मित्रहो, आपल्या उत्पादनाची किंमत ग्राहकासमोर मांडताना अँकर स्ट्रॅटेजी ही एक उपयुक्त पद्धत वापरली पाहिजे. Anchor Pricing पद्धतीमध्ये ग्राहकला एक वेगळी किंमत आधी दाखवायची असते आणि त्यासोबत एक खरी किंमत दाखवायची असते. कारण ग्राहकाला जी वस्तू आपण विकत घेत आहोत त्याची खरी Value (किंमत नव्हे) ठरवणे नेहमीच जमते असे नाही. याचा फायदा घेऊन बरेच विक्रेते आपल्या उत्पादनाची किंमत आधीच वाढवतात आणि त्यानंतर ग्राहकाला खरी किंमत दुसर्या पर्यायाच्या स्वरुपात दाखवतात. तुम्ही मॉल मध्ये बर्याचदा पाहिले असेल की वस्तुच्या मुळ किंमतीवर काट मारुन त्यानंतर नवी किंमत दाखविलेली असते. किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या तिकीटांची मूळ किंमत वेगळी दाखवून त्यानंतर "लवकर" खरेदी करणार्यांसाठी (Early Bird) वेगळी कमी किंमत दाखविलेली असते. यामध्ये वापरलेली मूळ किंमत म्हणजे ग्राहकाला वस्तूच्या वॅल्युचा एक संदर्भ (Anchor) देण्यासाठी असते. त्यामुळे साहजिकच वस्तुची दुसरी किंमत ग्राहकाला कमी वाटू लागते आणि ग्राहक त्या किंमतीला उत्पादन खरेदी करतात. स्टीव जॉब्जने जेव्हा आयपॅड लाँच केला, तेव्हा आयपॅडची खरी किंमत किती असावी हे कोणालाच माहित नव्हते. परंतु अॅपलनेच आपले नाव समोर येऊ न देता, आयपॅडची किंमत १००० डॉलर्सपेक्षा कमी असेल अशी अफवा पसरवली होती. आणि $९९९ (Anchor Pricing) अशी किंमत कदाचित असेल, असे विविध ब्लॉग्ज, वर्तमानपत्रे इत्यादी मध्ये छापून आणले होते. त्यानंतर जेव्हा खरोखर आयपॅड लाँच केला तेव्हा स्टीव्ह जॉब्जने मोठ्या दिमाखात आम्ही आयपॅड ४९९ डॉलर्सला बाजारात आणत आहोत असे सांगितले. साहजिकच लोकांना आयपॅड खुपच स्वस्त वाटू लागला आणि त्यावर ग्राहकांच्या अक्षरक्षः उड्या पडल्या. उद्योजकांनी यातून काय शिकावे ? ====================== मित्रांनो, ग्राहकाच्या मानसशास्त्राचा नीट अभ्यास करुन तुम्ही देखिल आपल्या उत्पादनाची किंमत ठरवण्यासाठी Anchor Pricing चा वापर करु शकता का याचा विचार करा. आणि तुमच्या उत्पादनात्/तुमच्या व्यवसायात असे करणे शक्य असेल तर नक्की करा. यामुळे तुमची विक्री आणि नफा दोनीही वाढू शकेल. अशीच आणखी एक जबरदस्त Pricing Strategy जाणून घेऊया पुढील लेखात. तोपर्यंत हा लेख जरूर शेअर करा आणि लेख कसा वाटला ते देखील कळवा. धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |