मित्रांनो, हा फोटो आहे उबरच्या (UBER) नव्या स्वयंचलित कारचा. नुकताच त्यांनी या कारचे पहिले मॉडेल लोकांसमोर आणले.
सहा वर्षांपुर्वी जी "उबर" ही कंपनी अस्तीत्वातच नव्हती, त्या कंपनीने एवढी मोठी उडी घेणे ही बिझनेस जगातील एक परीकथाच म्हणावी लागेल. २०१० मध्ये उबरने पहिल्यांदा टॅक्सी बुकींगचं अॅप सुरु केलं आणि आज उबर ६० देशांमधील ४०० शहरांमध्ये ५,००,००० टॅक्सीचालकांसोबत व्यवसाय करत आहे. आणि दर सहा महिन्यांनी हे आकडे दुप्पट होत आहेत. लवकरच तो दिवस येईल जेव्हा "उबर"ला नविन टॅक्सी आणि चालकांची आवश्यकता भासणार नाही. वर्षानुवर्षे अजिबात न बदललेल्या टॅक्सी वाहतूकीच्या क्षेत्रात उबरने आपल्या नव्या बिझनेस मॉडेलने अमुलाग्र बदल करुन टाकला. कोणत्याही स्थिरस्थावर उद्योगक्षेत्रामध्ये अगदी ३६० अंशाने अमुलाग्र बदल करणे याला "डीसरप्शन" असा एक अतिशय छान इंग्रजी शब्द आहे. तर उबरने टॅक्सी वाहतूकीच्या क्षेत्रात असेच डीसरप्शन केले, पण उबरला हे देखिल माहित आहे की उद्या कोणीतरी उबरचे हे बिझनेस मॉडेल देखिल डीसरप्ट करु शकेल. आणि दुसर्या कोणीतरी स्पर्धकाने उबरला बदलणे भाग पाडण्याच्या ऐवजी उबरने स्वतःच स्वतःचे बिझनेस मॉडेल डीसरप्ट करायचे ठरवले आहे. “You either disrupt your own company or someone else will.” ~ Peter Diamandis आणि म्हणूनच उबरने नुकताच ही नवी स्वयंचलीत कार जगासमोर सादर करताना सांगीतले की, "स्वयंचलीत कार्स हेच वाहतूकीचे भविष्य असणार आहे. जगभरात दरवर्षी सुमारे १३ लाख लोक रस्त्यांवरील अपघातात मरण पावतात. आणि यापैकी ९४% अपघात हे चालकाच्या चुकीमुळे होतात. स्वयंचलित कार मुळे या मानवी चुका टळतील आणि अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होतील. स्वयंचलित गाड्यांमुळे ट्रॅफीक जॅम कमी होतील, इंधन बचत होईल, वाहतूक स्वस्त होईल आणि अपघातही कमी होतील. वाहतूक नळातून वाहत्या पाण्याईतकी सोपी आणि सहज करणं हे आमचं (उबरचं) ध्येय आहे आणि स्वयंचलित गाड्याच आम्हाला ते ध्येय पुर्ण करायला मदत करतील." पण याचा अर्थ साहजिकच हा आहे की जगभरात जे ५,००,००० चालक आज उबरमुळे व्यवसाय करत आहेत. ते उद्या बेरोजगार होतील. उबर सुरु झाल्यानंतर साध्या टॅक्सी ड्रायवर्सने रस्त्यावर उतरुन उबरचा निषेध केला होता. असाच विरोध आता उबरचे चालक करतील. पण हा बदल अपरीहार्य आहे. उबरने त्यांच काम हिरावून घेतलं नसून तंत्रज्ञानाने हिरावून घेतलं आहे. या येऊ घातलेल्या "डीसरप्शन"ने हिरावून घेतलं आहे. जर उद्याची दिशा ओळखून उबरने आजच पाउले उचलली नाहीत तर त्यांचा टीकाव लागणं अशक्य आहे आणि म्हणूनच आज अतिशय चांगला चाललेला व्यवसाय मुळापासून बदलून टाकण्याची त्यांची तयारी आहे. मित्रांनो, उद्योजकांनो, व्यावसायीकांनो, कर्मचार्यांनो अतिशय वेगाने येणार्या या अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी आपण काय पाउले उचलत आहोत. आपल्या कामात, व्यवसायात येत्या ३-५ वर्षात जे बदल होणार आहेत त्याची चाहुल आपण घेतली आहे का ? उदाहरणार्थ येत्या काही वर्षात स्वयंचलित कार सर्वत्र झाल्यानंतर "मोटर ट्रेनिंग" हे क्षेत्र जवळपास संपणार आहे. भविष्यातील गाड्या सौरऊर्जेवर चालणार्या आहेत त्यामुळे पेट्रोल, डीझेल क्षेत्राला एक प्रचंड मोठा धोका आहे. डेस्कटॉप आणि लॅपटॉपचा वापर कमी होऊ लागला आहे त्यामुळे डेस्कटॉप , लॅपटॉप रीपेअरींग, असेम्ब्ली इत्यादी क्षेत्रं येत्या ५-१० वर्षात पडद्याआड गेली तर नवल वाटणार नाही. मित्रहो, बदल थांबवता येत नाही मात्र त्याची पावलं ओळखून तयारी करणं हे आपल्या हातात आहे. जे उद्या नाईलाजाने करावच लागणार आहे ते आजपासूनच केलं तर बरं ! नाही का ? धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |