास पावताहेत.महाजाल हे केवढं मोठं क्षेत्रं आहे! आज एकाच क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर जाण्याचा मोहही राहिलेला नाही उलट वेगवेगळी क्षेत्रं धुंडाळून आर्थिक समाधानाबरोबर मानसिक समाधान मिळवण्याची ओढ वाढली आहे.संघर्षं करण्याची क्षमता वाढली आहे.हे निश्चित कौतुकास्पद आहे.
पूर्वी या ना त्या करणाने ढोबळ ध्येयांचीही जाणिव दिसत नव्हती.काहीच ध्येय नसलेले कारकून नोकरीचे सर्व फायदे उपटताना कर्तव्याच्या वेळी अळीमिळी गुप चिळी या नात्याने रहात होते.कामगार संघटनांचा दरारा होता.आज ध्येय हे सर्वात महत्वाचं झालं आहे.ध्येयासाठी सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत राबणार्‍यांची संख्या वाढते आहे.त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे.अनिवासी भारतीयांची संख्या वाढते आहे.
आर्थिक आणि व्यावसायिक समाधानानं एक चांगलं टोक तर गाठलंय पण त्याच्या जोडीनंच येणार्‍या अतिलोभाच्या, आसुरी स्पर्धेच्या, अपरिहार्य अशा कौटुंबिक जीवनाच्या अभावाच्या दुसर्‍या टकमक टोकाकडे आजच्या पिढीचं लक्षं आहे का?
ध्येयनिश्चितीसाठी पहिला मैलाचा दगड अजूनही शाळा-कॉलेजातलं जास्तीत जास्तं टक्के मिळवणारं शिक्षण हाच राहिला आहे.विद्यार्थ्यांची अशी अवस्था होतेय की पुस्तक आणि चष्मा याव्यतिरिक्तं कुठलीही गोष्टं वापरताना त्यांच्यात आत्मविश्वास असेल का याची खात्री देता येत नाही.
​

Picture
आजच्या स्पर्धेच्या युगात नक्की कसली आवशकता आहे?
अथक प्रयत्नं आणि संपूर्ण समर्पण या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण त्याचबरोबर निवडलेल्या क्षेत्राचा अचूक अंदाज पाहिजे.कुठली कळ दाबली की वरची पायरी उघडेल याची समज पाहिजे.नसली तर ती संपादित करता आली पाहिजे.निवडलेल्या क्षेत्रात आपल्याला नक्की काय हवं याचा निर्णय पक्का हवा.एक प्रकारची आक्रमकता अंगी बाणवता आली पाहिजे.प्रचंड स्पर्धेच्या, दिखाव्याच्या या जगात शर्यतीतला योग्य उंदीर होता आलं पाहिजे.अन्यथा... आपल्याला जे आवडतं, पटतं, योग्यं आहे असं वाटतं ते प्रचंड संयम ठेऊन करत रहाण्याची ताकद कमवता आली पाहिजे.
भावनिक, आर्थिक, लौकिक कशाही प्रकारचं आव्हान झेलता आलं पाहिजे, प्रचंड सोसता आलं पाहिजे आणि तरीही प्रयत्नात सातत्य ठेवता आलं पाहिजे...

लेखक - श्री. विनायक पंडीत
http://vinayak-pandit.blogspot.com/
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet