सध्या फेसबुकने सुरु केलेलं "फ्री बेसीक्स" आणि त्या विरोधात उभा राहिलेला "नेट न्युट्रॅलीटी"चा मुद्दा बराच चर्चेत आहे. काय आहे हे प्रकरण. त्याचे फायदे-तोटे काय ? फेसबुकचा हा खटाटोप कशासाठी ? आणि भविष्यातील ईंटरनेटवर याचा काय परीणाम होणार आहे ? या सर्वांची उत्तरे देणारा हा लेख खास नेटभेटच्या वाचकांसाठी. "फ्री बेसीक्स" (FREE BASICS) म्हणजे नक्की काय आहे ?फेसबुकने "फ्री बेसीक्स" या नावाने एक असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे ज्यामार्फत काही बेसीक वेबसाईटस मोफत वापरता येतील. मोफत म्हणजे या वेबसाईट्स पाहण्यासाठी कोणताही डेटा चार्ज (ईंटरनेट फी) द्यावी लागणार नाही. यासाठी फेसबुकने काही टेलीकॉम कंपन्यांसोबत करार केला आहे. परंतु जर या काही मोजक्या मोफत वेबसाईट्स व्यतीरीक्त एखादी वेबसाईट पाहायची असेल तर मात्र त्यासाठी पैसे आकारण्यात येतील. भारतामध्ये फेसबुकने रीलायन्स कंपनीशी करार केला आहे. आणि रीलायन्सने ज्या वेबसाईट्स या कार्यक्रमा अंतर्गत उपलब्ध करुन दिल्या आहेत त्यांची यादी येथे पाहता येईल. उदाहरणार्थ या यादीत फेसबुक.कॉमचा समावेश आहे आणि गुगल्.कॉमचा समावेश नाही आहे. याचाच अर्थ "फ्री बेसीक्स" अंतर्गत आपल्याला फेसबुक मोफत पाहता येईल मात्र गुगल वापरण्यासाठी इंटरनेटचे पैसे मोजावे लागतील. फेसबुकला याचा काय फायदा ?जगभरातील अनेक गरीब लोकांना इंटरनेटचा फायदा घेता यावा या उद्देशाने फेसबुकने हा प्रकल्प हाती घेतला आहे. पण हे फक्त दाखवायचे दात आहेत. फेसबुकचा खरा फायदा हा की यामुळे नविन कस्टमर्स फेसबुकला मिळणार आहेत. आणि इतर कंपन्यांच्या आधी हे ग्राहक आणि त्यांचा डेटा (हा डेटा जाहिरातदारांना विकुनच फेसबुक पैसे कमावते.) सर्वप्रथम फेसबुकच्या हाती लागणार आहे. एवढच नव्हे तर या "फ्री वेबसाइट्स"च्या ग्रुप मध्ये ज्या इतर वेबसाइट्स आहेत त्यांनाही युजर डेटा फेसबुकला द्यावा लागणार आहे. याचाच अर्थ "समाजसेवा" या गोंडस नावाखाली फेसबुकने आपला "फायदा" करुन घ्यायचा प्रयत्न केला आहे. फ्री बेसीक्सचे नाव यापुर्वी ईंटरनेट्.ऑर्ग INTERNET.ORG असे होते. अतीशय हुशारीने मार्क झुकरबर्ग याने त्याचे नाव "फ्री बेसीक्स" असे केले. "फ्री" असलं की माणूस आपोआप त्याकडे ओढला जातो, आणि "बेसीक्स" या नावाखाली अगदीच तुटपुंज्या गोष्टी पुरविल्या तरी चालते. आणि फ्री बेसीक्सचा शॉर्टफॉर्मही फेसबुकप्रमाणेच FB असा होतो ! ठीक आहे, पण लोकांना मोफत इंटरनेट तर मिळतोय्....मग यात प्रॉब्लेम काय आहे ?आपल्याला वाटतय त्याप्रमाणे काही वेबसाईट मोफत मिळतील आणि ज्यांना पैसे देउन आणखी वेबसाईट्स पहायच्या आहेत त्यांनी अधिक पैसे देउन त्या पहाव्यात. पण खरी मेख ही आहे, की या "मोफत वेबसाईटस कोणत्या असणार, आणि त्या कोण ठरवणार ?" उदाहरणार्थ समजा तुम्ही शेतीच्या आधुनिक पद्धतींविषयी माहिती देणारी एखादी वेबसाईट बनविली...परंतु तुमची वेबसाईट फ्री बेसीक ग्रुपमध्ये नसल्याने ती "मोफत इंटरनेट" वापरणार्या गरीब शेतकर्यांना दिसणारच नाही. आणखी एक उदाहरण पाहुया...समजा "फ्री बेसीक" वापरणार्या व्यक्तीला काही ऑनलाईन खरेदी करायची आहे, तर त्याला अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील किंवा ईतर ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईट वरुन खरेदी करता आली पाहिजे. परंतु "मोफत इंटरनेट" मध्ये फक्त अॅमेझॉन.कॉम हीच वेबसाईट दिसत असेल तर त्यावरुनच खरेदी केली जाईल्..आणि कदाचित इतर वेबसाईट पेक्षा जास्त भावाला ही वस्तु अॅमेझॉन वर विकली गेली असेल. वरील दोन उदाहरणांवरुन हे लक्षात येईल की वेबसाईट बनविणारे आणि वापर करणारे या दोघांसाठी "फ्री बेसीक्स" अन्याय कारक आहे. आज इंटरनेटचा वटवृक्ष एवढा फोफावण्याचे कारण म्हणजे सर्वांना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची त्याची ताकद. ईंटरनेटवर कोणी काय पहायचं हे ठरवून "फ्री बेसीक्स" मुळात या ताकदीवरच घाव करत आहे. "तटस्थ ईंटरनेट" किंवा "नेट न्युट्रॅलीटी" म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व : ईंटरनेट मुक्त आहे आणि कोणाचीही बाजू घेत नाही. प्रत्येकाला आपलं मत बनविण्याचं आणि मांडण्याचं स्वातंत्र्य ईंटरनेट मुळे शक्य झालं आहे. "फ्री बेसीक्स" मुळे "तळं राखील तो पाणी चाखील" असं होणार आहे. या तळ्याचा वापर सर्वांना करता आला पाहिजे...यालाच म्हणतात "नेट न्युट्रॅलीटी". फ्लिपकार्ट (FLIPKART) ही भारतीय कंपनी अॅमेझॉनशी (AMAZON) सामना करु शकते कारण इंटरनेटने दोघांना समान पातळीवर आणले आहे. ओला(OLA)/उबर (UBER) सारख्या स्टार्ट-अप कंपन्या हजारो वाहनचालकांना रोजगार देऊ शकल्या ते ईंटरनेट मुळे. अन्यथा इतर मोठ्या टॅक्सी कंपन्यांनी या नव्या कंपन्यांना उभं देखील राहू दिलं नसतं. जर ईंटरनेट तटस्थ राहिला नाही तर "पैसे"वाल्या वेबसाईट्सना जे आपल्या गळी उतरवायचय तेच आपल्याला पहावं लागेल. उत्तर कोरीया मध्ये सध्या जसं सरकार चालू आहे...तसचं "फ्री बेसीक्स" मुळे इंटरनेटचं होणार आहे. "तेव्हा मित्रांनो "फ्री बेसीक्स" म्हणजे ईंटरनेट नव्हे...तो फक्त इंटरनेटचा एक अगदी छोटा (एक टक्क्याहुनही लहान !) भाग आहे...आणि तो देखिल "प्रायोजीत मजकुर" असणार आहे. म्हणूनच आपल्या ईंटरनेटला वाचवण्यासाठी जागरूक रहा...फ्री कधीच फ्री नसतं....हे लक्षात ठेवा आणि "फ्री बेसीक्स" पासुन चार हात लांबच रहा !" धन्यवाद ! नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू या ! www.netbhet.com |