मायक्रोसॉफ्ट या बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनीने लिंकड-इन ही सोशल नेटवर्क साईट विकत घेण्याची घोषणा केली. २६ बिलियन डॉलर्स इतकी प्रचंड किंमत मायक्रोसॉफ्टने यासाठी मोजली. लिंकडईनचे संस्थापक रीड हॉफमॅन यांच्या १९९३ पासून सुरु झालेल्या करीअर मधील हा उच्चांक आहे. पण मित्रहो, यामागे रीड हॉफमॅन यांची मेहनत आणि अनेकदा अयशस्वी होउनही पुन्हा नव्याने सुरु करण्याची उमेद या गोष्टींचा मोलाचा वाटा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी रीड हॉफमॅन यांना उपयोगी ठरली ती म्हणजे "नेटवर्कींग" (Networking). १९९३ साली आपल्या कामासाठी योग्य अशा व्यक्तींसोबत नेटवर्कींग करुन रीड यांनी काही मोठ्या गुंतवणुकदारांशी संपर्क साधला. रीड हॉफमॅन यांना त्यांच्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये गुंतवणुकदार पाहिजे होते. तेव्हा या गुंतवणुकदारांनी त्यांना सांगीतले की तुझ्याकडे सॉफ्टवेअर बनवून विकण्याचा अनुभव नाहीये. तुझ्या व्यवसायात तुझीच स्वतःची मोठी गुंतवणुक नाहीये आणि अशा व्यवसायात आम्ही आमचे लाखो डॉलर्स गुंतवु असे तुला वाटते ? त्यापेक्षा तु आधी एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत जॉब बघ. तिथे अनुभव मिळव. आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुझा उद्योग सुरु कर. रीड हॉफमॅनने हा सल्ला मानला आणि अॅपल कंपनीत जॉब सुरु केला. अॅपल तेव्हा "eWorld" नावाचं एक सोशल नेटवर्क विकसीत करण्याच्या प्रयत्नात होती. रीड हॉफमॅन याच प्रोजेक्टवर काम करत होते. दुर्दैवाने अॅपलचे हे सोशल नेटवर्क चालले नाही मात्र या प्रयत्नात रीड हॉफमॅन बरेच काही शिकले. आणि त्यांच्या आणखी काही चांगल्या लोकांशी ओळखी वाढल्या. पुन्हा एकदा रीड हॉफमॅन यांनी प्रयत्न केला. आणि "सोशलनेट" नावाची online dating साईट सुरु केली. तेव्हा नुकताच "इंटरनेट बुडबुडा" फुटला होता आणि त्याचा फटका सोशलनेटला पडला. सोशलनेटही अपयशी ठरले. मात्र सोशलनेट वाढविण्याच्या नादात रीड हॉफमॅन यांच्या वर्तमानपत्र जगतात व ऑनलाईन जगतात खुप ओळखी वाढल्या. यापैकीच एक व्यक्ती होती "पीटर थिएल"(Peter Thiel). सोशलनेट बंद करुन रीड हॉफमॅन यांनी नविन व्यवसाय सुरु करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी पीटर थिएल सोबत चर्चा केली तेव्हा पीटरने त्यांना सांगीतले की एवढ्यात नविन व्यवसाय सुरु करु नकोस. त्यापेक्षा आम्ही काम करत असलेल्या या नव्या स्टार्ट-अप मध्ये आमच्या सोबत काम कर. या नव्या स्टार्ट-अपचे नाव होते "पेपाल (PayPal)" पेपाल ही कंपनी खुपच यशस्वी झाली. रीड हॉफमॅनने यामध्ये मोलाचा वाटा उचलला.काही वर्षातच eBay ने पेपाल विकत घेतली. या व्यवहारात पेपालच्या सर्वच संस्थापकांना खुप पैसा मिळाला. तसा तो रीड हॉफमॅन यांनाही मिळाला. या पैशाच्या आधारे आणि आतापर्यन्त मिळविलेल्या अनुभवाच्या आधारे (सुरुवातीला गुंतवणुकदारांनी याच दोन गोष्टी मिळवायला सांगीतल्या होत्या!) रीड यांनी लिंक्ड-ईन या प्रोफेशनल नेटवर्कींग साईटची स्थापना केली. आज १३ वर्षात लिंकड-इन जगातील सगळ्यात मोठे प्रोफेशनल बनले आहे. आणि आता लिंक्ड-ईन २६ बिलियन डॉलरला विकली जात आहे. मायक्रोसॉफ्टने आतापर्यन्त विकत घेतलेल्या कंपन्यांपैकी ही सगळ्यात महाग कंपनी ठरली आहे. मित्रांनो, योग्य ओळखी आणि त्यातून वेळोवेळी मिळालेले योग्य सल्ले या कोणत्याही व्यक्तीला, उद्योगाला पुर्णपणे बदलून टाकू शकतात याचे हे उदाहरण ! It’s not about what you know. It’s about who you know - and who knows you. रीड हॉफमॅनच्याच शब्दात सांगायचे तर "तुम्हाला जे यश मिळवायचे आहे , ते मिळविण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ज्या व्यक्तींनी याआधीच ते यश मिळविले आहे त्यांच्याशी ओळखी वाढविणे !" धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |