जपान मध्ये फ्रेशनेस बर्गर नावाची एक मोठी बर्गर चेन आहे. फ्रेशनेस बर्गर ना आढळून आलं की त्यांच्या मेनू मधला "क्लासिक बर्गर" हा त्यांचा सगळ्यात मोठ्या आकाराचा बर्गर फारसा विकला जात नव्हता. किमतीमध्ये अनेक बदल करून पाहिले, डिस्काउंट देऊन पाहिले, तो बर्गर आरोग्यासाठी कसा चांगला आहे त्याच्या अनेक जाहिराती करून पाहिल्या परंतु तरीही बर्गर चा सेल काही वाढत नव्हता. मार्केटिंग डिपार्टमेंट ने बर्गर च्या विक्रीचा नीट अभ्यास करायला सुरुवात केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की महिला हा बर्गर विकतच घेत नाहीत. त्यामुळे इतर पदार्थांच्या तुलनेत क्लासिक बर्गरची विक्री जवळपास निम्म्या इतकीच असते. एकदा ही माहिती मिळाल्यानंतर मार्केटिंग डिपार्टमेंटने महिला क्लासिक बर्गर का विकत घेत नाहीत याचा अभ्यास सुरू केला. जेव्हा महिलांच्या दृष्टिकोनातून त्यांनी या प्रश्नाकडे पाहिले तेव्हा त्यांना उत्तर सापडले. जपानमध्ये महिलांचे ओठ आणि तोंड आकाराने लहान असणे हे सौंदर्याचे लक्षण समजले जाते. त्यामुळे सहाजिकच सार्वजनिक ठिकाणी आ वासून भल्या मोठ्या बर्गर चा घास घेणे हे महिलांना आवडत नव्हते. त्यासोबत हे सामाजिक रीतीला धरून नाही असे महिलांना वाटत होते. मित्रांनो, पुढे वाचण्याआधी येथे थोडा थांबून विचार करा. जर तुम्ही फ्रेशनेस बर्गर च्या मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये असाल तर हा प्रश्न सोडविण्यासाठी काय कराल? .... .... .... .... सुदैवाने फ्रेशनेस बर्गर ने महिलांच्या दृष्टीने आपल्या उत्पादनाकडे बघितले आणि म्हणून त्यांना उत्तर सापडले. फ्रेशनेस बर्गर ने आपल्या क्लासिक बर्गर साठी एक नवीन प्रकारचे पॅकिंग बनवले. या पॅकिंग ला त्यांनी " मुक्त करणारे आवरण" (Liberation Wrapper) असे नाव दिले. या आवरणामुळे, बर्गर खाताना स्त्रियांचे तोंड झाकले जात असे आणि त्यामुळे त्यांना मोठा घास घेण्याचा आनंद मिळू लागला. या कल्पनेचा दुसरा फायदा असा झाला की महिलांना " क्लासिक बर्गर" हे उत्पादन आपल्यासाठी आहे असे वाटू लागले. आणि बघता बघता तो महिलांच्या प्रथम पसंती चा मेनू बनला. काही दिवसातच, क्लासिक बर्गरची विक्री दोनशे टक्क्यांनी वाढली. मित्रांनो, प्रत्येक उद्योजकाने नीट अभ्यासावी अशी ही गोष्ट आहे. प्रत्येक वेळेला उत्तर आपल्या उत्पादनातच असते असे नव्हे तर कधी ते मार्केटिंगमध्ये असते, कधी पॅकेजिंगमध्ये असते, कधी आपल्या व्यवसायाच्या जागेमध्ये असते, कधी आपल्या कडे काम करणाऱ्या लोकांमध्ये असते, कधी उत्पादनांच्या किमती मध्ये तर कधी जाहिरातींमध्ये असते. परंतु प्रत्येक वेळेला उत्तर आपल्या ग्राहकांच्या मनामध्ये नक्कीच असते. तिथे डोकावून पाहिले तर आपला ग्राहकच बिझनेस वाढवायला मदत करणारा गुरु ठरू शकेल. खरी मार्केटिंग म्हणजे ग्राहकाला समजवणे नव्हे तर ग्राहकाला समजून घेणे !मी माझ्या प्रत्येक ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आणि ऑनलाईन कोर्समध्ये याबद्दल नेहमी सांगत आलोय.
आमच्या फेसबुक मार्केटिंग कोर्स (http://www.netbhet.com/facebook-marketing-expert-offer.html) मध्ये आणि बिजनेस प्लान कोर्समध्ये (http://www.netbhet.com/businessplan.html) याबद्दल सविस्तर शिकवण्यात देखील आले आहे. फ्रेशनेस बर्गरची हि मार्केटिंग कथा तुम्हाला नक्की आवडली असेल अशी मला खात्री आहे. आपल्या इतर उद्योजक मित्रांबरोबर ती कथा शेअर करायला विसरू नका ! यशस्वी भव ! धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया www.netbhet.com |